शिव - शाहू - फुले - आंबेडकरांचे संस्कार रुजवणारा अर्थसंकल्प - सुनिल तटकरे
मुंबई, 29 जून (हिं.स.) : 'भक्तीपंथाची वारी ते बळीराजाच्या शेतीची चारी... मुलींचे शिक्षण ते मातृभक्ती
शिव - शाहू - फुले - आंबेडकरांचे संस्कार रुजवणारा अर्थसंकल्प - सुनिल तटकरे


मुंबई, 29 जून (हिं.स.) : 'भक्तीपंथाची वारी ते बळीराजाच्या शेतीची चारी... मुलींचे शिक्षण ते मातृभक्तीचे रक्षण...युवकांना रोजगार ते दुर्बलांना आधार... अन महापुरुषांचा गौरव ते छत्रपतींचा शिवराज्याभिषेक उत्सव... असा हा विचारांचा वारसा जपणारा आणि शिव - शाहू - फुले - आंबेडकरांचे संस्कार रुजवणारा अर्थसंकल्प होता, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाचे आज पत्रकार परिषद घेऊन कौतुक केले.

सन २०११ पासून अजितदादा पवार अर्थसंकल्प सादर करत आले आहेत. त्या - त्यावेळी राज्याची आर्थिक स्थिती आणि आर्थिक पाहणी अहवालात नमूद केलेल्या अनेक बाबी या सर्वांचा सारासार विचार करता राज्याला अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम कसे करता येईल, राज्याचे उत्पन्न कसे वाढवता येईल आणि राज्यातील पायाभूत सुविधांना गती देत असताना प्रामुख्याने राज्यातील शेतकरी, महिला भगिनी, युवक, महाराष्ट्रातील साधूसंतांची परंपरा याला गती कशी देता येईल याचा विचार गेल्या दहा वर्षांत दहा वेळा अर्थसंकल्प मांडताना अजित पवार यांनी केल्याचेही सुनिल तटकरे म्हणाले.

महाराष्ट्रात साधूसंतांच्या परंपरेला हजारो वर्षांपासूनची परंपरा आहे. पंढरीच्या वारीचा इतिहास आहे. केवळ स्फूर्तिदायी, प्रेरणादायी एवढयापुरता सिमीत नाही तर आपल्या विचारांची प्रतिक असलेली ही वारी आहे. या वारीला जागतिक नामांकन मिळवण्यासाठी युनेस्कोकडे पाठवण्याचा प्रस्ताव असेल किंवा वारकरी संप्रदाय महामंडळ असेल, वारीला देण्यात येणारी २० हजाराची मदत असेल, निर्मल वारीसाठी ३६ कोटी रुपयांचे नियतव्य असेल, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून देहू आळंदी ते पंढरपूर या दोन्ही मुख्य पालखी मार्गावर वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी, औषधोपचार, असा वैशिष्ट्य पूर्ण अर्थसंकल्प यावेळी सादर केला. महाराष्ट्रातील संतांची परंपरा ही संतसाहित्याची परंपरा, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे अशी अस्मिता एकविसाव्या शतकातील तिसऱ्या दशकात आपण वावरतो त्यावेळी गतीमान इंटरनेट असताना हजारो वर्षांची सात्विक विचारांची परंपरा तितक्याच संस्कारमय विचाराने चालू ठेवणे हाच विचार अजितदादा पवार यांच्या अर्थसंकल्पात मांडणीच्या रुपाने समोर आला आहे याचा अभिमान असल्याचेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

पाश्चात्य देशात नारी शक्तीला नेहमीच प्राधान्य दिले आहे. ते देश खूप मोठ्या प्रमाणावर प्रगतीपथावर गेले आहेत. विकसित राष्ट्रांच्या तुलनेत त्या देशांनी नेत्रदीपक प्रगती केली आहे. आज आपला भारत देश त्याचपध्दतीने मोदींच्या नेतृत्वाखाली विचार करतो आहे. आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे, असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी अजित पवार यांनी ४६ हजार कोटी रुपयाची महत्वाकांक्षी आणि संबंध महिला वर्गाला ताकद आणि शक्ती देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना जाहीर केली याचे वर्णन करण्यासाठी माझ्या शब्दभांडारात शब्द नाहीत अशा शब्दात या योजनेचे सुनिल तटकरे यांनी स्वागत केले.

एका संक्रमणाच्या कालावधीत महिला भगिनी संसार उभा करण्यासाठी प्रयत्न करत असतात अशावेळी बंधुत्वाच्या नात्याने राज्यसरकारने निभावलेली ही भूमिका आणि तो अर्थसंकल्प मांडण्याचे भाग्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि विशेष करून अजित पवार यांना मिळणे हे आम्हा पुरोगामी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने अतिशय जमेची बाजू आहे असे मानतो. पुरोगामी विचाराला तो मांडण्याची संधी मिळणे हा निव्वळ योगायोग नाही तर तो पुण्याईचा भाग आहे, असेही सुनिल तटकरे म्हणाले.

लेक लाडकी, पिंक ई रिक्षा, शुभमंगल सामुहिक विवाह योजना, गरोदर माता व बालकांसाठी मोफत ने आण करण्यासाठी तीन हजार रुग्णवाहिका, मुख्यमंत्री अन्नपूर्णा सहाय्य योजनेतून पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देण्याचा निर्णय, महिला बचतगटांच्या उत्पादनासाठी बाजारपेठ आणि त्यातून १५ लाख महिला लखपती दिदी उद्दीष्ट अशांसह युवकांसाठी पहिल्यांदाच इतिहासात राज्यसरकारने अनेक योजना आणल्या आहेत. त्यांच्या स्वप्नांना बळ देण्याचे काम केले आहे या आणि इतर महत्वाच्या अर्थसंकल्पातील योजना व विषयांकडे सुनिल तटकरे यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.

विरोधकांना समोर पराजय निश्चित दिसत आहे म्हणूनच या अर्थसंकल्पावर टिका करण्याचा केविलवाणा प्रयत्न त्यांनी केला आहे. राजकोषीय तूट किती असावी किती नसावी हे ठरत असते परंतु आपल्याकडेच फार विद्वत्ता आहे असे मानणारी मंडळी त्या विद्वतेचे अधिक ज्ञान कसे पाजळता येईल असा प्रयत्न शुक्रवारी झाला. पण महाराष्ट्रातील जनता या विश्वासार्हता असलेल्या सरकारच्या अर्थसंकल्पाकडे अजितदादांची, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक विश्वासार्हता तयार केलेली आहे. त्यामुळे महायुतीची विश्वासार्हता अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अधिक अढळ झाली आहे. येत्या तीन महिन्यात या अर्थसंकल्पातील बाबींची अंमलबजावणी होऊन फलश्रुती थेट जनतेतून पहायला मिळेल, असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

हिंदुस्थान समाचार


 rajesh pande