कारगिल विजय - अडीच दशके पूर्ण
कारगिल ऑपरेशन विजय याला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऑपरेशन विजयात सहभागी झालेल्या सर्व वीर जवानांना जवानांना मानाचा मुजरा! आपल्या देशावर अनंत काळापासून वारंवार परकीय आक्रमकांनी आक्रमण केले आहे. त्यातल्या काही जणांना आपल्या देशावर त्यांची राजकीय स
कारगिल विजय


कारगिल ऑपरेशन विजय याला आज २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या ऑपरेशन विजयात सहभागी झालेल्या सर्व वीर जवानांना जवानांना मानाचा मुजरा!

आपल्या देशावर अनंत काळापासून वारंवार परकीय आक्रमकांनी आक्रमण केले आहे. त्यातल्या काही जणांना आपल्या देशावर त्यांची राजकीय सत्ता प्रस्थापित करण्यात यश आले. आपल्या इतिहासाकडे पाहता आपल्या देशाच्या वायव्य भाग सतत संघर्ष होत राहिला. आपल्या देशावर वायव्य दिशेकडून परकीय आक्रमकांनी वारंवार आक्रमणे केली.

वर्ष १९४७ मध्ये आपण आपल्या बळावर ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकली आणि स्वतंत्र झालो, पण त्या आधीच एका शत्रू राष्ट्राला जन्माला घालणाऱ्या विभाजनाला आपल्या राज्यकर्त्यांनी अनुमती दिली.

मुसलमानांनी स्वतःची राजकीय ओळख टिकवण्यासाठी केलेला तो अश्लाघ्य प्रयत्न होता. दुर्दैवाने आपल्या राज्यकर्त्यांनी मुसलमानांच्या पृथकवृत्तीला सतत गोंजारून धष्टपुष्ट केले. सैन्यबळावर पाकिस्तानला आपण १९४७ नंतर झालेल्या प्रत्येक युद्धात बेदम चोप दिला. सैन्याच्या पराक्रमाची आणि सैनिकांच्या पराक्रमी बलविदानाची तमा राज्यकर्त्यांना राहिली नाही, हे दुर्दैव!

वर्ष १९६५ आणि वर्ष १९७१ मध्ये पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात आपल्या सैन्य दलांनी पाकिस्तानची मस्ती जिरवली. १९७१ च्या युद्धात तर पाकिस्तानच्या ९२,००० सैनिकांना पकडून बंदी बनवण्यात आले. आपल्या सैनिकांचा हा विक्रमी विजय होता. आतापर्यंतच्या जगातल्या कोणत्याही युद्धात एवढ्या मोठ्या संख्येने शत्रू सैन्याच्या जवानांना कोणीही बंदी बनवले नव्हते. या बंदिवानांच्या मुक्ततेच्या बदल्यात आपल्याला आपल्या ५५ वीर जवानांची सुटका करून घेता आली असती. तसेच पाक व्याप्त कश्मीर आपल्या ताब्यात आपण घेऊ शकलो असतो. पण त्यासाठी लागणारी इच्छाशक्ती आपल्या राज्यकर्त्यांकडे नव्हती. १९७१ च्या पाकिस्तान बरोबर झालेल्या युद्धात पाकिस्तानने आपल्या ५५ जवानांना बंदी बनवले. त्यांची सुटका आजच्या क्षणापर्यंत आपल्याला करता आली नाही. याचे हिमालया एवढे दुःख आहे.

आपल्या राज्यकर्त्यांच्या या बोटचेपी धोरणामुळे पाकिस्तानचे मनोबल वाढले. तसेच देशातल्या अनेक मुसलमानांची साथ पाकिस्तानाला मिळत गेली. कश्मीर मधले नेतेही हिंदुस्तानच्या विधानसभेत आणि संसदेत वावरत होते. पण त्यांना काळजी वाटत होती ती पाकिस्तानची हिंदुस्तानवर त्यांची निष्ठा असायला हवी होती पण त्यांची निष्ठा त्यांनी पाकिस्तानच्या चरणी अर्पण केली.

कश्मीर मधील वातावरण बिघडण्यास हीच राजकीय आणि स्थानिक मंडळी कारणीभूत ठरली. पाकिस्तानला हिंदुस्थानचा मोकळ्या मैदानात पराभव करता येणे अशक्य होते. कारण प्रत्येक युद्धात पाकिस्तानला हिंदुस्तानकडून मार खावा लागला. त्यामुळे पाकिस्तानला स्वतःच्या मर्यादेची कल्पना आली. देशातल्या परधार्जिण्या नेत्यांनी मात्र पाकिस्तानला पाठिंबा दिला, तोही कृतीशील! पाकिस्तानातून जिहादी मुसलमान हिंदुस्थानात सहज घुसू शकले कारण त्यांना स्थानिक लोकांचे पूर्ण पाठबळ मिळत होते.

परिणामी कश्मीरची भूमी घुसखोरांनी आणि अतिरेक्यांनी व्यापून गेली. त्यातूनच छुपे युद्ध आकाराला आले. याचा परिणाम कश्मीर मधल्या हिंदूंचे अतोनात हाल होण्यात झाला. त्यांची संपत्ती आणि बायका मुली कश्मीरमध्ये ठेवून त्यांनी चालते व्हावे अशी धमकी देणारी भित्तिपत्रके कश्मीर मधल्या हिंदूंच्या घराघरावर लावण्यात आली. कश्मीर मधला दहशतवाद पराकोटीला पोहोचला. लक्षावधी हिंदूंची कत्तल करण्यात आली त्यामुळे कश्मीर मधले हिंदू परागंदा झाले. त्यांना आश्रय देणारा कोणी वाली राहीला नाही.

या अतिरेक्यांना पाकिस्तानकडून सर्व प्रकारचे सहाय्य मिळत होते. आपल्या सैनिकांनी जीवाची बाजी लावून अनेक अतिरेक्यांना कंठस्नान घातले, अनेकांना बंदी बनवले, त्यांच्या मुस्क्या आवळल्या. पण राज्यकर्त्यांनी वीर जवानांच्या हस्ते त्यांना बिर्याणीची ताटे वाढून त्यांच्यातली क्रूरता पोसली आणि आपल्या वीर सैनिकांच्या शौर्याचा गळा घोटला.

कश्मीर मधल्या दहशतवादामुळे तरुण स्त्रियांवरचा मानसिक एवढा वाढून विकोपाला गेला की कश्मीर मधल्या हिंदू तरुणींची मासिक पाळी त्यांच्या वयाच्या २८ व्या वर्षी बंद झाली.

आपल्या देशात विविध नावाने दहशतवादी संघटना कार्यरत झाल्या. हिंदुस्थानात जिहादला आरंभ झाला. हा जिहाद म्हणजे मुसलमानांचे धर्मयुद्ध होय!

देश स्वतंत्र झाल्यानंतर लगेच आपल्या देशाच्या सीमा निश्चित करून त्यांचा कडेकोट बंदोबस्त आपण केला नाही. देशात अनेक दहशतवादी संघटना निर्माण होत होत्या. त्यांना सुद्धा पायबंद घालण्यास आपल्या सरकारला यश आले नाही. किंबहुना तसा प्रयत्न सरकारकडून केला गेला नाही.

पाकिस्तानला यामुळेच आपल्या देशात अशांतता प्रस्थापित करण्यासाठी, रक्तपात घडवून आणण्यासाठी आणि देशाच्या राष्ट्रीय संपत्तीची हानी करण्यासाठी रान मोकळे मिळाले. सरकारकडून कोणताही प्रकारचा प्रतिकार केला जात नाही हे लक्षात घेताच पाकिस्तानने हिंदुस्तानचा भूभाग गिळंकृत करण्यासाठी हालचाली करण्यास आरंभ केला. याचा परिणाम म्हणजे ३ मे १९९९ या दिवशी कारगिल युद्धाला आरंभ झाला आणि हे युद्ध पुढे दोन महिने तेवीस दिवस चालू राहिले. २६ जुलै १९९९ या दिवशी पाकिस्तानला हरवून आपण कारगिल आपल्या ताब्यात घेतले. हिंदुस्थानच्या सैन्याची ही विजय गाथा आहे. त्यांनी गाजवलेले शौर्य आणि प्राणाची तमा न बाळगता शत्रूशी लढून शत्रूचा केलेला पराभव आपल्या सर्वांनाच अभिमानास्पद आहे. पण त्यासाठी आपल्या अनेक वीर जवानांना आपले प्राण गमवावे लागले.

पाकिस्तान हा देश असा आहे जो स्वतः सुखाने जगत नाही आणि हिंदुस्थानला सुखाने जगू देत नाही. कश्मीर मधल्या पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेच्या उचापतींना हिंदुस्थानच्या सुरक्षा दलाने वेसण घातले. त्यामुळे हिंदुस्थानच्या विरोधात काही ना काही खोड्या काढण्यासाठी कारगिल मध्ये घुसखोरी केली. त्या मागचे कारण म्हणजे कश्मीरचा प्रश्न नव्याने उपस्थित करायचा. त्याचवेळी सियाचीनचा प्रश्न सोडवण्यासाठी काश्मीर मधील घुसखोरीचा लाभ उठवायचा असा दुहेरी हेतू पाकिस्तानचा होता.

हिंदुस्थानने सियाचीन मध्ये पाकिस्तानच्या उचापतींना तोडीस तोड उत्तर देऊन सियाचीनवरील आपले वर्चस्व सिद्ध केले याचाच पाकिस्तानला राग आला. कडाक्याच्या थंडीत द्रास पासून बटालिक पर्यंतच्या भागात कोणालाही कळणार नाही याची दखल घेऊन मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याचा डाव पाकिस्तानने टाकला. मुशर्रफ यांनी मश्को ते बटालिक या १४० किलोमीटर लांबीच्या पट्ट्यात घुसखोरी करण्याचा आदेश दिला. हाच आदेश ऑपरेशन अल्बदर मोहीम म्हणून ओळखला जातो. या मोहिमेची सिद्धता वर्ष १९९८ पासून सुरू करण्यात आली होती.

या युद्धात देशातल्या अनेक वीरांनी आपल्या प्राणांची बाजी लावली आणि पाकिस्तानी सैन्याला पराभूत केले. सर्वांचे स्मरण आपल्याला करता येणार नाही पण प्रतिनिधिक स्वरूपात आपण काही जणांचे स्मरण करून त्यांना मानवंदना देऊ शकतो.

१. कॅप्टन विक्रम बात्रा - ९ सप्टेंबर १९७४ या दिवशी पालमपूर हिमालय प्रदेशात गिरधारी लाल बात्रा आणि कमल कांता या दांपत्या पोटी जन्माला आलेला विक्रम बात्रा हा भारत मातेचा पुत्र जून१९९६ मध्ये माणिकशहा बटालियन मध्ये सहभागी झाला. तिथे त्यांनी १९ महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले त्यानंतर ६ डिसेंबर १९९७ मध्ये इंडियन मिलिटरी अकादमीची पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांची नियुक्ती१३ बटालियन, जम्मू कश्मीर रायफल्स मध्ये लेफ्टनंट या पदावर नियुक्ती झाली प्रशिक्षणानंतर पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर त्यांना १३ जम्मू आणि काश्मीर रायफल च्या उत्तर प्रदेशच्या शहाजहांपूर येथे जाण्याचा आदेश देण्यात आला. कारगिल युद्धात पॉईंट ५१४० सर करण्यात यश मिळाल्यावर त्यांना पॉईंट ४८७५ सर करण्याची कामगिरी सोपवण्यात आली. हे काम अत्यंत अवघड होते हा पॉईंट सर करताना ते अत्यंत शौर्याने लढत होते लढत होते. या रणकंदनात त्यांच्या सहकार्याला गोळी लागली. त्याला वाचवण्यासाठी विक्रम बात्रा पुढे सरसावले त्यांनी शत्रूवर जोरदार हल्ला केला. दुर्दैवाने या धुमश्चक्रीत त्यांना वीरगती प्राप्त झाली. देशाने मरणोत्तर परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले.

सैन्यात भरती झाल्यानंतर जेव्हा त्यांना सुट्टी मिळाली त्या सुट्टी ते घरी आले तेव्हा ते आपल्या घरच्या लोकांना सांगत होते, या तो मै तिरंगा फहराकर वापस आऊंगा, या मैं उसमे लिपटा हुआ वापस आऊंगा, लेकिन मै निश्चित रूपसे वापस आऊंगा. त्यांचे हे उद्गार खरे ठरले. त्यांच्या शौर्याला पराक्रमाला साजेल असेच हे उद्गार आहेत. त्यांचे हेच उद्गार आता त्यांचा परिचय करून देण्यास पुरेसे आहेत.

२. याच कारगिल युद्धात नायब सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांनी मोठी कामगिरी बजावली आहे त्यांनी टोलोलिंगवर ताबा मिळवला. ही मोहिम यशस्वी होण्यासाठी दोन अधिकारी, दोन जूनियर कमिशन अधिकारी आणि २१ सैनिकांनी आपले बलिदान दिले आहे. १६,५०० उंचीवर असलेल्या मोठ्या खडकावर तीन बंकर ताब्यात घेण्याचे काम त्यांच्यावर सोपवण्यात आले होते. दोरीच्या साह्याने ते वर चढून गेले. जे बंकर ताब्यात घ्यायचे होते त्याच बंकर मधून शत्रूने त्यांच्यावर गोळीबार केला पण न डगमगता त्यांनी त्यांच्याकडील एक हात बॉम्ब फेकला. त्यात चार पाकिस्तानचे सैनिक गारद झाले. त्यामुळे शत्रू कडून होणारा गोळीबार तत्काळ थांबला. आता त्यांना तोच सुळका चढून जाण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला. त्यांनी हा आपला संघर्ष तसाच पुढे चालू ठेवला त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांना सहाय्य मिळाले आणि पाकिस्तानचे उरलेले दोन बंकर ही नष्ट करण्यात त्यांना यश मिळाले. तिथे असलेल्या काही पाकिस्तानी सैनिकांना त्यांनी कंठस्नान घातले अशा प्रकारे ही कारगिल युद्धातली एक कठीण असलेली कामगिरी त्याने सहजतेने यशस्वी करून दाखवली.

आपल्या देशावर निस्वार्थपणे प्रेम करणारा एक सैनिक कोणत्याही अटीविना संकल्प करतो. मी आपल्याबरोबरच्या सैनिकांवर असलेले माझे प्रेम, राष्ट्रावर असलेली माझी भक्ती यासाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करण्यास मी सदैव सज्ज राहीन. आपल्या देशासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालताना मी मागचा पुढचा विचार करणार नाही.

सुभेदार योगेंद्रसिंह यादव यांचे हे उद्गार यांचा परिचय करून देतात. त्यांनाही परमवीर चक्राने गौरवण्यात आले.

३. लेफ्टनंट मनोज कुमार पांडे हे १/११ गुरखा रायफल्सचे जवान, यांनी आणि त्यांच्या तुकडीने बटालिक सेक्टरचे जौबार टॉप आणि खालुबार पहाडीवर पाकिस्तानच्या सैनिकांनी स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांच्याशी लढून त्यांनी पाकिस्तानच्या सैनिकांना तेथून घालवून दिले. पण या भीषण धूमचक्रित दुमस चक्रीत ते गंभीररीत्या घायाळ झाले. त्याही परिस्थितीत ते लढत राहिले. या युद्धात त्यांनी आपले बलिदान दिले. त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र बहाल करण्यात आले.

सैन्यात तुम्ही कशासाठी प्रवेश करत आहात असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी त्यांनी उत्तर दिले,

मला परमवीर चक्र जिंकण्याची इच्छा आहे.

४. लेफ्टनंट बलवान सिंह हे १८ ग्रेनेडियर्सचे जवान, त्यांच्यावर ईशान्य दिशेला असलेल्या टायगर हिल टॉप वर हल्ला करण्याची कामगिरी सोपवण्यात आली होती. १६,५०० फूट उंचीवर असलेला हा बर्फाच्छादित प्रदेश आहे. ते त्यांच्या तुकडीचे नेतृत्व करत होते. त्यांनी आपला मार्ग निश्चित केला होता. सलग १२ तास त्यांनी खडतर मार्गावरून वाटचाल केली. त्यांची तुकडी शत्रू सैन्याला सुगावा लागणार नाही अशा प्रकारे पर्वतारोहणाच्या उपकरणांचा उपयोग करून निश्चित स्थळी पोहोचली. अचानकपणे एवढ्या उंचीवर भारतीय सैनिकांना पाहून पाकिस्तानी सैनिकांना आश्चर्य वाटले. शत्रू सैन्यावर त्यांनी लगेचच गोळीबार करण्यास आरंभ केला. दोन्ही सैन्यात गोळीबार सुरू झाला. या गोळीबारात ते भयंकर जखमी झाले पण तशाही स्थितीत ते लढत राहिले. त्यांनी पाकिस्तानच्या चार सैनिकांना यमसदनी धाडले. त्यांच्या सहकार्यांनी सुद्धा अतुलनीय पराक्रम गाजवला आणि टायगर हिलवर हिंदुस्थानचा तिरंगा ध्वज फडकवला. त्यांनी आपल्या तुकडीतील सैनिकांना प्रेरणा दिली स्वतः नेतृत्व करून गंभीर रित्या घायाळ झालेले असताना सुद्धा शौर्य गाजवले म्हणून त्यांना महावीर चक्र देऊन गौरविण्यात आले.

अशा प्रकारे अनेक शूरवीरांनी या युद्धात अतुलनीय पराक्रम गाजवला आणि पाकिस्तानच्या लष्कराचे मनसुबे पूर्णपणे उधळून लावले.

या युद्धात मात्र पाकिस्तानी सैनिकांनी क्रौर्‍यालाही लाजवेल अशा क्रौर्याचे विकृत दर्शन घडवले. सौरभ कालिया आणि त्यांचे अन्य पाच सहकारी अर्जुन राम, भिकाराम, भवंरलाल बागरिया, मूलाराम आणि नरेश सिंह अशा सहा जणांना मारून त्यांच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली. हिंदुस्थानाला त्यांचे मृतदेह परत करताना अनेक अवयव छाटून मृतदेह विद्रूप करून पाठवून देण्यात आले.

गेली २५ वर्षे आंतरराष्ट्रीय न्यायालयात पाकिस्तानच्या विरोधात चाललेल्या खटल्याचा अजूनही निकाल लागला नाही आणि आपल्याला न्याय मिळाला नाही.

युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या सर्व वीर जवानांना आणि राष्ट्राच्या रक्षणार्थ आत्मबलिदान करणाऱ्या शूर वीरांना मानाचा मुजरा.

(संदर्भ - अंतरजाल (इंटरनेट))

- दुर्गेश जयवंत परुळकर

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande