ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वांनी समन्वयाने काम करावे - राहील गुप्ता
ठाणे, 27 एप्रिल (हिं.स.) : देशात लोकसभा निवडणुकांचा उत्सव सुरू असून पाचव्या टप्यातील निवडणुका येत्या
ठाणे लोकसभा मतदारसंघात सर्वांनी समन्वयाने काम करावे - राहील गुप्ता


ठाणे, 27 एप्रिल (हिं.स.) : देशात लोकसभा निवडणुकांचा उत्सव सुरू असून पाचव्या टप्यातील निवडणुका येत्या २० मे रोजी होत आहेत. २५-ठाणे या लोकसभा मतदारसंघातील निवडणुका नि:पक्षपातीपणे, शांततेत व भारत निवडणूक आयोगाने आखून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श आचारसंहितेचे पालन करुन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी २५- ठाणे लोकसभा क्षेत्रातील सर्व खर्च नियंत्रण अधिकारी - कर्मचाऱ्यांनी आपापसात उत्तम समन्वय साधत काम करावे, असे निर्देश ठाण्यात दाखल झालेले केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक चंद्र प्रकाश मीना व राहील गुप्ता यांनी आज बैठकीत दिले.

समिती सभागृह, नियोजन भवन येथे 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीस 25 ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी मनिषा जायभाये, निवडणूक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी सत्यवान उबाळे, सहाय्यक नोडल अधिकारी पतंगे आणि संबंधित सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी उपस्थित सर्व नोडल अधिकाऱ्यांकडून सद्य:स्थितीत सुरू असलेल्या कामांचा आढावा खर्च निरीक्षक चंद्र प्रकाश मीना व राहील गुप्ता घेतला.लोकसभा निवडणूक २०२४ या करिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका व खाजगी बँकांकडून होणाऱ्या मोठ्या व्यवहारांसाठी देण्यात आलेल्या क्यू-आर कोडच्या माध्यमातून झालेल्या आर्थिक व्यवहाराबाबत केलेल्या कारवाईची माहिती घेतली. तसेच सी-व्हिजिल ॲपच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींची माहिती घेवून कशा पध्दतीने कारवाई केली जात आहे, याबाबतही निरीक्षकांनी जाणून घेतले.

२५ ठाणे लोकसभा मतदारसंघातील १४६ ओवळा, १५० ऐरोली हे विधानसभा मतदारसंघ संवेदनशील असून या ठिकाणच्या नोडल अधिकाऱ्यांना या ठिकाणी जास्त लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. निवडणुकीचे काम हे टीम वर्क आहे. त्यामुळे व्हॉटसॲप ग्रुपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधत प्रत्येकाने काम करावयाचे आहे, असेही केंद्रीय खर्च निरीक्षकांनी यावेळी नमूद केले.

बैठकीच्या शेवटी निवडणूक खर्च नियंत्रण सहायक नोडल अधिकारी पतंगे यांनी केंद्रीय निवडणूक खर्च निरीक्षक आणि उपस्थितांचे आभार मानले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande