लेबनॉन, २४ सप्टेंबर (हिं.स.) : इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठिकाणांवर मोठ्या प्रमाणावर हवाई हल्ले केले, ज्यात एका दिवसात ४९२ लोकांचा मृत्यू झाला असून १,६८५ पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे. मृतांमध्ये २५ लहान मुले आणि ५८ महिलांचा समावेश आहे. हा संघर्षातील एक प्राणघातक दिवस मानला जात आहे.
इस्रायली लष्कराच्या मते, त्यांनी हिजबुल्लाहच्या १,३०० पेक्षा जास्त ठिकाणांवर हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे हजारो कुटुंबांना आपली घरे सोडून पळावे लागले. लेबनॉनमधील नागरिकांना इस्रायलने हिजबुल्लाहच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचा इशारा दिला होता.
हिजबुल्लाहनेही प्रत्युत्तरादाखल इस्रायलवर १५० पेक्षा जास्त रॉकेट डागले, ज्यामुळे इस्रायलने आपले हवाई हल्ले तीव्र केले. इस्रायली संरक्षण दलाने सांगितले की, त्यांनी अनेक हिजबुल्लाह रॉकेट पाडले आहेत.
या हिंसाचारात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून लेबनॉनमधील रुग्णालयांना शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे, कारण सध्या जखमी लोकांवर उपचार करण्यावर भर दिला जात आहे.
हिंदुस्थान समाचार / Shuddhodana Mangorao