- UPI, ATM सेवा ठप्प
मुंबई, १ ऑगस्ट (हिं.स.) : सी-एज टेक्नॉलॉजीज, SBI आणि TCS चा संयुक्त उपक्रम असलेल्या टेक्नोलॉजी सर्विस प्रोवाइडरवर मोठा सायबर हल्ला झाला. या हल्ल्याचा थेट परिणाम देशभरातील 300 हून अधिक सहकारी बँका आणि ग्रामीण प्रादेशिक बँकांवर झाला आहे, ज्यामुळे त्यांच्या विविध वित्तीय सेवा ठप्प झाल्या आहेत.
सी-एज टेक्नॉलॉजीजवर झालेल्या या सायबर हल्ल्यामुळे UPI आणि ATM सेवा देखील प्रभावित झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना पेमेंट करण्यासाठी UPI वापरण्यात, तसेच ATM मधून पैसे काढण्यात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विशेषतः ग्रामीण आणि निमशहरी भागातील नागरिकांना याचा मोठा फटका बसला आहे.
सायबर तज्ञांच्या मते, या हल्ल्यामुळे सर्वाधिक नुकसान सहकारी बँका आणि ग्रामीण प्रादेशिक बँकांच्या ग्राहकांना झाले आहे, कारण या बँका त्यांच्या तांत्रिक सेवा आणि डिजिटल व्यवहारांसाठी सी-एज टेक्नॉलॉजीजवर अवलंबून आहेत. तांत्रिक सेवांच्या ठप्प होण्यामुळे या बँकांचे ग्राहक व्यवहार पूर्ण करू शकत नाहीत, ज्यामुळे वित्तीय व्यवहार थांबले आहेत.बँकिंग प्रणालीवरील या सायबर हल्ल्यामुळे देशभरातील वित्तीय स्थैर्याला धोका निर्माण झाला आहे. वित्तीय संस्थांनी तातडीने हल्ल्याचा तपास सुरू केला असून, सेवांची पुनर्बहाली करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
सायबर सुरक्षा तज्ञांनी सल्ला दिला आहे की, बँकांनी आपली सुरक्षा प्रणाली अधिक मजबूत करावी, जेणेकरून भविष्यात अशा हल्ल्यांपासून बचाव करता येईल.सध्या, सी-एज टेक्नॉलॉजीजच्या तांत्रिक टीमकडून हल्ल्याचे स्वरूप आणि त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. ग्राहकांनी घाबरून न जाता संयम बाळगावा आणि बँकांकडून मिळालेल्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती बँकांनी केली आहे. UPI आणि ATM सेवा पुनर्प्राप्त होण्यास काही वेळ लागू शकतो, त्यामुळे ग्राहकांनी इतर उपलब्ध पेमेंट पर्यायांचा विचार करावा लागेल.
हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao / सुधांशू जोशी