चंद्रपूर: 1  लक्ष 79 हजार 857 प्रौढ नागरिकांचे होणार लसीकरण
चंद्रपूर, 4 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रौढ बीसीजी लसीकरणाची सुरवात करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी स्वत: डॉक्टरांनी लस घेऊन लसीकरणास सुरवात झाली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 1 ल
चंद्रपूर: 1  लक्ष 79 हजार 857 प्रौढ नागरिकांचे होणार लसीकरण


चंद्रपूर, 4 सप्टेंबर (हिं.स.)। जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत येणाऱ्या दुर्गापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रौढ बीसीजी लसीकरणाची सुरवात करण्यात आली. विशेष म्हणजे यावेळी स्वत: डॉक्टरांनी लस घेऊन लसीकरणास सुरवात झाली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील 1 लक्ष 79 हजार 857 प्रौढ नागरिकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन वैद्यकीय अधिकारी डॉ.बंडू रामटेके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी माता बाल संगोपन अधिकारी डॉ. प्राची नेहुलकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रिती राजगोपाल, डॉ. माधुरी मेश्राम व उज्वला सातपुते आदी उपस्थित होते. राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सन 2025 पर्यंत देशाला क्षयरोग मुक्त करण्याचा केंद्र शासनाचा संकल्प आहे. त्यानुसार जिल्ह्यात 18 वर्षावरील प्रौढ व्यक्तींना बीसीजी लस देण्यात येईल. या मोहिमेत जिल्ह्यातील 1 लाख 79 हजार 857 प्रौढ व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. ललित पटले यांनी दिली. पुढे ते म्हणाले, बीसीजी लस जन्मत: बाळाला देत असल्यामुळे ती पूर्णत: सुरक्षित व उपयुक्त आहे. बीसीजी लस लहान मुलांप्रमाणेच प्रौढ व्यक्तींसाठीही उपयुक्त ठरते आहे. जिल्ह्यात अतिजोखमीच्या गटातील लस घेण्यासाठी संमती दिलेल्या टीबी-वीन पोर्टलवर नोंदणी केलेल्या 1 लाख 79 हजार 857 प्रौढ व्यक्तींचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली गावागावात उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व महानगर पालिकेच्या आरोग्य केंद्रात स्वतंत्र बीसीजी लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे लसीकरण करणे सोयीचे होईल. देश क्षयरोग मुक्त होण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी बीसीजी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे यांनी केले आहे.

लस कोणी घ्यावी : पूर्वी टीबीचा उपचार घेतलेले क्षयरुग्ण, क्षयरुग्णाच्या सहवासात राहिलेली व्यक्ती किंवा सध्या क्षयरुग्णाचा सहवासात असलेले व्यक्ती, 60 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती व त्यापुढील जेष्ठ नागरिक, मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेल्या व्यक्ती, धूम्रपानाचा पूर्व इतिहास असलेल्या व्यक्ती, व सध्या धुम्रपान करीत असलेल्या व्यक्ती, ज्यांचा बॉडी मास इंडेक्स 18 पेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींनी लस घ्यावी.

लस कोणी घ्यायची नाही : 18 वर्षापेक्षा कमी वय असलेली व्यक्ती, एचआयव्हीचा पूर्व इतिहास असलेले, गरोदर व स्तनदा माता व तीन महिन्यात रक्त संक्रमित केलेल्या व्यक्तींनी लस घेऊ नये, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललित पटले यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande