सोलापूर, 15 जानेवारी (हिं.स.)।
एकमेकांत गुंतलेल्या धाग्यांनिशी बनलेल्या विशिष्ट आणि सुबक नक्षीकाम असलेल्या सोलापुरी चादरी म्हणजे महाराष्ट्रातील ‘भौगोलिक मानांकन’ (जीआय) मिळालेले पहिले उत्पादन. ६०च्या दशकापासून सोलापुरातून देशभर पोहोचत असलेल्या या चादरींना २००५ मध्ये मानांकन मिळाले, पण या व्यवसायाला आता उतरती कळा लागली आहे. देशाच्या अन्य भागांतून या चादरींची हुबेहूब पण दर्जा नसलेली नक्कल करून बनवलेल्या चादरी ‘सोलापुरी’ म्हणून बाजारात खपू लागल्या तसा मूळच्या सोलापुरी चादरींचा रंगच उडाला. एके काळी सोलापूरच्या वस्त्रोद्योगाचे ‘भारवाही’ असलेले हे उत्पादन आता जेमतेम दहा टक्क्यांवर घसरले आहे.
हरियाणातील पानिपत, पंजाबमधील लुधियानासह तमिळनाडूतील इरोड, करूर, चेन्नमलाई, मदुराईतून यंत्रमागावर तयार होणाऱ्या चादरी सोलापुरी चादरी म्हणून स्वस्त दरात विकल्या जात आहेत. दिसायला हुबेहूब, सुंदर नक्षीकाम आणि आकर्षक रंगसंगतीच्या या बनावट सोलापुरी चादरी वजनाने तेवढ्याच हलक्या, कमी टिकाऊ आणि स्वस्त दरात सहज उपलब्ध होतात. याच बनावट चादरींनी सोलापूरची संपूर्ण बाजारपेठ काबीज केली आहे. ही नक्कल थांबविण्यासाठी यापूर्वी स्थानिक उद्योजकांनी केंद्रीय वस्त्रोद्योग समितीकडे गाऱ्हाणे मांडले होते. त्या प्रयत्नांतून सोलापुरी चादरीला जीआय-८ आणि टॉवेल उत्पादनाला जीआय-९ (जिओग्राफिकल इंडिकेशन रजिस्ट्रेशन) मानांकन मिळविले होते. परंतु त्याचा काहीच फरक पडलेला नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड