अमरावती - ६० मुलांसह बापाने केले मतदान; पापळकर यांच्या आश्रमाची ऐतिहासिक नोंद
अमरावती, 26 एप्रिल, (हिं.स.) रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या बेवारस, दिव्यांग मुलांना पितृछत्र देऊन
अमरावती - ६० मुलांसह बापाने केले मतदान; पापळकर यांच्या आश्रमाची ऐतिहासिक नोंद


अमरावती, 26 एप्रिल, (हिं.स.) रस्त्याच्या कडेला सोडून दिलेल्या बेवारस, दिव्यांग मुलांना पितृछत्र देऊन त्यांच्या पुनर्वसनासाठी आयुष्यभर धडपड करणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांच्या अचलपूर तालुक्यातील वझ्झर येथील स्व. अंबादासपंत वैद्य दिव्यांग, बेवारस बालगृहाच्या इतिहासात मतदानाची महत्वपूर्ण नोंद झाली आहे. बेवारस मुलांना वडिलांचे नाव देणारे शंकरबाबा पापळकर आपल्या ६० मुलांसह वझ्झर येथील प्राथमिक शाळेच्या २१५ क्रमांकाच्या मतदान केंद्रावर पोहचले. या सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला.

दृष्टिहीन, मूकबधीर व पोलिओग्रस्त मुलांचासुद्धा त्यात समावेश आहे. गेल्या १५ ते २० वर्षांपासून ही मुले या बालगृहात राहत आहेत. सर्वांच्या नावापुढे शंकरबाबा पापळकर हेच नाव असल्याने तेच त्यांचे पिता आहेत. रस्त्यावर, कचराकुंडीत, रेल्वेस्टेशन, बसस्थानकावर तसेच अन्य ठिकाणी टाकून दिलेल्या मुलांचा सांभाळ शंकरबाबा पापळकर पित्याप्रमाणे करतात. या मुलांना रोजगार मिळवून देण्यासोबतच त्यांचे लग्न लावून देण्याचे अतिशय आव्हानात्मक कार्य शंकरबाबांनी गेल्या अनेक वर्षांपासून हाती घेतले आहे. आपल्या मुलांना मतदानाचा हक्क मिळावा, यासाठीसुद्धा त्यांनी चांगलाच लढा दिला.

गेल्या लोकसभा निवडणुकीत येथील ४८ मुलांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यावेळी त्यांनी मतदान जनजागृतीसाठीही प्रयत्न केले. प्रत्येकाने लोकशाही समृद्ध करण्यासाठी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, असे आवाहन शंकरबाबा पापळकर यांनी केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande