रत्नागिरी, 4 सप्टेंबर, (हिं. स.) : कौशल्य विकास केंद्राचा पंडित दीनदयाल उपाध्याय मेळावा आणि मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळावा येथे आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये २०० तरुणांनी सहभाग घेतला. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या आवारामधील कौशल्य विकास केंद्रातर्फे फिनोलेक्स कॉलेज ऑफ इंजिनीयरिंगमध्ये हा रोजगार मेळावा झाला. मेळाव्यात विविध क्षेत्रामधील कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी मुलाखती देऊन संधीचा फायदा घेतला. कौशल्य विकास केंद्र नेहमीच हॉस्पिटॅलिटी आणि टुरिझम क्षेत्रामध्ये व्यवसायाच्या व नोकरीच्या विविध संधी उपलब्ध करून देत असते. या मेळाव्याच्या सहभागासाठी जिल्हा उद्योग रोजगार केंद्राच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती इनुजा शेख व इतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
---------------
हिंदुस्थान समाचार / बाळकृष्ण कोनकर