- आरोग्य विभागाकडून चिंता व्यक्त- मास्क वापरावा, सातत्याने हात धुण्याचा सल्ला
बीजिंग, 3 जानेवारी (हिं.स.) - चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभरात थैमान घातलं होतं. कोविडमुळे जगभरातील अनेक लोकांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता पुन्हा कोरोनासारख्या एका नव्या विषाणूचा धोका वाढता आहे. चीनमध्ये सध्या ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस (HMPV) हा विषाणू वेगाने पसरत असल्याची माहिती समोर येत आहे. परिणामी संपूर्ण देशातील रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी पाहायला मिळत आहे. तसेच स्मशानभूमीमध्ये मृतदेहांचा खच पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
चीनमधील या नव्या विषाणूबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. HMPV हा नवा विषाणू चीनमध्ये वेगाने पसरतोय. देशातील रुग्णालयात स्मशानभूमीप्रमाणे मृतदेह दिसत आहेत, असा दावाही केला जातोय. अनेक लोकांना या विषाणूची लागण होताना दिसत आहे. चीनमधील रुग्णालयात होत असलेल्या गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत, त्यामुळे संपूर्ण जगभरातून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. HMPV, कोरोना आणि माइकोप्लाज्मा न्यूमोनिया यासारखे आजार देखील वेगाने पसरत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चीनमधील यंत्रणा अलर्ट मोडवर आल्या आहेत. दरम्यान आरोग्य विभागातील सर्व अधिकारी परिस्थितीचे निरीक्षण केले जात असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. लोकांनी सातत्याने मास्क वापरावा, सातत्याने हात धुवावेत, असा सल्ला आरोग्य विभागाकडून देण्यात आला आहे.
16-22 डिसेंबरच्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, सीझनल इन्फ्लूएंझा, राइनोव्हायरस, रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) आणि HMPV सारख्या श्वसन विषाणूंच्या प्रकरणांमध्ये अलीकडेच वाढ झाली आहे. मात्र, या वर्षी चीनमध्ये श्वसन रोगांचे उपाय आणि पातळी गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे. उदाहरणार्थ, आगामी काळात चीन आणि त्याच्या आसपासच्या देशांमध्ये हिवाळ्यात श्वसनाच्या समस्या वाढतील.
डांगच्या लॅबचे सीईओ डॉ. अर्जुन डांग म्हणाले की, चीनमध्ये एचएमपीव्हीची ओळख पटल्यानंतर देशात त्याचा त्वरित शोध आणि उद्रेक करण्यासाठी यंत्रणा तयार करणे आवश्यक आहे. त्यांनी यावर जोर दिला की एचएमपीव्ही हा एक विषाणू आहे ज्याबद्दल फारसे बोलले जात नाही परंतु हवामान बदलत असताना, जागतिक स्तरावर श्वसनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. एचएमपीव्हीची लक्षणे इतर श्वसनाच्या विषाणूंसारखीच असतात आणि त्याचा प्रादुर्भाव लवकर आटोक्यात आणला नाही, तर त्याचा आरोग्य व्यवस्थेवर मोठा भार पडू शकतो. 'पॉलिमरेझ चेन रिॲक्शन (पीसीआर)' चाचणीद्वारे एचएमपीव्हीवर उपचार करता येतात.
HMPV विषाणूबाबत...
ह्यूमन मेटान्यूमो व्हायरस हा एक आरएनए विषाणू आहे. याचा शोध सर्वात प्रथम 2001 मध्ये डच संशोधकांनी घेतला होता. श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या बाल रुग्णांच्या नमुन्यांची चाचणी करत असताना या विषाणूची माहिती समोर आली होती. दरम्यान, हा विषाणू गेल्या 6 दशकांपासून अस्तित्वात असल्याचा दावा तत्कालीन संशोधकांनी केला होता. या विषाणूची लागण झाल्यानंतर श्वास घेण्यास त्रास होतो. हा विषाणू प्रामुख्याने खोकला आणि शिंक आल्यानंतर वेगाने पसरतो. हा विषाणू लहान मुले आणि वृद्धांमध्ये वेगाने पसरतो. विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता अधिकाऱ्यांनी पुन्हा मास्क घालण्याचा सल्ला दिला आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि मास्क घालावे असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तसेच आपले हात वारंवार स्वच्छ करत रहा, असंही आवाहन करण्यात आलं आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी