अकोल्यात 30 वर्षानंतर पुन्हा भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा!
अकोला, 16 सप्टेंबर (हिं.स.)। तब्बल तीस वर्षानंतर त्याच विद्यार्थ्यांची अनोखी शाळा पुन्हा भरली आणि त्याच गुरुजींनी त्यांना आनंदी जीवनाचे लाखमोलाचे गुरुमंत्र दिले. आपल्या मित्रांना तीस वर्षानंतर पाहून अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. शाळेचे दि
P


अकोला, 16 सप्टेंबर (हिं.स.)।

तब्बल तीस वर्षानंतर त्याच विद्यार्थ्यांची अनोखी शाळा पुन्हा भरली आणि त्याच गुरुजींनी त्यांना आनंदी जीवनाचे लाखमोलाचे गुरुमंत्र दिले. आपल्या मित्रांना तीस वर्षानंतर पाहून अनेकांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले.

शाळेचे दिवस संपले की प्रत्येकजण आपल्या करियरसाठी वेगवेगळ्या क्षेत्राकडे धाव घेतो. मात्र ज्या शाळेत आपण शिकलो, घडलो, वेगवेगळ्या भागातील विद्यार्थ्यांबरोबर आपण मैत्रीचे नाते जोडले, ती नाळ मात्र तशीच असते. पुन्हा एकदा भेटावे, सर्वांसोबत हितगुज करावे असे सर्वांनाच वाटते. पण प्रत्येकजणच आपआपल्या नोकरी-धंद्यात, संसारात व्यस्त असल्यामुळे ते सहजासहजी शक्य होत नाही. मात्र अशक्यही नसते, ज्या शाळेत आपण घडलो, आयुष्य जगण्याचे तंत्र-मंत्र मिळाले, त्या शाळेतील पुन्हा एकदा त्याच विद्यार्थी मित्रांसोबत पुन्हा 30 वर्षानंतर भेटण्याची संधी चालून आली. ती म्हणजे या स्नेह मिलन सोहळ्यामुळे. 1991 ते 1996 च्या तुकडीतील मित्र क्लास फ्रेंड्स या नावाने व्हाट्स अँप ग्रुप मधून एकमेकांशी संपर्कात आले. अशातच सर्वांनी एकत्र येऊन कुठेतरी भेटून शाळेतील आठवणींना उजाळा द्यावा अशी इच्छा व्यक्त केली. त्याला सर्व मित्रांनी सकारात्मक प्रतिसाद देत हिवरखेड येथील निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या विघ्नहर्ता लॉन मध्ये भेटण्याची योजना आखून स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात केला. अखेर तो दिवस उजळला. हळूहळू सर्व मित्र एकत्र गोळा झाल्यानंतर प्रत्येकाने आप आपली ओळख करून दिली. हिवरखेड येथील जिल्हा परिषद महात्मा गांधी विद्यालयातील 80 हुन अधिक विद्यार्थी, माजी वर्गमित्र इतक्या वर्षानंतरही पहिल्या भेटीत शाळेतील ते चेहरे आठवित होते. व हळुहळु सर्वांनी एकमेकांशी मनमुराद गप्पा करून नव्या-जुन्या आठवणींना उजाळा देत एकमेकांच्या परिवारा_ विषयी, कामकाजाविषयी व सध्या आपल्या आयुष्यात काय चालल आहे हे एकमेकांना सांगतांना गप्पा रंगत गेल्या.

1991 ते 1996 असे पाचवी पासून दहावी पर्यंत सोबत शिकलेल्या बॅचचे विद्यार्थ्यांनी आज आपल्या मित्रांकडे बघितले तर 30 वर्षानंतर ते चेहरे दिसले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. आयुष्यातले सर्व क्षण आठवणीत राहतात असे नाही, पण काही क्षण असे असतात की, जे विसरु म्हणताही विसरता येत नाही. आपण वयाने कितीही मोठे झालो किंवा आपापल्या क्षेत्रात कितीही यशस्वी झालो तरी शाळेचे ते सोनेरी दिवस आपण कधीच विसरू शकत नाही, पण वेळ कुणासाठी थांबत नाही आणि मागे पडलेले दिवस पुन्हा येत नाही. पण ह्या सर्व आठवणी अस्मरणीय असतात. बालपणातील मैत्री ही अवखळ, उनाड, परिपक्व नसली तरीही सतत हवीहवीशी वाटणारी असते. शाळेचे विश्व आणि मित्र हे एकमेकांशिवाय अधुरे आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande