रायगड, 16 ऑक्टोबर (हिं.स.)।
दिवाळीसारख्या आनंदोत्सवात कामगारांसाठी खुशखबर! रायगड जिल्ह्यातील तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांना यंदा तब्बल १ लाख २० हजार रुपयांचा बोनस मिळाला आहे. जय भारतीय जनरल कामगार संघटनेने केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हा विक्रमी बोनस मिळवण्यात यश आले आहे.
या यशामागे आमदार प्रशांत ठाकूर आणि महेश बालदी यांचे मार्गदर्शन तसेच कामगार नेते जितेंद्र घरत यांचे नेतृत्व निर्णायक ठरले. कंपनी आणि संघटनेदरम्यान झालेल्या करारानुसार पुढील वर्षी कामगारांना १ लाख २५ हजार, तर त्यानंतरच्या वर्षी १ लाख ३० हजार रुपयांचा बोनस देण्यात येणार आहे. या करारावर कंपनीच्या वतीने अधिकारी शशांक शेखर व गुलशन चौधरी, तर संघटनेच्या वतीने अध्यक्ष जितेंद्र घरत आणि कामगार प्रतिनिधींनी स्वाक्षऱ्या केल्या.
संघटनेच्या नेतृत्वाखालील कामगारांना यापूर्वीच वेतनवाढ आणि विविध सुविधा मिळाल्या आहेत. या ताज्या निर्णयामुळे कामगारांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण असून, दिवाळीचा उत्सव अधिक गोड झाला आहे.
संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत म्हणाले, “कामगारांचे हक्क मिळवणे हेच आमचे ध्येय आहे. योग्य चर्चेच्या माध्यमातून आम्ही यंदाही कामगारांसाठी भरघोस बोनस मिळवण्यात यशस्वी ठरलो आहोत. कंपनी आणि कामगार यांचे नाते विश्वासावर टिकले पाहिजे; तेच सर्वांच्या विकासाचे गमक आहे.”
संघटनेचे सल्लागार आमदार प्रशांत ठाकूर यांना कामगार प्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी दीपावलीच्या शुभेच्छा देत आभार मानले. यावेळी रामदास गोंधळी, सुनील पाटील, यासिम शेख, अनिल पावशे, जयराम जाधव आणि सुनील हरिश्चंद्रकर उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके