पाकिस्तानी घुसखोराला कंठस्नान, 3 सैनिक जखमी
श्रीनगर, 27 जुलै (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी लष्करामध्ये आज, शनिवारी चकमक झाली. यात एक जिहादी दहशतवादी ठार झाला. तर 3 भारतीय सैनिक जखमी झाले आहेत. यासंदर्भातील माहितीनुसार उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर
kupwara encounter


श्रीनगर, 27 जुलै (हिं.स.) : जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथे भारतीय सैन्य आणि पाकिस्तानी लष्करामध्ये आज, शनिवारी चकमक झाली. यात एक जिहादी दहशतवादी ठार झाला. तर 3 भारतीय सैनिक जखमी झाले आहेत.

यासंदर्भातील माहितीनुसार उत्तर काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवरील मच्छल (कुपवाडा) सेक्टरमध्ये पाकिस्तानी लष्कराच्या बॉर्डर ॲक्शन टीमने (बॅट) केलेला हल्ला भारतीय जवानांनी हाणून पाडला आहे. यात बॅटमध्ये सहभागी एक दहशतवादी मारला गेला आहे. पाकिस्तानी लष्कराच्या बॅटच्या तुकड्यांमध्ये अल-बद्र, तहरीकुल मुजाहिदीन, लष्कर आणि जैशच्या दहशतवाद्यांचा समावेश असतो. सध्या या परिसरात चकमक सुरू असून ती आटोपल्यावरच ही बॅटची कारवाई होती की घुसखोरीचा प्रयत्न होता हे स्पष्ट होईल. मच्छल सेक्टरमधील कुमकडी फॉरवर्ड पोस्टवर तैनात असलेल्या सैनिकांनी आज, शनिवारी पहाटे काही लोकांना पोस्टकडे जाताना पाहिले. त्याचवेळी त्यांनी त्यांना आव्हान दिले आणि सैनिकांचे आव्हान ऐकताच त्यांनी गोळीबार केला आणि परत पळू लागला. सैनिकांनीही प्रत्युत्तर दिले आणि त्यांना चकमकीत गुंतवले. सुमारे 3 तास दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू होता. हल्ला हाणून पाडताना तीन जवान गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात पाकिस्तानच्या बॅटचा एक दहशतवादी मारला गेला आहे, पण त्याचा मृतदेह एलओसीवरच पाकिस्तानी लष्कराच्या थेट फायरिंग रेंजमध्ये पडल्याची माहिती पुढे आलीय.

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande