संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेले नगर शहरातील अष्टविनायक
महाराष्ट्रातील प्रसिध्द असलेल्या अष्टविनायकांप्रमाणेच नगर शहरात देखील आठ गणपती असून खासगी घरघुती स्वरूपातील तसेच ट्रस्ट मार्फत व्यवस्थापन केले जात असलेल्या या गणेश मूर्ती नगर शहरातील अष्टविनायक म्हणून प्रसिध्द आहेत.विशेष म्हणजे आठही मूर्ती अतिशय प्रा
संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेले नगर शहरातील अष्टविनायक


महाराष्ट्रातील प्रसिध्द असलेल्या अष्टविनायकांप्रमाणेच नगर शहरात देखील आठ गणपती असून खासगी घरघुती स्वरूपातील तसेच ट्रस्ट मार्फत व्यवस्थापन केले जात असलेल्या या गणेश मूर्ती नगर शहरातील अष्टविनायक म्हणून प्रसिध्द आहेत.विशेष म्हणजे आठही मूर्ती अतिशय प्राचीन स्वरूपाच्या आहेत.गणेशंमूर्तीपैकी 7 मूर्ती उजव्या सोंडेच्या व 1 मूर्ती डाव्या सोंडेची आहे.यातील काही ठिकाणी गणेश मूर्तींच्या देखरेखीसाठी ट्रस्ट स्थापन करण्यात आले असून काही ठिकाणी खासगी लोकच पिढ्यानपिढ्या श्रीगणेशांची पुजाअर्चा करीरत आहेत.घरात कोणतेही शुभकार्य सुरू करतांना या श्रीगणेशांच्या पुजनाने व गणेश स्तुतीनेच या कार्याचा प्रारंभ केला जातो.शहरातील या अष्टविनायक गणेशांना आता एक प्रकारचे सामाजिक स्वरूप प्राप्त झाले आहे.गणेश चतुर्था,अंगारकी चतुर्थी,श्री गणेश जयंती बरोबरच गणेशोत्सवाच्या दिवसांमध्ये ही भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी असते.त्यामुळे महाराष्ट्रातील प्रसिध्द अशा अष्टविनायकां पणराणेच अहमदनगर चे अष्टविनाय देखील आता प्रसिध्द होऊ लागले आहेत.

1) श्री विशाल गणपती- अहमदनगरचे श्रध्दास्थान व शहराचे ग्रामदैवत असलेले हे ठिकाण अष्टविनायकांपैकी एक प्रमुख स्थान आहे.विशाल गणपती,माळीवाडा गणपती,सिध्दी विनायक,मानाचा गणपती,महागणपती अशा विविध नावांनी हे स्थाप सुपरिचित आहे.पुर्वाभिमुख उजव्या सोंडेच्या या सुमारे साडे अकरा फूट उंचीच्या या विशालकाय गणेश मूर्तीचा उल्लेख गणेशपुराण या प्राचीन धर्मग्रंथात आढळतो.ऐतिहासिक असलेल्या नगर शहरात पुरातन काळी चाहुराणा बुद्रुक,चाहुराणा खुर्द,माळीवाडा, मोरचूद नगर,नालेगाव अशी नागरी वस्ती होती.या वस्त्या मिळूनच शहराची संपूर्ण हद्द होती.तेव्हापासून गावाच्या मध्यभागी असलेले श्री गणेशाचे हे स्थान नगर शहराचे ग्रामदैवत म्हणून ओळखले जाते. तीन हातांनी भक्तांना आशिर्वाद देणारी उजव्या सोंडेची श्री गणेशाची ही मूर्ती एकमेव व अव्दितीय असल्याचे मानले जाते. भगवान श्री गणेशाच्या मस्तकावर पुणेरी पगडी पहावयास मिळते.श्री गणेश मूर्तीच्या मागील बाजुला एका नाथपंथी साधुची समाधी व महादेवांची मोठी पिंडी आहे.त्यामुळेच गणेशाच्या पुजा अर्चा विधी यावर नाथ पंथीयांचा मोठा प्रभाव असल्याचे दिसते. अहमदनगर मध्ये कोणत्याही राजकीय,सामाजिक,अथवा अन्य कोणत्याही प्रकारच्या कार्याचा शुभारंभ श्री विशाल गणपतीच्या पुजनाने करण्याची जुनी परंपरा नगरमध्ये आहे.भाविकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करणारी देवता म्हणून विशाल गणपतीची ओळख आहे.1953 साली श्री विशाल गणपती मंदिराच्या व्यवस्थापना साठी माळीवाडा पंच देवस्थान ट्रस्टची स्थापना झाली.माजी नगराध्यक्ष स्व.जगन्नाथ आगरकर हे अनेक वर्षे या ट्रस्ट चे अध्यक्ष होते.सध्या त्यांचे सुपुत्र माजी नगराध्यक्ष अॅड.अभय आगरकर हे अध्यक्ष म्हणून काम पाहात आहेत.गेली काही वर्षे विशाल गणपती मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम हाती घेण्यात आले होते.हे काम पूर्ण झाले असून संगमरवरी दगडात अतिशय आकर्षक असे कोरीव काम करून देखणे मंदिर निर्माण केले आहे.शहराचे ग्रामदैवत असल्याने नगरमध्ये श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत श्री विशाल गणपतीचा रथ मिरवणुकीच्या अग्रभागी असतो.

2) अक्षता गणपती - शहरातील कोर्ट गल्ली भागात असलेला अक्षता गणपती हे अष्टविनायकांपैकी एक महत्वाचे स्थान आहे. शहरात प्रत्येक घरामध्ये लग्न,मौंज या सारख्या पवित्र मंगल कार्याचे निमंत्रण देण्याची सुरूवात या अक्षता गणपतीला अक्षत देऊन केली जाते.मंदिराच्या जागी पुरातन काळी एक विहिर होती.विविध प्रकारच्या पुजेच्या वेळी वापरण्यात आलेले निर्माल्य,तीर्थ,अक्षता लोकांच्या पायदळी तुडविल्या जाऊ नयेत या साठी या विहिरीत टाकल्या जात असत.त्यातील अक्षतांपासून ही मूर्ती तयार झालने अक्षता गणपती असे नाव पडल्याची अख्यायिका आहे.सुमारे साडेतीनशे वर्षांपूर्वी सज्जनगड येथील बालब्रह्मचारी श्रीधरस्वामी यांनी या मूर्तीची स्थापना केली.अक्षता गणपतीची मूर्ती उजव्या सोंडेची मूर्ती साडेपाच फूट उंचीची असून मांडी घालीून बसलेली आसनस्थ स्थितीतील ही मूर्ती तब्बल 350 वर्षांपूर्वीची आहे.सध्या किशोर जोशी व परिवारातील सदस्य मंदिराचे व्यवस्थापन व मूर्तीची नित्य पुजा करतात.जोशी घराण्यातील 12 वी पिढी अक्षता गणपती मंदिराचे व्यवस्थापन पाहाते आहे.

3) श्री शमी गणपती - नगर शहरातील दिल्ली दरवाजा दजवळ असलेले श्री शमी गणपती हे देखील अष्टविनायकां पैकी एक प्राचीन मंदिर आहे.सुमारे 150 वर्षाापूर्वी शमीच्या झाडांच्या मुळांपासून गणेशमूर्ती तयार झाली अशी अख्यायिका आहे.आजही शमी च्या वृक्षाखाली ही मूर्ती पर्वाभिमुख बसलेल्या स्थितीत आहे.भाविकांच्या नवसाला पावणारे जागृत देवस्थान अशी शमी गणपतीची ख्याती आहे.1942 पासून टी.व्ही.शुक्रे ट्रस्टच्या माध्यमातून श्री गणेश मूर्तीची पुजाअर्चा व मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जाते.काही वर्षांपूर्वी मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम पूर्ण करण्यात आले आहे.प्रत्येक चतुर्थी,मंगळवारी व गणेशोत्सवात अभिषेक व दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी असते.

4) मुळे वाड्यातील श्री सिध्दीविनायक गणेश - शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या देशमुख गल्लीत मुळे वाड्यातील श्री सिध्दी विनायक गणेशाची ही मूर्ती अतिशय सुबक व रेखीव आहे.स्वयंभू तेजपुंज असलेली ही गणेश मूर्ती स्व.भास्करराव मुळे यांच्या वाड्यातील आतील बाजुस आहे.मुळे कुटुंबियांनी वाड्यामध्ये गणपतीसाठी छोटेखानी मंदिर बांधले आहे.ही मूर्ती देखील 250-300 वर्षांपूर्वीची असावी असे मानले जाते.अनेक वर्षे शेंदूर लावल्याने गणेशाची मूर्ती शेंदुराच्या लेपांच्या आत झाकली गेली होती.मात्र काही वर्षांपूर्वी मूर्तीचा शेंदूर काढल्यानंतर सिध्दी विनायकाच्या काळ्या पाषाणातील मूर्तीच्या मूळ सुबक व मनमोहक रूपाचे दर्शन भावकिांना घडते आहे.मुळे परिवारातील श्री गिरीश मुळे हे पुजाअर्चा करतात.या गणपतीला प्रदक्षिणा घातलेली चालत नाही हे एक वेगळे वैशिष्ट्य आहे.मनोकामना पूर्ण झाल्याची प्रचिती अनेकांना आली आहे.गणेश चतुर्थी,संकष्टी चतुर्थी,अंगारकी चतुर्थी बरोबरच प्रत्येक वर्षी श्री गणेेश जयंतीचा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.

5) खाकीदास बाबा मठातील वरद विनायक - जुन्या नगर शहराच्या बाहेर लालटकी कडे जाणार्या रस्त्यावर असलेल्या खाकीदास बाबा मठातील वरद विनायकाची काळ्या पाषाणातील ही मूर्ती शहरातील प्रसिध्द अष्टविनायकांपैकी एक महत्वाचे स्थान आहे.मठाचे संस्थापक खाकीदास बाबा हे हठयोगी संत होते.सुमारे 400 वर्षांपूर्वी त्यांनी काळ्या पाषाणातील या वरद विनायकाची स्थापना केली.नेहेमी आढळणार्या शस्त्रांपैकी कोणतेही आयुध(शस्त्र) या गणपतीच्या हातांमध्ये नाही हे खास वैशिष्ट्य आहे.श्री वरद विनायकाचे वरील दोन्ही हात भाविकांना आशिर्वाद देण्याच्या स्थितीत असून खालच्या एका हातात मोदक असून दुसरा हात मांडीवर ठेवलेला आहे.1936 साली खाकीदास बाबा माहेश्वरी मठ ट्रस्ट ची स्थापना झाल्यापासून ट्रस्टच्या माध्यमातून मंदिराचे व्यवस्थापन पाहिले जात आहे.प्रत्येक बुदवारी या वरद विनायकाचे दर्शन घेतल्यास इच्छापूर्ती होते अशी भाविकांची श्रध्दा आहे.

6) वाळके वाड्यातील पावन गणपती - नवसाला पावणारा गणपती अशी ओळख असलेल्या वाळके वाड्यातील पावन गणपती हा नगर मधील अष्टविनायकांपैकी एक असून हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आहे.भाविकांच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून पावन गणपती असे नाव पडल्याचे सांगितले जाते.वाळके वाड्यातील स्वयंभू पावन गणपतीची पुजा अर्चा वाळके कुटुंबियांकडून केली जाते.संकष्टी चतुर्थीला भाविक आपला संकल्प अथवा मनोकामना श्री गणेशा समोर सांगतात.त्या नंतर संकल्प अथवा इच्छापूर्ती झाल्यानंतर अंगारकी चतुर्थीच्या दिवशी नवसपूर्ती केली जाते अशी वाळके वाड्यातील गणपतीची प्रसिध्दी आहे.

7) सरदार मिरीकर वाड्यातील श्री गणेश - शहराच्या मध्यभागी असलेल्या कोर्टगल्ली परिसरात ऐतिहासिक सरदार स्व.बाबासाहेब मिरीकर वाड्यातील श्री गणेशाची ही मूर्ती अष्टविनायकांपैकी एक महत्वाचे स्थान आहे.उजव्या सोंडेची उत्तराभिमुख असलेली ही मूर्ती मिरीकर वाड्यात पायथ्याशी खोलवर असलेल्या कोनाड्यात आहे.या मूर्तीला मिरीकर परिवारातील सदस्य प्रत्येक चतुर्थीला अभिषेक करतात.

8) वाडेकर वाड्यातील श्री सिध्दी विनायक - नगर शहरात अर्बन बँक रस्त्यावर वाडेकर यांच्या वाड्यातील श्री सिध्दी विनायकाची मूर्ती वैशिष्ट्यपूण4 आहे.महाराष्ट्रातील सिध्दटेक येथील सिध्दीविनायकाच्या श्री गणेश मूर्तीची ही हुबेहूब प्रतिकृती आहे.नागाचे जानवे धारण केलेली व हातात परशू असलेली ही संगमरवरी गणेशमूर्ती अर्बन बँक रस्त्यावरील वसंत वाडेकर यांच्या वाड्यात आहे. ही सिध्दी विनायकाची मूर्ती सुमारे 150 वर्षांपूर्वीची आहे. वाडेकर परिवारातील सदस्य सिध्दी विनायकाच्या या मूर्तीची नित्य पुजा अर्चा करतात.

हिंदुस्थान समाचार / Shirish Kulkarni


 rajesh pande