लोकमान्य टिळक :  कर्मयोगशास्त्र
श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ जगातल्या अनेकानेक विद्वानांना आकर्षित करत होता, करत आहे आणि करत राहील. याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. ज्यांनी ज्यांनी गीता ग्रंथ वाचला त्यांना या ग्रंथाने महात्म्य श्रेष्ठत्व प्रत्ययास आले. जगातल्या सर्व तत्त्ववे
Tilak


श्रीमद्भगवद्गीता हा ग्रंथ जगातल्या अनेकानेक विद्वानांना आकर्षित करत होता, करत आहे आणि करत राहील. याविषयी कोणाचे दुमत असण्याचे कारण नाही. ज्यांनी ज्यांनी गीता ग्रंथ वाचला त्यांना या ग्रंथाने महात्म्य श्रेष्ठत्व प्रत्ययास आले. जगातल्या सर्व तत्त्ववेत्यांचे या ग्रंथाबद्दलचे मत म्हणजे अखिल मानव जातील चिरकाल मार्गदर्शन करणारा ग्रंथ! अशा ग्रंथाकडे लोकमान्य टिळकांसारखा ज्ञानासक्त कर्मयोगी आकर्षित झाला नसता तरच नवल!

लोकमान्य टिळकांचा भगवद्गीतेशी संबंध आला तो त्यांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी. वर्ष १८७२ मध्ये लोकमान्य टिळकांचे वडील अखेरच्या दुखण्याने आजारी होते. त्यावेळी भगवद्गीतेवरील भाषानिवृत्ति नावाची प्राकृत टीका लोकमान्य टिळकांना त्यांच्या वडिलांनी वाचून दाखवण्यास सांगितले. ही घटना घडली तेव्हा लोकमान्य टिळकांचे वय १६ वर्षांचे होते. वडिलांच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी ती प्राकृत टीका वाचून दाखवली. त्यातील अर्थ पूर्णपणे लक्षात येणे लहान वयामुळे शक्य नव्हते. पण त्यांच्या मनावर जो संस्कार व्हायचा तो या वाचनामुळे झाला होता. मुळातच लोकमान्य टिळकांना लहानपणापासून संस्कृत आणि इंग्रजी या दोन्ही भाषांचा अभ्यास करण्याची आवड होती. गीतेवरील संस्कृत भाष्य आणि अन्य टीका त्यांनी अभ्यासली. इंग्रजीत आणि मराठीत अनेक पंडितांनी केलेली विवचने वाचली.

स्वकियांबरोबर युद्ध करणे हे मोठे कुकर्म म्हणून खिन्न झालेल्या अर्जुनाला युद्धाला प्रवृत्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी गीता सांगितली. गीतेत ब्रह्मज्ञानाने किंवा भक्तीने मोक्ष कसा मिळवावा याचे म्हणजे नुसत्या मोक्षमार्गाचे विवेचन कशाला? ही शंका त्यांच्या मनात आली ती नंतर हळूहळू वाढत गेली, बळावत गेली. गीतेवरील कोणत्याही टीकेत त्याचे योग्य उत्तर लोकमान्य टिळकांना आढळून आले नाही. दुसऱ्यांना अशी शंका आली असेलही, पण टीकेतच गुंतून राहिले की टीकाकारांनी दिलेले उत्तर समाधानकारक वाटले नाही तरी त्यावर वाचून दुसरे उत्तर सुचत नाही. असे होते म्हणून सर्व टीका आणि भाष्य बाजूला ठेवून नुसत्या गीतेचे स्वतंत्र विचार जाणून घेण्याच्या हेतूने लोकमान्य टिळकांनी गीतेची अनेक पारायण करून ती नेमकेपणाने जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मग त्यांच्या लक्षात आले की मूळ गीता ही निवृत्तीपर नसून कर्मयोगावर भर देणारी आहे. गीतेत योग हा एकेरी शब्दच कर्मयोग या अर्थाने योजण्यात आला आहे. असा त्यांना त्यातून बोध झाला. महाभारत, वेदांतसूत्र, उपनिषद, वेदांत शास्त्रावरील इतर संस्कृत आणि इंग्रजी ग्रंथ यांचा त्यांनी अभ्यास केला आणि हळूहळू त्यांचे ते मत अधिक दृढ झाले. या विषयावर अधिकाधिक चर्चा व्हावी या हेतूने लोकमान्य टिळकांनी त्या विषयावर विविध ठिकाणी व्याख्याने दिली. त्यापैकी एक व्याख्यान जानेवारी वर्ष १९०२ मध्ये नागपूरला झाले. त्यानंतर त्यांचे दुसरे व्याख्यान ऑगस्ट वर्ष १९०४ मध्ये मठ करवीर आणि संकेश्वर येथे जगद्गुरु शंकराचार्य यांच्या आज्ञेवरून झाले.

वर्ष १९०८ लोकमान्य टिळकांना सहा वर्षांची शिक्षा झाली त्यासाठी त्यांना ब्रह्मदेशातल्या मंडले कारागृहात पाठवण्यात आले तिथे त्यांनी गीतारहस्य अथवा कर्मयोगशास्त्र हा ग्रंथ लिहिला. या ग्रंथासाठी आवश्यक असलेले संदर्भ ग्रंथ मिळावे म्हणून सरकारकडे त्यांनी आवेदन केले. त्याप्रमाणे त्यांना सर्व संदर्भ ग्रंथ उपलब्ध करून देण्यात आले आणि त्यांच्याकडून तो ग्रंथ लिहिला गेला.

या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या कारागृहात दिनांक २ नोव्हेंबर १९१० या दिवशी ग्रंथ लेखनाला आरंभ केला आणि हा सुमारे ९०० पृष्ठांच्या ग्रंथ दिनांक ३० मार्च १९११ या दिवशी लिहून त्यांनी हाता वेगळा केला. म्हणजे या ग्रंथ लेखनासाठी लोकमान्य टिळकांना केवळ पाच महिने लागले.

दिनांक ८ जून वर्ष १९१४ या दिवशी मंडालेच्या कारागृहातून लोकमान्य टिळकांची मुक्तता करण्यात आली तेथून ते पुण्याला परत आले काही आठवड्यांचा काळ उलटला पण मंडालेच्या कारागृहातून त्यांच्या गीता या ग्रंथाच्या हस्तलिखिताची प्रत त्यांच्यापर्यंत येऊन पोहोचली नाही. सरकारला ती हस्तलिखिताची प्रत द्यायची नाही अशी शंका लोकमान्य टिळक आणि त्यांच्या काही मित्रांना येऊ लागली. तसे त्यांच्या मित्रांनी लोकमान्य टिळकांना सांगितले. लोकमान्य टिळक त्यांना म्हणाले, सरकारने माझ्या हस्तलिखिताच्या प्रती दिल्या नाहीत तरी काही अडणार नाही कारण मी लिहिलेला ग्रंथ केवळ सरकारकडे असलेल्या वह्यांमध्ये नाही तर तो माझ्या डोक्यातही आहे. पुन्हा सिंहगडावर बसून सगळा ग्रंथ लिहून काढीन.

९०० पृष्ठांचा ग्रंथ पुन्हा जसाच्या तसा लिहून काढणे हे काम तसे सोपे नाही. त्यावेळी लोकमान्य टिळकांचे वय ५८ वर्षे होते. या वयातला त्यांचा आत्मविश्वास मात्र वाखाणण्याजोगा आहे. अर्थात तशी वेळ आली नाही. सरकारकडून त्यांच्या गीतारहस्य या ग्रंथाच्या हस्तलिखिताची प्रत विलंबाने का होईना पण पाठवण्यात आली.

लोकमान्य टिळकांच्या या ग्रंथाविषयी योगी अरविंद यांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली ती अत्यंत महत्त्वाची आहे. ते स्वतः तत्त्वज्ञान विषयाचे विद्यार्थी, थोर विचारवंत आणि तत्त्वज्ञानी होते. त्यांचा योगांचा अभ्यासही दांडगा होता. यम, नियम यापासून समाधी पर्यंत अष्टांग योगात त्यांनी प्रगती केली होती. त्यांचा भगवद्गीतेवरील अभ्यासही दांडगा होता. *एसेज ऑन द गीता* हा त्यांचा ग्रंथ आजही लोकप्रिय आहे. म्हणून त्यांनी गीतारहस्य या ग्रंथावरील व्यक्त केलेली प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे.

योगी अरविंद म्हणतात, गीता ग्रंथावरील टिळकांची टीका ही केवळ मल्लिनाथी नसून स्वतंत्र प्रबंध आहे. यात नैतिक सत्यांचे योग्य निदर्शन आहे. मराठीतील पहिल्या प्रतीचा हा पहिला प्रचंड गद्यग्रंथ आपल्या सूक्ष्म आणि व्यापक विचार प्रणालीने तसेच सफाईदार प्रभावी लेखन शैलीमुळे अभिजात वाङ्मयात समाविष्ट होतो. मराठी साहित्याच्या आणि नितीशास्त्राच्या इतिहासात टिळक मनात आणते तर त्यांना अद्वितीय स्थान मिळाले असते. असे या एकाच ग्रंथाने सिद्ध केले आहे. तथापि वाङ्मयाचे क्षेत्र विधात्याने त्यांच्या कर्तृत्वासाठी निवडलेले नसल्यामुळे कर्मणुकीखातर त्यांनी संशोधनाचा प्रचंड उद्योग केला. त्यांची कीर्ती अजरामर करणारे त्यांचे संशोधन ग्रंथ जीवितकार्यात घ्याव्या लागलेल्या सक्तीच्या विश्रांतीच्या काळात निर्माण झाले ही घटना अत्यंत अर्थपूर्ण आहे.

गीतारहस्य हा ग्रंथ लिहिताना संसारातील कर्मे गौण असून किंवा त्याज्य असून केवळ ब्रह्मज्ञान, भक्ती याच गोष्टी विशेषता निवृतीपर मोक्षमार्गानेच गीतेत निरूपण करण्यात आले आहे असे मत लोकमान्य टिळकांनी मांडलेले नाही किंवा मोक्षप्राप्तीच्या मार्गाचेच भगवद्गीते मुळीच विवेचन नाही असे सुद्धा लोकमान्य टिळकांना सांगायचे नाही. तथापि प्रत्येक माणसाने शुद्ध परमेश्वर स्वरूपाचे ज्ञान संपादन करावे. त्याद्वारे आपली बुद्धी होईल तितकी निर्मळ आणि पवित्र ठेवणे हे गीताशास्त्राप्रमाणे जगातले पहिले कर्तव्य आहे. हा भाग गीतारहस्य या ग्रंथात लोकमान्य टिळकांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी लोकमान्य टिळक हा प्रमुख मुद्दा मानत नाहीत.

युद्ध करणे हा क्षत्रियांचा धर्म असला तरी सुद्धा कुलक्षयासारखे घोरपातक घडून जे युद्ध मोक्ष प्राप्त करून देण्याचा आणि आत्मकल्याण याचा नाश करणारे असेल तर ते करावे ही करू नये अशा द्वंद्वात अर्जुन अडकून पडला होता. म्हणजेच कर्तव्यमोहात अर्जुन युद्धपूर्वी पडल्यामुळे गोंधळून गेला होता. अर्जुनाच्या तो मोह काढून टाकण्यासाठी शुद्धवेदांतशास्त्राचा आधार घेऊन कर्म अकर्म तसेच मोक्ष प्राप्त करण्याचा उपाय याचे विवेचन गीतेत करण्यात आले आहे. कर्म कधीही सुटत नाही तसेच सोडून देऊन चालत नाही. ज्या युक्तीने कर्म केले म्हणजे कोणतेच पाप न लागता अखेर मोक्ष प्राप्त होतो ती युक्ती म्हणजेच ज्ञानमूलक भक्तीप्रधान कर्मयोग असे गीतेने प्रतिपादन केले आहे. असा अभिप्राय लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य या ग्रंथात व्यक्त केला आहे.

कर्म-अकर्म अथवा धर्म-अधर्म या विवेचनाला आधुनिक, आधिभौतिक पंडित नीतीशास्त्र असे म्हणतात. हे विवेचन गीतेत कोणत्या प्रकारांनी करण्यात आले आहे हे सामान्य पद्धतीप्रमाणे गीतेवर श्लोकानुक्रमाने टीका करून दाखवता येत असले तरीसुद्धा वेदांत मीमांसा, सांख्य कर्मविपाक अथवा भक्ती इत्यादीशास्त्रातल्या अनेक वादांच्या आणि प्रमेयांच्या आधारे कर्मयोगाचे गीतेत प्रतिपादन केले आहे. ज्याचा उल्लेख कधीकधी खूपच संक्षिप्त पणे करण्यात आलेला दिसतो. त्या शास्त्रीय सिद्धांताची माहिती जर आपल्याला नसेल तर गीतेतील विवेचनाचे मर्म लक्षात येण्याची शक्यता नाही. म्हणून गीतेत जे जे विषय आणि सिद्धांत सांगण्यात आले आहेत त्याचे शास्त्रीयरित्या प्रकरणानुरूप लोकमान्य टिळकांनी विभाग पाडले. त्यातील प्रमुख युक्तीवादासह गीतारहस्यात त्याचे थोडक्यात निरूपण करण्यात आले आहे. असे लोकमान्य टिळकांनी गीतारहस्य ग्रंथाच्या प्रस्तावनेत म्हटले आहे.

गीतेतील रहस्य उलगडून सांगण्यासाठी लोकमान्य टिळकांनी कोणत्या पद्धतीचा उपयोग केला त्याचेही विवरण गीतारहस्य ग्रंथातील विषयप्रवेश या पहिल्या प्रकरणात केला आहे. एखाद्या ग्रंथाचे तात्पर्य शोधून काढण्यासाठी मीमासंक ज्या जुन्या श्लोकाचा आधार घेतात, त्याच श्लोकाचा आधार लोकमान्य टिळकांनी घेतला आहे. तो श्लोक असा....

उपक्रमोपसंहारौ अभ्यासोऽपूर्वता फलम् ।

अर्थवादोपपत्ती च लिंगं तात्पर्यनिर्णये ॥

ग्रंथाचे तात्पर्य शोधून काढताना उपक्रम आणि उपसंहार या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. सरळरेषेची व्याख्या देताना भूमितीशास्त्रात असे सांगण्यात आले की आरंभीच्या बिंदूपासून जी रेष डाव्या उजव्या बाजूस किंवा खाली-वर न कलता शेवटच्या बिंदूपर्यंत नीट जाते तिला सरळ रेष म्हणतात. ग्रंथाचे तात्पर्य काढण्यासाठी हाच नियम लागू आहे

जे तात्पर्य ग्रंथाचा आरंभ आणि शेवट यास न सोडता या दोन टोकांमध्ये नीट बसते तेच या ग्रंथाचे सरळ तात्पर्य आहे. प्रारंभापासून अखेरपर्यंत जाण्यास दुसऱ्या वाटा असल्या तर त्या सर्व वाकड्या किंवा आडव्या तिडव्या समजल्या पाहिजेत. आदिअंत म्हणजे आरंभ आणि अखेर पाहून अशा रीतीने ग्रंथाचे तात्पर्य काय याची दिशा प्रथम निश्चित केल्यावर त्या ग्रंथात अभ्यास म्हणजे पुनरुक्ती किंवा वारंवार काय सांगण्यात आले आहे ते पाहावे लागते. ग्रंथकाराच्या मनात जी गोष्ट सिद्ध करायची असते तिच्या समर्थनार्थ तो अनेक वेळा अनेक कारणे दाखवून दरवेळी म्हणून ही गोष्ट सिद्ध झाली अथवा म्हणून अमुक केले पाहिजे असे पुन्हा पुन्हा एकच निश्चित सिद्धांत सांगत असतो. ग्रंथाचे तात्पर्य काढण्याची चौथी आणि पाचवी साधने अपूर्वता आणि फल ही होत. अपूर्वता याचा अर्थ नवेपणा कोणताही ग्रंथकार आपल्याला काही नवे सांगणे असल्याखेरीज नवीन ग्रंथ लिहिण्यास प्रवृत्त होत नाही. तसेच या ग्रंथाचे फळ काय याकडे सुद्धा लक्ष पुरवायला पाहिजे ते फळ मिळावे किंवा ते फळ प्राप्त व्हावे या हेतूने ग्रंथ लिहिला असल्या मुळे घडलेल्या परिणामावरून ग्रंथकर्त्याचा आशय अधिक व्यक्त होत असतो सहावे आणि सातवे साधन अर्थवाद आणि उपपत्ती! या सर्व कसोट्यांचा उपयोग करून लोकमान्य टिळकांनी श्रीमद्भगवद्गीतेचे तात्पर्य काढले आहे.

गीता सांगताना अनेक वेळा ठीक ठिकाणी भगवान श्रीकृष्णाने तस्मात युद्धस्व भारत (२•१८) - हे अर्जुना म्हणून तू युद्ध कर.

तस्मादुउत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय: (२•३७) - म्हणून तो युद्धाचा निश्चय करून उठ

तस्मादसक्त: सततं कार्यं कर्म समाचर (३•१९)- म्हणून तू आसक्ति सोडून आपले कर्तव्यकर्म कर. कुरुक्षेत्र कर्मैव तस्मात्वं (४•१५) - म्हणूनच तू कर्म कर. मामनुस्मर युध्य च (८•७) - म्हणून माझे स्मरण कर आणि लढ.

तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व

जित्वा शत्रून् भुङ्क्ष्व राज्यं समृद्धी ।

मयैवैते निहता: पूर्वमेव

निमित्तमात्रं भव सव्यसाचिन् ॥ (११•३३)

म्हणूनच तू उठ यश मिळव शत्रूंना जिंकून धनधान्यसंपन्न राज्याचा उपभोग घे. हे सर्व शूरवीर आधीच माझ्याकडून मारले गेले आहेत. हे सव्यसाची तू फक्त निमित्तमात्र हो.

ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तं कर्म कर्तुमिहार्हसि। (१६•२४)

शास्त्राप्रमाणे प्राप्त झालेले कर्तव्य करणे तुला उचित आहे.

एतान्यपि तु कर्माणि सङ्ग त्यक्त्वा फलानि च। कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितं मतमुत्तमम् ॥

(१८•६)

म्हणून हे पार्था! यज्ञ, दान आणि तपरूप कर्मे तसेच इतरही सर्व कर्तव्य कर्मे आसक्ती आणि फलांच्या त्याग करून अवश्य केली पाहिजेत. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे.

कच्चिदज्ञानसम्मोह: प्रनष्टते धनञ्जय (१८•७२)

हे धनंजया! तुझा अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का?

भगवान श्रीकृष्णांच्या या प्रश्नाला उत्तर देताना अर्जुन म्हणाला

नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत।

स्थितोऽस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ॥

(१८•७३)

हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती प्राप्त झाली. आता मी संशय रहित होऊन राहीलो आहे म्हणून मी आपल्या आज्ञेचे पालन करीन.

असे दाखले देऊन तसेच अनेक विद्वानांनी जे प्रतिपादन केले त्याचा आधार घेऊन लोकमान्य टिळकांनी भगवद्गीतेतील रहस्य कर्मयोगशास्त्र आहे असे सिद्ध केले आहे.

दासगणू महाराजांनी श्री गजानन प्रार्थना स्तोत्र रचले. या स्तोत्रातल्या १२७ व्या ओवीत लोकमान्य टिळकांचा गौरव करताना त्यांनी लिहिले

गीतेचा अर्थ कर्मपर । लावी बाळ गंगाधर ।

त्या टिळकांचा अधिकार । वानाया मी समर्थ नसे ॥

लोकमान्य टिळकांचा गीतारहस्य हा ग्रंथ चिरंजीव आहे. गीतेच्या अभ्यासकाने, राष्ट्रकार्य, धर्मकार्य, संस्कृतीकार्यासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या कार्यकर्त्यांनी या ग्रंथाची पारायणे करून गीतेचे तात्पर्य म्हणजेच गीतेतील रहस्य जाणून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. गीतेतील नेमके मर्म आपल्या बांधवांना कळावे म्हणून लोकमान्य टिळकांनी मृत्यू समीप आला असताना केलेले ग्रंथ लेखनाचे कार्य व्यर्थ जाऊ नये, याची काळजी घेणे हे आपले परम कर्तव्य आहे. त्याचे स्मरण लोकमान्य टिळकांच्या आजच्या १६८ व्या जयंतीनिमित्त हा लेखन प्रपंच केला आहे. कारण सांप्रत काळात याचीच आपल्याला नितांत आवश्यकता आहे.

श्री दुर्गेश जयवंत परुळकर

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande