नागपूर,29सप्टेंबर (हिं.स.) :नागपुरच्या दौऱ्यात अमित शहा यांनी बंद दारा आड उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना संपवण्याचा कानमंत्र दिला. पण, उद्धव ठाकरेला जनतेशिवाय कुणीही संपवू शकत नाही. हिंमत असेल तर विधानसभेत खुले आम येवून शिवसेना संपवून दाखवा, असे आव्हान शिवसेना (उबाठा) गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित सभेत ते बाेलत होते. यावेळी खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख, खासदार श्यामकुमार बर्वे आदी उपस्थित होते.
यावेळी ठाकरे म्हणाले की,अमित शाह शरद पवार आणि मला संपवण्यासाठी निघाले आहे. नागपुरात बंद दाराआड शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना संपवण्याचे निर्देश दिले. उद्धव ठाकरेला फक्त जनताच संपवू शकते. हा लढा माझा, शरद पवार आणि महाविकास आघाडीचा नाही. तर महाराष्ट्रातील जनतेचा आहे असे ठाकरे यांनी सुनावले. अफजल खानासारखा यांचा राजकारणातील कोथळा वाघनखांनी बाहेर काढू असे ठाकरे म्हणाले. माझ्यावर हिंदुत्व सोडल्याचा, शिवसेनेची काँग्रेस झाल्याचा आरोप करतात. युतीमध्ये पहिले 25 ते 30 वर्षे भाजपासोबत होतो. भाजपाने युती तोडली. तेव्हा हिंदु नव्हतो काय असा सवाल ठाकरे यांनी केला. इतकी वर्षे सोबत राहुन शिवसेनेची भाजपा नाही झाली. तर काँग्रेस सोबत राहून काँग्रेस कशी होईल, असा सवाल ठाकरे यांनी केला. एकत्र आल्या नंतर कद्रुपणा करायचा नाही. पाठीमागून वार करायचा नाही असे ठरवले आहे. रश्मी बर्वे यांना जात प्रमाणपत्र नाकारले. न्यायालयाने ते अवैध ठरवले. आता अवैध ठरवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे असे ठाकरे म्हणाले.
मालवणला वर्ष पूर्ण होण्याच्या आधी छत्रपतींचा पुतळा कोसळला. त्यातही पैसे खाल्ले असा आरोप ठाकरे यांनी केला. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना झुंजवत ठेवून मुख्य शहरातील मोक्याचे भूखंडाचे श्रीखंड बावनकुळेंसारखे लोक खात आहे. आपले सरकार आल्यावर आपल्या माणसांना नवे भूखंड देवू असे ठाकरे यांनी सांगितले.
आमचे हिंदुत्व हे साधूसंतांचे आहे. शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे. आम्ही हर हर महादेव म्हणणारे आहोत. मिर्झा राजे जयसिंग हिंदूच होता. पण औरंगजेबाचे पाय चाटत होता. तसेच गद्दार आपल्याकडून तिकडे गेले. गद्दारांनीच घात केला. त्याही काळात मिर्झा राजे प्रचंड समुद्रासारखे सैन्य घेऊन आला होता. या राजाचा जीव सिंहासनात नाही तर रयतेत अडकलेला आहे हे त्याला कळलं. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात न लावणारा हा राजा आहे, हे त्याला माहीत होते. म्हणून त्याने रयतेची कत्तल सुरू केली. त्यामुळे महाराजांकडे पर्याय नव्हता. त्यामुळे ते शरण गेले.
शिवाजी महाराज आग्र्याला गेले. परत आले. तेव्हा त्यांच्याकडे काहीच नव्हते. राज्य नव्हते, गड किल्ले नव्हते. तसाच आपला पक्ष चोरला आहे. चिन्ह चोरले आहे. माझ्या वडिलांचा फोटो चोरला आहे. पण आता शिवाजी महाराजांची ती जिद्द आपण घ्यायला पाहिजे. म्हणूनच आपण महाराजांची पूजा करत असतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
_____________
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी