वर्धा जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबवा - सचिव संकेत भोंडवे
* जलसाठा वाढविण्यासाठी जलशक्ती अभियानात लोकसहभाग आवश्यक वर्धा, 29 जून (हिं.स.) - पावसाचे पाणी जमीनी
वर्धा जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग अभियान राबवा - सचिव संकेत भोंडवे


* जलसाठा वाढविण्यासाठी जलशक्ती अभियानात लोकसहभाग आवश्यक

वर्धा, 29 जून (हिं.स.) - पावसाचे पाणी जमीनीत साठवून भूजल पातळी वाढविण्यासाठी जलशक्ती अभियानाच्या माध्यमातून लोकसहभाग वाढविण्याची आवश्यकता आहे. तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय इमारतींवर जलपुर्नभरण अभियान (रेन वॉटर हार्वेस्टिंग) राबविण्यात यावा, असे आवाहन केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयाचे संयुक्त सचिव तथा जलशक्ती अभियानाचे वर्धा जिल्हा नोडल अधिकारी संकेत भोंडवे यांनी आज केले. वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जलशक्ती अभियानातील विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, उपवनसंरक्षक राकेश शेपट प्रामुख्याने उपस्थित होते.

जलशक्ती अभियानातील सन २०२४ या वर्षातील थीम कॅच दी रेन ही असल्याचे सांगून संयुक्त सचिव भोंडवे म्हणाले की, शेती आणि पिण्यासाठी पाण्याची नितांत गरज आहे. मात्र वातावरणातील बदल, पावसाची अनियमितता यामुळे भविष्यातील पाणी संकट बिकट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अत्तापासूनच पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याची आवश्यकता आहे. पावसाचे पाणी दरवर्षी वाहून जात असल्यामुळे हे पाणी साठवून ठेवणे आवश्यक आहे.

वर्धा जिल्ह्यात विविध बंधा-यांच्या माध्यमातून तसेच जलशक्ती पुर्नभरण प्रकल्प राबवून त्याचबरोबर जमीनीत पाणी साठविण्याची क्षमता वाढविण्यासाठी पडीक जागेवर जास्तीत जास्त वनीकरण करण्यात यावे. अनेक सामाजिक संस्था यात सध्या कार्य करीत आहेत, मात्र लोकसहभाग असल्याशिवाय कोणतेही प्रकल्प यशाकडे पोहचत नाही. त्यामुळे लोकांमध्ये या विषयी जास्तीत जास्त जागृती निर्माण करून लोकसहभाग जलशक्ती अभियानात वाढविण्याची गरज असल्याचे संकेत भोंडवे यांनी यावेळी सांगितले.

जुलै ते ऑक्टोंबर या चार महिण्यात जिल्ह्यातील जलशक्ती अभियानातील कामांना मोठ्या प्रमाणावर गती देण्यासाठी सर्व संबंधीत विभागांना प्रयत्नशील रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी श्री. भोंडवे यांनी विविध विभागांकडून झालेल्या जलशक्ती अभियानातील विविध विकास कामांचा आढावा घेतला.

या बैठकीत वनविभाग, जमीन व भूसंधारण विभाग, लघु पाटबंधारे विभाग, पाणी पुरवठा, सिंचन, ग्रामपंचायत आदी विविध विभागातील अधिकारी, तसेच बजाज फाऊंडेशन, निसर्ग सेवा समितीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande