सांगलीला पुराचा धोका, कोल्हापूर जलमय
* ८० मार्ग बंद, लष्कर, एनडीआरएफच्या तुकड्या तैनात * पुराच्या पाण्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित कोल्हापूर, २७ जुलै (हिं.स) : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे सांगली जिल्ह्य
पूर


* ८० मार्ग बंद, लष्कर, एनडीआरएफच्या तुकड्या तैनात

* पुराच्या पाण्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित

कोल्हापूर, २७ जुलै (हिं.स) : सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. सततच्या पावसामुळे सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा नद्यांची पाणी पातळी वाढली आहे. संभाव्य पुराचा धोका लक्षात घेता, प्रशासनाने एनडीआरएफ आणि लष्कराच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. सांगली शहरात सैन्य दलाचे ९० जवान आणि १० अधिकारी दाखल झाले आहेत. कोल्हापूर परिसरात शनिवारी सकाळी पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. पुराच्या पाण्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. भात, सोयाबीन, ऊस पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातही परिस्थिती तितकीच गंभीर आहे. शहरातील व्हीनस कॉर्नर परिसर, सीपीआर ते महावीर कॉलेज रोडवर पाणी शिरले असून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. करवीर तालुक्यातील आंबेवाडी प्रयाग चिखली परिसरातही एनडीआरएफची टीम दाखल झाली आहे. शिरोळ तालुक्यात मोठा पुराचा धोका असून अनेक गावातील नागरिकांनी स्थलांतर केले आहे. पंचगंगा नदी ४७ फुटांवर वाहत असून ९४ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्यांची पाणीपातळी वाढल्याने खरीप पिकांसह उसाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सुमारे पंधरा हजार हेक्टरवरील पिके पाण्याखाली आहेत, यातील साठ टक्के क्षेत्र उसाखालचे आहे. पाण्याच्या पुरामुळे दूध संघांना होणारा लाखो लिटर दूधाचा पुरवठाही ठप्प झाला आहे, यामुळे संकलनात घट झाली आहे. पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक राज्य आणि जिल्हा मार्ग बंद झाले आहेत, याचा थेट परिणाम दूध व्यवसायावर झाला आहे. गोकुळ आणि वारणासारख्या संस्थांचे ग्रामीण भागातील दूध संकलन प्रभावित झाले आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील ११ राज्य आणि ३७ जिल्हा मार्ग बंद आहेत. सांगली जिल्हा कारागृहातील ८० कैद्यांना कोल्हापूरच्या कळंबा कारागृहात हलवण्यात आले आहे. यामध्ये २० महिला आणि ६० पुरुष कैद्यांचा समावेश आहे.

संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. अलमट्टी धरणातून पाणी विसर्गाचे नियोजन करण्याची विनंती त्यांनी केली आहे. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पुराच्या स्थितीमुळे अनेक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून, नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे, असे सांगण्यात आले आहे.

पुराच्या पाण्याचा थेट फटका ७२ गावांना बसला आहे. पुराच्या पाण्याखाली ऊस, भात, सोयाबीन पिके आहेत. पाणी लवकर उतरले नाही तर नुकसान होणार आहे. अजून पाऊस सुरूच असल्याने नेमके किती क्षेत्र पाण्याखाली आहे, याचा अंदाज येणार नाही. - अजय कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी

हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao / सुधांशू जोशी


 rajesh pande