लातूर - सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद
लातूर, 26 जून (हिं.स.) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीदिनी समाज कल्याण विभागाच्य
सामाजिक न्याय दिनानिमित्त आयोजित विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद


लातूर, 26 जून (हिं.स.) राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या 150 व्या जयंतीदिनी समाज कल्याण विभागाच्या वतीने सामाजिक न्याय दिन साजरा करण्यात आला. यानिमित्ताने आयोजित विविध उपक्रमांना विद्यार्थी, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे शासकीय निवासी व शासकीय वसतिगृहातील शाळेतील गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सन्मान, तसेच राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान, व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शन, वृक्षारोपण आदी विविध कार्यक्रमांचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.

समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार, सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संतोषकुमार नाईकवाडी, इतिहास अभ्यासक तथा व्याख्याते विवेक सौताडेकर, व्यसनमुक्ती विषयक मार्गदर्शक डॉ. सिध्देश्ग्वर हुकिरे, दलितमित्र पुरस्कारप्राप्त संजय जमदाडे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे समाज भूषण पुरस्कारप्राप्त ऍड. अंगद गायकवाड, ऍड. एस.एन. बोडके, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त कार्यालयातील समाज कल्याण अधिकारी विकास केंद्रे यावेळी उपस्थित होते.

सन 2024 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेले शासकीय निवासी शाळा आणि शासकीय वसतिगृहातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना वृक्षाचे रोप, प्रमाणपत्र आणि गुलाबपुष्प देवून सन्मानित करण्यात आले. तसेच त्यांना पुढील शिक्षणसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवली : विवेक सौताडेकर

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे दूरदर्शी आणि विद्वान राजे होते. सामाजिक समतेचा विचार प्रत्यक्षात कृतीत आणून त्यांनी सामाजिक न्यायाची मुहूर्तमेढ रोवली. अस्पृश्य, दलित समाजासाठी शिक्षणाची दारे उघडण्यासोबतच या घटकाला शिक्षण घेता यावे, यासाठी वसतिगृहे, शिष्यवृत्ती सुरु केली. शिक्षणाला चालना देण्यासाठी शिक्षण सक्तीचे केले. कला, साहित्य, क्रीडा क्षेत्राला राजाश्रय देवून गुणवंतांना प्रोत्साहन देण्याचे काम राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी केले. त्यांनी केलेले काम आणि घेतलेले अनेक निर्णय आजही आपल्यासाठी दिशादर्शक असून प्रत्येकाने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज असल्याचे इतिहास अभ्यासक तथा व्याख्याते विवेक सौताडेकर यांनी सांगितले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा आदर्श सर्वांनी घ्यावा : अविनाश देवसटवार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे एक आदर्श राजे होते. माणसाने माणसासारखे वागावे आणि माणसाला माणसासारखे वागवावे, हा विचार प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे काम त्यांनी केले. समाज सुधारणेसाठी त्यांनी घेतलेले निर्णय आजही आपल्यासाठी आदर्शवत असून यावरून त्यांची दूरदृष्टी दिसून येते. त्याच्या कार्याची, विचारांची प्रेरणा घेवून आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने काम करण्याची गरज असल्याचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी सांगितले. तसेच प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहावे, देशाचे सुजाण नागरिक म्हणून वाईट कामांपासून दूर राहून विधायक उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande