राज्यातील ४४ लाख शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज
मुंबई, २६ जुलै (हिं.स.) : राज्य सरकारने 'लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ' या दोन योजनांनंतर आता शेतकऱ्यांसाठी योजना आणली. त्यात शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज देण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला. शेतकऱ्यांना कृषी पं
शेतकरी वीज


मुंबई, २६ जुलै (हिं.स.) : राज्य सरकारने 'लाडकी बहीण' आणि 'लाडका भाऊ' या दोन योजनांनंतर आता शेतकऱ्यांसाठी योजना आणली. त्यात शेतकऱ्यांना पाच वर्षे मोफत वीज देण्यात येणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय गुरुवारी जारी करण्यात आला.

शेतकऱ्यांना कृषी पंपाची वीज मोफत देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री व वित्त मंत्री अजित पवार यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना जाहीर केला होता. त्यानुसार शासन निर्णय काढण्यात आला आहे.

शासन निर्णयात म्हटले आहे की, राज्यातील ७.५ अश्वशक्तीपर्यंतच्या कृषी वीज ग्राहक शेतकऱ्यांना पुढील पाच वर्षे मोफत वीज देण्यात येईल. एप्रिल २०२४ ते मार्च २०२९ दरम्यान ही योजना लागू राहील. याचा ४४ लाख तीन हजार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. योजनेला तीन वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिचा आढावा घेऊन पुढील कालावधीत योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, असेही निर्णयात म्हटले आहे.

यात महावितरणला फायदा होणार आहे. कारण कृषी पंपांच्या बिलापोटीचे १४,७६० कोटी रुपयांचे अनुदान दरवर्षी सरकार महावितरणला देणार असल्याने त्यांची चिंता मिटणार आहे. कृषी पंप वीज बिलाची एकूण थकबाकी ५० हजार कोटी रुपये आहे.

राज्यात मार्च २०२४ अखेर ४७.४१ लाख कृषीपंप ग्राहक शेतकरी आहेत. एकूण वीज ग्राहकांच्या तुलनेत हे प्रमाण १६ टक्के आहे. ३० टक्के वीज कृषी पंपांसाठी वापरली जाते. कृषी ग्राहकांचा सध्याचा एकूण वार्षिक वीज वापर ३९ हजार २४६ दशलक्ष युनिट आहे. राज्यात कृषी पंपांना रात्री ८ ते १० तास किंवा दिवसा ८ तास वीजपुरवठा केला जातो.

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande