देवळा, 1 ऑगस्ट, (हिं.स.) - दारूच्या नशेत दोन मित्रांमध्ये वाद होऊन वादाचे पर्यावसान मोठ्या भांडणात झाल्याने एकाकडून दुसऱ्याचा खून झाल्याची घटना मटाणे (ता. देवळा) येथे रात्री घडली. यामुळे येथे खळबळ उडाली असून याबाबत देवळा पोलीस ठाण्यासमोर रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण होते.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार मटाणे येथे कांद्याचा व्यवसाय करणारे दीपक निंबा साबळे (वय 45) व तेथील रंगकाम करणारे संतोष पवार उर्फ ज्वाल्या (वय 38) यांनी सकाळी सोबतच देवळा येथे मद्यपान केले. त्यात दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
त्यानंतर ते मटाणे येथे निघून गेले व दुपारी चार वाजेच्या दरम्यान मटाणे- कळवण रस्त्यावरील चिकनच्या दुकानाजवळ दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. वाद इतका विकोपाला गेला की, संतोष पवार याने दीपक साबळे याच्या छातीत धारदार शस्त्राने वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती देवळा पोलिसांना मिळताच पोलिसांनी संशयित आरोपी संतोष पवार याला तत्काळ ताब्यात घेतले
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI / हर्षदा गावकर