केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सांगता
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर (हिं.स.) - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या 3 दिवसांच्या (23-26 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आज यशस्वी सांगता झाली. गोयल यांनी ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री सिनेटर डॉन फॅरेल यांच्यासमवेत 25 ऑ
पीयूष गोयल ऑस्ट्रेलिया दौरा


नवी दिल्ली, 26 सप्टेंबर (हिं.स.) - केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांच्या 3 दिवसांच्या (23-26 सप्टेंबर) ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आज यशस्वी सांगता झाली.

गोयल यांनी ऑस्ट्रेलियाचे व्यापार आणि पर्यटन मंत्री सिनेटर डॉन फॅरेल यांच्यासमवेत 25 ऑगस्ट 2024 रोजी ॲडलेड येथे 19 व्या संयुक्त मंत्रिस्तरीय आयोगाच्या बैठकीचे सह-अध्यक्षस्थान भूषवले. भारत आणि ऑस्ट्रेलियाची आर्थिक प्राधान्ये आणि सहकार्याची क्षेत्रे यावर ही चर्चा केंद्रित होती. यात प्रामुख्याने आर्थिक सहकार्य आणि व्यापार करार ( ईसीटीए ) उपक्रमांची अंमलबजावणी; व्यापक आर्थिक सहकार्य करार ( सीईसीए ) चर्चेतील प्रगती इत्यादीचा समावेश होता. दोन्ही नेत्यांनी 2030 पर्यंत 100 अब्ज ऑस्ट्रेलियाई डॉलर द्विपक्षीय व्यापार साध्य करण्याच्या उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला. तसेच देशांतर्गत सेवा नियमन मुद्द्यासह, जी 20, आयपीईएफ आणि डब्ल्यूटीओ अशा बहुपक्षीय आणि इतर क्षेत्रीय मंचांवर सहकार्य वृद्धिंगत करण्याबाबत त्यांनी चर्चा केली.

बैठकीनंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत गोयल यांनी सिडनी येथे गुंतवणूक, व्यापार, तंत्रज्ञान आणि पर्यटन कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली.

फॅरेल यांनी भारतासमवेत सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी ऑस्ट्रेलियन व्यवसाय,संस्था आणि विद्यापीठांसाठी 10 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलरचे नवे अनुदान जाहीर केले. या नव्या अनुदानांतर्गत समुदाय नेते आणि व्यापार, नवोन्मेष, सांस्कृतिक संबंध यांना प्रोत्साहन देण्यावर काम करणाऱ्या ऑस्ट्रेलियाई संस्थांना 5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर दिले जातील. याखेरीज सामाईक आव्हानांवर संशोधन करणाऱ्या ऑस्ट्रेलियाई विद्यापीठांना भारतीय विद्यार्थ्यांचे आतिथ्य आणि फेलोशिपसाठी 5 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर दिले जातील.

मेक इन इंडिया' आणि 'फ्यूचर मेड इन ऑस्ट्रेलिया' उपक्रम परस्परांना पूरक आहेत आणि दोन्ही देशांना एकत्र काम करण्याच्या संधी यात आहेत यावर दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली.

दक्षिण ऑस्ट्रेलियाचे राज्यपाल फ्रान्सिस ॲडमसन एसी यांनी गोयल आणि प्रतिनिधीमंडळासाठी स्नेहभोजनाचे आयोजन केले होते.

उत्तरार्धात पीयूष गोयल आणि डॉन फॅरेल यांनी लॉट फोर्टीन नवोन्मेष परिसरातील ऑस्ट्रेलियाच्या अंतराळ संस्थेला भेट दिली. येथे त्यांनी ऑस्ट्रेलियन अंतराळ कंपन्यांशी संवाद साधला.

गोयल यांच्या भेटीमुळे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील आर्थिक आणि वाणिज्यिक संबंधांना आणखी गती मिळेल. तसेच सीईसीएची प्रगती आणि ईसीटीए उपक्रमांची अंमलबजावणी याबाबत दोन्ही देशांना आढावा घेता आला. त्याचसोबत अनेक ऑस्ट्रेलियाई आणि भारतीय उद्योजकांसोबत झालेल्या संवादातून दोन्ही देशांमधील व्यापार आणि गुंतवणूक संबंध वृद्धिंगत होण्यास साहाय्य मिळेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande