चिपळूणमध्ये उद्या कुंभार्लीचा राजा सायकल स्पर्धा
रत्नागिरी, 4 मे, (हिं. स.) : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सलग तिसऱ्या वर्षी कुंभार्लीचा राजा सायकल स्पर
चिपळूणमध्ये उद्या कुंभार्लीचा राजा सायकल स्पर्धा


रत्नागिरी, 4 मे, (हिं. स.) : चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे सलग तिसऱ्या वर्षी कुंभार्लीचा राजा सायकल स्पर्धा रविवार ५ मे रोजी आयोजित करण्यात आली आहे.

गेली दोन वर्षे अत्यंत उत्कंठावर्धक होत असलेल्या या स्पर्धेत यावर्षी ३०० पेक्षा जास्त स्पर्धकांनी नावनोंदणी केली आहे. राज्य, राष्ट्रीय पातळीवरील नावाजलेले खेळाडू तसेच दोन परदेशी सायकलस्वारदेखील कुंभार्ली घाट सर करण्यासाठी सज्ज आहेत.

ही स्पर्धा पाच गटात होणार आहे. पहिले तीन गट पुरुषांचे असून १६ ते ३५ वयोगट, ३५ ते ५० वयोगट आणि ५१ पेक्षा अधिक वयोमर्यादा असलेले पुरुष अशा श्रेणीत ते विभागले आहेत. महिलांसाठी वेगळा गट करण्यात आलेला आहे. मुलांची सायकलिंगची वाढती आवड लक्षात घेता यावर्षी मुलांनादेखील स्पर्धेत सहभागी करून घेत त्यांचा वेगळा गट तयार करण्यात आला आहे. वाढता प्रतिसाद लक्षात घेता बक्षिसांची संख्यादेखील वाढवण्यात आलेली आहे.

रविवारी, ५ मे रोजी सकाळी ५.३० वाजता बहादूर शेख नाका येथून या स्पर्धेला सुरवात होऊन कुंभार्ली घाटमाथा येथे समाप्त होईल. २९ किमी अंतराच्या या स्पर्धेत सुमारे १२ किमीचा घाट स्पर्धेची चुरस वाढवतो. या स्पर्धेसाठी सर्व गटांसाठी चषक, रोख बक्षिसे अशी दीड लाखाहून जास्त किमतीची पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. चिपळूणमधील अनेक दानशूर व्यक्तींनी या स्पर्धेसाठी अर्थसाह्य केले आहे.

देशविदेशातून येणाऱ्या खेळाडूंचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी ५ मे रोजी सकाळी ठीक ५.३० वाजता बहादूर शेख नाका येथे उपस्थित राहून स्पर्धकांना प्रोत्साहन द्यावे.

स्पर्धेनंतर बांदल हायस्कूल सभागृह येथे विजेत्यांना पारितोषिक आणि चषक देऊन सन्मानित करण्यात येईल. नागरिकांनी दोन्ही कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण सायकलिंग क्लबतर्फे करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande