नागपूर, 12 सप्टेंबर (हिं.स.) : संघ ज्याला आत्मसात झाला, तो संयमित लिखाण करतो आणि त्याचा सर्वांना आधार वाटतो. ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांनी आपल्या कारकीर्दीत इतरांना आधार देऊन प्रोत्साहित केले, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. सुधीर पाठक यांच्या गुरुवारी नागपुरात आयोजित अमृत महोत्सवी सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, सुधीर पाठक व त्यांच्या पत्नी श्रीमती नीलिमा पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले की नियमीत संघात जाणे आणि संघ आत्मसात होणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. संघ आत्मसात झालेल्या व्यक्तींचा आधार समाजाला वाटत असतो. त्यामुळे विश्वास निर्माण होतो, तसा विश्वास सुधीर पाठक यांनी आपल्या संयमित लिखाणातून आणि व्यवहारातून निर्माण केला असे गौरवोद्गारही सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी काढले. तर नितीन गडकरी म्हणाले की, पत्रकारितेच्या क्षेत्रात लोकप्रबोधन आणि लोकसंस्कार देण्याची गरज आहे. हेच काम सुधीर पाठक यांनी व्रतस्थ जीवन जगत संयमित पद्धतीने केले. त्यांच्या लिखाणाची जोड आज नव्या पीढीला मिळणे आवश्यक असल्याचे गडकरी यांनी सांगितले. यावेळी सत्काराला उत्तर देताना सुधीर पाठक म्हणाले की, सरसंघचालकांच्या हस्ते सत्कार होण्याचे भाग्य मला लाभले, हीच माझी आयुष्यभराची कमाई असल्याचे सांगत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते सुधीर पाठक लिखित ‘आठवणींच्या हिंदोळ्यावर’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. श्रीकांत गाडगे, अनिल राजूरकर या त्यांच्या मित्रांनी बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. त्यानंतर नंदा आपटे, साप्ताहिक विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर, शेतकरी संघटनेचे विजय जावंधिया, मृणाल नानिवडेकर यांनी सुधीर पाठक यांच्यातील गुणांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. यासोबतच तरुण भारतचे माजी मुख्य संपादक लक्ष्मणराव जोशी व श्री नरकेसरी प्रकाशन संस्थेचे विद्यमान कार्याध्यक्ष अनिल दांडेकर यांनी देखील आठवणींना उजाळा दिला. या सोहळ्याला हिंदुस्थान समाचारचे अध्यक्ष अरविंद मार्डीकर, ज्येष्ठ पत्रकार श्रीपाद अपराजित, रमेश कुलकर्णी, सुनील कुहीकर आणि सामाजिक कार्यकर्ते गिरीश गांधी यांच्यासह पत्रकारिता व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
---------------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी