आदिवासी कातकरी तरुणी सोनू चंदर मुकणे प्रशिक्षित होवून बनली यशस्वी लेडीज टेलर
ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मोहरई या ग्रामीण आदिवासी भागातील कातकरी समाजाच्या श्रीमती सोनू चंदर मुकणे या तरुणीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक वर्षाचा शिवणकला ड्रेस मेकिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शहापूरच्या आदिवासी विकास प्रकल्पाकडून शंभर ट
आदिवासी कातकरी तरुणी सोनू चंदर मुकणे प्रशिक्षित होवून बनली यशस्वी लेडीज टेलर


ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील मोहरई या ग्रामीण आदिवासी भागातील कातकरी समाजाच्या श्रीमती सोनू चंदर मुकणे या तरुणीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एक वर्षाचा शिवणकला ड्रेस मेकिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. शहापूरच्या आदिवासी विकास प्रकल्पाकडून शंभर टक्के अनुदानावर मिळालेल्या अर्थसहाय्यातून तिने गावातच फॅशनेबल ब्लाऊज आणि महिलांचे कपडे शिवण्याचा टेलरिंग व्यवसाय सुरू केला. आदिवासी सोनू स्वतःच्या पायावर उभी राहिली. स्वयंरोजगारातून तिला आर्थिक उन्नतीचा मार्ग सापडला. श्रीमती सोनू चंदर मुकणे या आदिवासी कातकरी तरुणीची ही यशोगाथा…

महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक आदिवासी विकास आयुक्तालयातर्फे आदिवासी समाजासाठी केंद्रवर्ती अर्थसंकल्प म्हणजेच न्यूक्लियस बजेट अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत स्वयंरोजगाराचे प्रशिक्षण घेतलेल्या अनुसूचित जमातीच्या युवक युवतींना शंभर टक्के अनुदानावर स्वयंरोजगारासाठी व्यवसाय सुरू करण्याकरिता अर्थसहाय्य देण्याची योजना राबविली जाते. लाभार्थ्याचा 15% आर्थिक सहभाग आणि 85% शासकीय अनुदान अशाप्रकारे अशा प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या आदिवासी उमेदवारांना बँकांमार्फत आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येते. ठाणे जिल्ह्यात रोजगारासाठी भटकंती करणाऱ्या आदिवासी जमातीतील लाभार्थ्यांना ही योजना रोजगारासाठीचे स्थलांतर थांबवून गावातच स्वयंरोजगाराचे व्यवसाय उभारणीसाठी प्रोत्साहन देणारी ठरली आहे.

ठाणे जिल्ह्याच्या बहुसंख्य आदिवासी लोकसंख्या असलेल्या मुरबाड तालुक्यातील मोहरई या गावची 31 वर्षे वयाची श्रीमती सोनू चंदर मुकणे ही बी.ए. पर्यंत महाविद्यालयीन पदवीचे शिक्षण पूर्ण करणारी आदिवासी कातकरी समाजातील तरुणीचा भाग्योदय आदिवासी विकास विभागाच्या शंभर टक्के अनुदानाच्या योजनेने केला.

श्रीमती सोनू हिचा जन्म दि.1 मे 1993 रोजी मुरबाड पासून तीन किलोमीटर अंतरावरील मोहरई या गावचा. संपूर्ण कुटुंब शेतमजूरी, वीटभट्टी अशा कामासाठी सातत्याने रोजगारासाठी स्थलांतर करणारे. मात्र सोनूला लहानपणापासून उच्च शिक्षण घेण्याचा ध्यास होता. तिने पहिली ते पाचवी पर्यंतचे शिक्षण मोहरई गावात घेतले. आई-वडिलांच्या रोजगाराच्या स्थलांतरामुळे सहावी ते सातवी चे शिक्षण मुरबाड तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे पूर्ण केल्यानंतर कुटुंबातील आर्थिक हलाखीच्या परिस्थितीमुळे आई-वडिलांसह पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील शिनोली या मामाच्या गावी हे कुटुंब स्थलांतरित झाले. तेथे भीमाशंकर विद्यामंदिरात सोनुने आठवी ते दहावी पर्यंत शिक्षणाचा टप्पा गाठला. नंतर मुरबाड न्यू इंग्लिश स्कूलमध्ये अकरावी आणि बारावी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यानंतर शिवळे येथील कॉलेजमध्ये तेरावी ते पंधरा वी पर्यंतचे शिक्षण घेऊन सोनू बी.ए. पदवीधर बनली. तिचा या जिद्दीचा शैक्षणिक प्रवास रोजगाराच्या स्थलांतरावर समस्येवर मात करणारा थक्क करून टाकणारा होता.

पदवीधर झाल्यानंतर श्रीमती सोनू मुकणे हिला औद्योगिक प्रशिक्षण घेण्याचा ध्यास लागला. ती दूरच्या नात्याच्या बहिणीच्या हाताखाली शिवणकामाच्या व्यवसायात हात शिलाई करणे, काज-बटण लावणी, शिलाई मशीनच्या बॉबीन मध्ये दोरा कसा ओळायचा हे कौशल्याचे कामे शिकली. आणि त्यानंतर तिने मुरबाड तालुक्यातील कुडवली येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सन 2017-18 मध्ये शिवणकला ड्रेस मेकिंगचा एक वर्षे मुदतीचा औद्योगिक प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करून त्याचे शासकीय प्रमाणपत्र मिळविले आणि स्वतःचा टेलरिंग चा व्यवसाय करण्याचा संकल्प केला.

मुरबाडचे आदिवासी सामाजिक कार्यकर्ते तिचे आत्येभाऊ असणाऱ्या तुकाराम मुकणे यांना घेऊन शहापूरचे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे कार्यालय गाठून टेलरिंग व्यवसायासाठी अर्थसहाय्याचा प्रस्ताव सादर केला. त्यासाठी न्यूक्लिअस बजेट अंतर्गत स्वयंरोजगार योजनेचा अर्ज भरून देताना सोबत शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र, फोटो, टेलरिंग साहित्याच्या तपशीलाचे दरपत्रक आदी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केली. बँक ऑफ महाराष्ट्राच्या मुरबाड शाखेत बचत खाते उघडले. सर्व कागदपत्रांची छाननी झाल्यानंतर सोनू मुकणे हिला अनुदान मंजूर झाले. शहापूरच्या आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी वरिष्ठ निरीक्षक सखाराम भोये यांना तिच्या मोहरई या गावी पाठवून व्यवसायाच्या जागेची आणि परिसराची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. सन 2021-22 मध्ये तिच्या टेलरिंगच्या व्यवसायासाठी आदिवासी विकास विभागाने लाभार्थ्यांचा हिस्सा 7 हजार 500 आणि शासकीय अनुदान 42 हजार 500 असे एकूण 50 हजार रुपये अनुदान मंजूर करीत बँकेच्या खात्यात जमा केले.

या अर्थसहाय्यातून श्रीमती सोनू मुकणे हिने एक शिलाई मशीन, एक बिडिंग मशीन, विविध रंगांचे रीळ, कातरी, हूक, बटन, सुया, लेस, साडीचे फॉल, अस्तर, ब्लाऊजचे कटपीस असे टेलरिंगचे साहित्य खरेदी करून घरातच टेलरिंगचा व्यवसाय थाटला. सुरुवातीला ब्लाऊज शिलाईवर भर देऊन कटोरी, प्रिन्स कट, यू-गळा, व्ही-गळा अशा विविध प्रकारच्या डिझाइन्सचे ब्लाऊज तयार करून पंचक्रोशीतील महिलांवर आपल्या कौशल्याची छाप पाडली. ब्लाऊजच्या विविध डिझाईन्स पाहून गावातील आणि परिसरातील महिला, मुली ब्लाऊज शिवण्यासाठी गर्दी करू लागल्या. लग्नसराई आणि सण-समारंभासाठी कामाचा व्याप वाढला तेव्हा तिने आपली बहीण आणि वहिनीला मदतीला घेऊन त्यांनाही रोजगार मिळवून दिला. सोनू आठवड्याला 20 ते 30 ब्लाऊज शिवते, महिन्याकाठी सरासरी 70 ते 80 ब्लाऊजची मागणी पूर्ण करते, आता महिला आणि मुलींसाठी गणवेश आणि ड्रेस शिवण्याकडेही ती वळली आहे.

सोनू सारख्या आदिवासी कातकरी समाजातील तरुणीचा तिने रोजगार मिळविण्यासाठी केलेला जिद्दीचा प्रवास तिला सलाम करावा असाच असून ती या प्रवासात साथ देणाऱ्या मार्गदर्शकांसह आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनाही कृतज्ञपूर्वक धन्यवाद देते.

लेखक:-

धनंजय प्र. कासार,

सहाय्यक छायाचित्रकार,

जिल्हा माहिती कार्यालय, ठाणे

संपादन:-

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

ठाणे

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande