
लातूर, 28 डिसेंबर (हिं.स.)।
लातूर जिल्हा पोलिस दलाच्या अनैतिक मानवी वाहतूक कक्षाने २०२५ या वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेसाठी राबवलेल्या विशेष मोहिमांमुळे शेकडो कुटुंबांना त्यांचे हरवलेले आप्त पुन्हा मिळाले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान आणि गुप्त माहितीच्या आधारे कक्षाने मानवी तस्करीच्या मुळावर घाव घालत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे.
वर्षभरातील आकडेवारीनुसार, बेपत्ता झालेल्या ६१० महिलांपैकी ५२६ बेपत्ता महिला अन् १५६ अपहृत मुलींचा शोध लावण्यात आला आहे .
विशेष म्हणजे, अपहरणाच्या गंभीर प्रकरणांमध्येही पोलिसांनी तत्परता दाखवली आहे. १८३ अपहृत मुलींपैकी १५६ मुलींची सुटका करण्यात आली, तर ४५ अपहृत मुलांपैकी ४२ मुलांना सुरक्षितपणे त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
काम, शिक्षण किंवा लग्नाचे आमिष दाखवून महिला व मुलांची फसवणूक करण्याचे प्रमाण वाढत आहे. ही आंतरराज्यीय टोळ्यांची मोडस ऑपरेंडी असते. अशा प्रकरणांमध्ये भारतीय न्याय संहिता आणि बाल न्याय अधिनियमांतर्गत कठोर कारवाई केली जाते. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis