अस्ताना, 1 जुलै (हिं.स.)।अनेक मुस्लिम देशांमध्ये हिजाब बाबत नियम खूप कडक आहेत. अशातच, मुस्लिम बहुल कझाकस्तानमध्ये सरकारने चेहरा झाकण्यावर बंदी घातली आहे. या कायद्यांतर्गत सार्वजनिक ठिकाणी नकाब आणि चेहरा झाकणाऱ्या सर्व प्रकारच्या वस्त्रांवर आता बंदी लागू करण्यात आली आहे. हा विधेयक आता अंतिम मंजुरीसाठी कझाकिस्तानचे राष्ट्रपती कासिम-जोमार्ट टोकेव यांच्याकडे पाठवण्यात आला आहे. स्थानिक माध्यमांच्या वृत्तानुसार, सरकारने हा निर्णय देशाची सुरक्षा आणि धर्मनिरपेक्ष ओळख टिकवून ठेवण्यासाठी घेतला आहे.यानुसार, कझाकस्तानमध्ये कोणीही आपला चेहरा झाकू शकणार नाही.
अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, चेहरा झाकणारे कपडे परिधान केल्यास कायदा आणि अंमलबजावणी यंत्रणांना संबंधित व्यक्तीची ओळख पटवणे कठीण होते. यामुळे देशाच्या सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, या विधेयकात काही विशिष्ट परिस्थितींमध्ये सूट देण्यात आली आहे. एखाद्या व्यक्तीने वैद्यकीय कारण, हवामान, कार्यालयीन गरज, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा नागरी संरक्षणामुळे चेहरा झाकलेला असल्यास, त्याला या बंदीपासून सूट दिली जाईल. सरकारचे म्हणणे आहे की, देशाच्या धर्मनिरपेक्ष धोरणांची प्रतिमा आणि पारंपरिक सांस्कृतिक मूल्ये टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की,नकाब आणि पूर्ण चेहरा झाकणारे कपडे इस्लाममध्ये बंधनकारक नाहीत आणि या प्रथा अनेकदा परदेशी धार्मिक प्रभावांशी संबंधित असतात.
मार्च २०२४ मध्ये राष्ट्रपती टोकेव यांनी देखील म्हटले होते की,नकाब ही एक जुनी आणि नैसर्गिक नसलेली पोशाख पद्धत आहे, जी देशातील महिलांवर नव्या कट्टरपंथीयांकडून लादली गेली आहे. त्यांनी याला कझाकिस्तानच्या पारंपरिक संस्कृतीविरोधी ठरवले. गेल्या काही वर्षांमध्ये कझाकिस्तानच्या रस्त्यांवर नकाब घालणाऱ्या आणि संपूर्ण शरीर काळ्या कपड्यांनी झाकणाऱ्या महिलांची संख्या वाढली आहे. यामुळे देशात बदलत चाललेल्या धार्मिक प्रवृत्तीचे दर्शन होते, जी त्यांच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेपासून पूर्णपणे वेगळी आहे.
यापूर्वी, वर्ष २०१७ मध्ये कझाकिस्तानमध्ये शाळकरी मुलींना हिजाब घालण्यावर बंदी घालण्यात आली होती. वर्ष २०२३ मध्ये ही बंदी सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवरही लागू करण्यात आली. या निर्णयाच्या विरोधात १५० हून अधिक मुलींनी शाळेत न जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळीही राष्ट्रपती टोकेव यांनी स्पष्ट केले होते की शाळा हे एक शैक्षणिक संस्थान आहे, जिथे धार्मिक पोशाखाला स्थान दिले जाऊ शकत नाही.
कझाकिस्तानच्या लोकसंख्येपैकी ७० टक्क्यांहून अधिक लोक मुस्लिम आहेत, पण देशाची घटनात्मक व्यवस्था धर्मापासून स्वतंत्र आहे. येथे सरकारच्या धोरणांचा आधार धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वांवर आहे. राष्ट्रपती टोकेव स्वतःही इस्लामवर विश्वास ठेवतात आणि त्यासंबंधित श्रद्धा पाळतात. त्यांनी मक्केत उमरा देखील केली आहे आणि रमजान महिन्यात उपवासही करतात. तरीसुद्धा, ते देशाची धोरणे धर्मनिरपेक्ष ठेवण्याच्या बाजूने आहेत.कझाकिस्तान असा निर्णय घेणारा पहिला देश नाही. उझबेकिस्तान आणि किर्गिस्तानसारख्या इतर देशांनीही २०२३ आणि २०२५ मध्ये सार्वजनिक ठिकाणी पडदे व चेहरा झाकणारे कपडे यांच्यावर बंदी घातली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode