गडचिरोलीत २१३ शहीद जवानांच्या कुटुंबियांना दिवाळी फराळ भेट
गडचिरोली, 16 ऑक्टोबर (हिं.स.) माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या २१३ शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने यंदाही दिवाळीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती)
शहीदाच्या परिवाराला दिवाळी फराळ वाटप करतांना पोलीस अधिकारी


गडचिरोली, 16 ऑक्टोबर (हिं.स.)

माओवादग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या २१३ शहीद जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाने यंदाही दिवाळीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले. अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. श्री. छेरिंग दोरजे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज, दिनांक १६/१०/२०२५ रोजी शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिवाळीचा फराळ वाटप करण्यात आला.

गडचिरोली जिल्हा हा माओवाददृष्ट्‌या अतिसंवेदनशिल म्हणून ओळखला जातो, जिथे पोलीस दलातील जवान मोठ्या शौर्याने माओवाद्यांशी लढा देत आहेत. कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान दिलेल्या या शूर जवानांच्या कुटुंबियांशी संवाद साधत, डॉ. दोरजे यांनी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.

शहीद कुटुंबाच्या पाठीशी पोलीस दल खंबीर!

यावेळी बोलताना डॉ. छेरिंग दोरजे म्हणाले की, गडचिरोली पोलीस दलातील सर्व जवान अतिशय शौर्याने माओवादाचा सामना करीत आहेत. या लढाईत शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानामुळेच गडचिरोली जिल्हा आज माओवादापासून मुक्त होण्याच्या मार्गावर आलेला आहे. त्यांनी ठामपणे सांगितले की, सर्व शहीद जवानांचे कुटुंबिय हे आमच्या कुटुंबाप्रमाणेच असून महाराष्ट्र पोलीस व गडचिरोली पोलीस दल नेहमीच त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.

या कार्यक्रमात डॉ. छेरिंग दोरजे यांच्यासह पोलीस उप-महानिरीक्षक गडचिरोली परिक्षेत्र श्री. अंकित गोयल, पोलीस अधीक्षक गडचिरोली श्री. नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. एम रमेश, आणि अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. गोकुल राज जी. या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थिती दर्शविली. सर्व अधिकाऱ्यांनी शहीद कुटुंबियांना समक्ष भेटून दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या, फराळ भेट दिला आणि त्यांच्या अडचणी मोठ्या आपुलकीने जाणून घेतल्या.

या भावनिक आणि कृतज्ञतापूर्ण सोहळ्याने गडचिरोली पोलीस दल आणि शहीद कुटुंबांमध्ये असलेले अतूट नाते अधिक दृढ केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande