रत्नागिरीत शनिवार-रविवारी मीरा सावंत स्मृती बुद्धिबळ स्पर्धा
रत्नागिरी, 5 मे, (हिं. स.) : येत्या शनिवार-रविवारी (दि. ११ व १२ मे) १७ वर्षांखालील वयोगटाच्या जिल्ह
रत्नागिरीत शनिवार-रविवारी मीरा सावंत स्मृती बुद्धिबळ स्पर्धा


रत्नागिरी, 5 मे, (हिं. स.) : येत्या शनिवार-रविवारी (दि. ११ व १२ मे) १७ वर्षांखालील वयोगटाच्या जिल्हास्तरीय क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मीरा वासुदेव सावंत यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ विकास कार्यक्रमांतर्गत ही क्लासिकल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

रत्नागिरी जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने ही स्पर्धा होणार आहे. शहरातील मॅजिक स्क्वेअर चेस अकॅडमीतर्फे ही स्पर्धा आयोजित करण्यात आली असून क्लासिकल बुद्धिबळाच्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार स्विस लीग पद्धतीने स्पर्धा घेतली जाईल.

स्पर्धेत खुल्या व विविध गटांमध्ये रोख रक्कम व इतर उत्तेजनार्थ स्वरूपात बक्षिसे देण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील युवा बुद्धिबळपटूंना क्लासिकल प्रकारात बुद्धिबळ खेळण्याची ही चांगली संधी आहे. क्लासिकल बुद्धिबळात खेळाडूंना विचार करण्यासाठी अधिक वेळ मिळतो व खेळत असलेला डाव लिहावा लागतो. अशा प्रकारच्या क्लासिकल स्पर्धांचे प्रमाण अलीकडे खूप कमी झाले आहे त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील युवा व बाल बुद्धिबळपटूंनी या संधीचा फायदा घेऊन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन अयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

स्पर्धेत प्रवेश मर्यादित असून जिल्ह्यातील प्रथम नाव नोंदविणाऱ्या ३२ खेळाडूंनाच स्पर्धेत सहभाग घेता येईल. स्पर्धेत नाव नोंदविण्यासाठी चैतन्य भिडे (८०८७२२००६७), मंगेश मोडक (९४०५३५२३५६) किंवा, विवेक सोहनी (९४२२४७४५४६) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande