जम्मू-काश्मीर : पहिल्या टप्प्यात 58.85 टक्के मतदान
जम्मू, 18 सप्टेंबर (हिं.स.) : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 24 जागांसाठी आज, बुधवारी 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 58.85 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात किश्तवाड येथे सर्वाधिक 77.23 आणि पुल
जम्मू काश्मिरातील मतदानासाठीच्या रांगा


जम्मू, 18 सप्टेंबर (हिं.स.) : जम्मू-काश्मीर विधानसभेच्या 24 जागांसाठी आज, बुधवारी 18 सप्टेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान झाले. यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत 58.85 टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. पहिल्या टप्प्यात किश्तवाड येथे सर्वाधिक 77.23 आणि पुलवामा येथे सर्वात कमी 46.03 टक्के मतदान झाले.

राज्यातील विधानसभेच्या 24 जागांवर मतदान झाले. यात 90 अपक्षांसह 219 उमेदवार मैदानात असून 23 लाखांहून अधिक मतदात्यांनी या उमेदवारांच्या भाग्याचा फैसला इव्हीएममध्ये नोंदवला. जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होत आहेत. राज्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अनंतनाग जिल्ह्यातील 7 जगांवर 54.17 टक्के, डोडा जिल्ह्यामधील 3 जागांवर 69.33 टक्के, किश्तवाडच्या 3 जागांवर 77.23 टक्के, कुलगामच्या 3 जागांवर 61.57 टक्के, पुलवामा येथील 4 जागांवर 46.03 टक्के, रामबन येथील 2 जागांवर 67,71 टक्के आणि शोपियां जिल्ह्यामधील 2 जागांवर 53,64 टक्के मतदान झाले. राज्यातील 24 जागांवर पहिल्या टप्प्यात एकूण 58.85 टक्के मतदान झाले.

जम्मू-काश्मिरात तब्बल 10 वर्षांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय पक्षांबरोबरच मतदारांमध्येही निवडणुकीसाठी मोठा उत्साह आहे. पहिल्या टप्प्यात ज्या जागांवर मतदान होणार आहे, त्या जागांवर काँग्रेस-एनसी आघाडी, पीडीपी आणि इतर अनेक पक्षांचे उमेदवार निवडणूक रंजक बनवत आहेत.

-------------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande