समतोल आणि न्याय्य समाजासाठी मुला-मुलींचे प्रमाण समान असणे आवश्यक आहे. निसर्ग नियमानुसार सुद्धा ते समान असले पाहिजे. घटते बाल लिंग गुणोत्तर ही एक सामाजिक समस्या आहे. या समस्येला सामोरे जाण्यासाठी सर्वस्तरातील जनतेने एकत्रित प्रयत्न करणे महत्वाचे आहे. सन २०२४ च्या प्राप्त माहिती नुसार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जन्मत: १००० मुलांमागे ८८९ मुली असे प्रमाण आहे. यामध्ये सुधारणा करण्यासाठी गेली अनेक वर्षे शासनस्तरावर खालीलप्रमाणे विविध उपायोजना करण्यात येत आहेत. खरं म्हणजे मुलगा असो वा मुलगी जन्म ही एक आनंददायी घटना असते. जीवन हे नेहमीच प्रवाही असते. त्याप्रवाहाला जीवंत ठेवणारी स्त्री असते. म्हणून मुलींच्या जन्माकडे बघण्याची समाजाची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने विविध पातळीवर प्रयत्न चालविले आहेत. त्याचाच हा एक आढावा.
शासकीय यंत्रणेकडून पीसीपीएनडीटी कायद्याची यथायोग्य अंमलबजावणी करण्यात येते तसेच बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
शासकीय अधिकारी / कर्मचारी यांच्या संवेदीकरण कार्यशाळा घेऊन त्यांना मुलींच्या जन्माचे महत्त्व पटवून देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील क्ष-किरण तज्ञ आणि स्त्री रोग व प्रसूती शास्त्र तज्ञ यांची १९९४ च्या पीसीपीएनडीटी कायद्याबाबत तालुकास्तरावर संवेदीकरण कार्यशाळा घेऊन मुलींच्या जन्मामध्ये वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सन २०१५ पासून सुकन्या समृद्धी योजना सुरू करण्यात आली आहे. मुलींच्या सामाजिक तसेच आर्थिक जीवनात सुधारणा करणे व त्यांचा शैक्षणिक विकास करून त्यांना भविष्यात सशक्त व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने या योजनेअंतर्गत एकाच परिवारातील तीन मुली लाभ घेऊ शकतात. या योजनेअंतर्गत दरवर्षी किमान २५० रुपये पासून कमाल दीड लाख रुपये गुंतवणूक करून या योजनेचा लाभ घेता येतो. मुलीच्या वयाच्या १५ वर्षापर्यंत रक्कम भरावी लागते. त्यानंतर २१ वर्षापर्यंत रक्कम भरण्याची गरज नाही. जमा रकमेवर कोणताही कर भरावा लागत नाही. २१ वर्षानंतर रक्कम काढली नाही तरी व्याज सुरू राहते. लाभार्थीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास जमा रक्कम व्याजासह लाभार्थीच्या पालकांना दिली जाते.
सन २०१६ पासून महाराष्ट्र शासनाने मुलींसाठी ‘माझी कन्या भाग्यश्री’ योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मुलीच्या जन्माच्या वेळी पालकांना ५० हजार रुपये मिळतात तसेच अपघात विमा संरक्षण ही आहे. ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे व एका मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत पालकांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया केली तर ५० हजार रुपये दिले जातात. दोन मुलींसाठी दोन्ही मुलींच्या नावावर २५-२५ हजार रुपये दिले जातात.
सन २०१७ पासून ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ या योजनेअंतर्गत पहिल्यांदा गरोदर असल्यास ५ हजार रुपये आणि दुसऱ्या गरोदरपणानंतर अपत्य मुलगी असेल तर रु ६ हजार रुपये देण्यात येतात.
१ एप्रिल २०२३ नंतर जन्मणाऱ्या एक अथवा दोन मुलींना (एक मुलगा व एक मुलगी असल्यास फक्त मुलीला) पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक / कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये पेक्षा कमी असणाऱ्या कुटुंबात मुलीचा जन्म झाल्यावर रु५ हजार रुपये इयत्ता पहिलीत गेल्यावर ६ हजार रुपये, इ. सहावीत गेल्यावर ७ हजार रुपये, इयत्ता ११ वीत गेल्यावर८ हजार रुपये- व वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यावर ७५ हजार रुपये, अशा रितीने त्या मुलीस एकूण १ लाख १ हजार रुपये एवढा लाभ महाराष्ट्र शासनाच्या ‘लेक लाडकी’ या योजनेअंतर्गत मिळेल.
सर्वसामान्य जनतेमध्ये प्रसिद्धी व जनजागृती करण्यासाठी सामाजिक दृष्टया या महत्वाच्या कार्यामध्ये खाजगी रुग्णालये / डॉक्टरांनी सक्रिय सहभागी होणे आवश्यक आहे. त्यासाठी महत्वाच्या खालील किमान ५ बाबी खाजगी रुग्णालये / डॉक्टरांनी अंमलात आणाव्यात.
१. जन्म झालेल्या मुलीच्या पालकांना वरील सर्व शासकीय योजनांची माहिती देण्यात यावी. त्याचा प्रसिद्धी फलक आंतर रुग्ण विभागामध्ये दर्शनी ठिकाणी लावण्यात यावा.
२. आपल्या रुग्णालयात मुलीचा जन्म झाल्यावर त्या पालकांचे अभिनंदन / सत्कार करावा,
३. आपल्याकडे येणाऱ्या प्रत्येक गरोदर मातेस गर्भ लिंग निदान करू नये यासाठी समुपदेशन करावे.
४. मुलीच्या जन्माची सुखद आठवण म्हणून रुग्णालयाकडून त्यांना एखादी भेटवस्तू देण्यात यावी.
५. रुग्णालयाचे संपूर्ण बिल माफ करावे किंवा किमान ५०% सवलत देऊन मुलीच्या जन्माचे स्वागत करावे.
जानेवारी ते डिसेंबर २०२४ अखेर तालुकानिहाय जन्मतः लिंग प्रमाणाची आकडेवारी अभ्यासता छत्रपती सांभाजीनगर, फुलंब्री व सोयगाव तालुका वगळता इतर सर्व तालुक्यांमधे जन्मतः लिंग प्रमाण ९०० पेक्षा कमी आहे. मुलींच्या घटत्या प्रमाणाची किंमत संपूर्ण समाजासह आपल्या सर्वांनाच चुकवावी लागेल, त्यापासून वाचायचे असेल तर शासनासोबत जनता व खाजगी रुग्णालये / डॉक्टर इ. समाजातील सर्व घटकांना पुढे यावे लागेल. आपण या पवित्र कार्यात प्रत्येकाने आपला सक्रिय सहभाग नोंदवून जन्मतः लिंग प्रमाणांमध्ये वाढ होईल यादृष्टीने प्रयत्न करावेत. त्यासाठी समाजाची मानसिकता बदलविणे आवश्यक आहे.
सन २०२४ मधील तालुका निहाय जन्मतः लिंग प्रमाण
अ.क्र. तालुका एकूण जन्म नोंदणी लिंग गुणोत्तर क्रमवारी
पुरुष स्त्री एकूण
१ छत्रपती संभाजीनगर २२१३५ २००८९ ४२२२४ ९०८ २
२ कन्नड १७०२ १४२५ ३१२७ ८३७ ८
३ सोयगाव ३०४ २७९ ५८३ ९१८ १
४ सिल्लोड ३४६४ २९१६ ६३८० ८४२ ७
५ फुलंब्री ३०४ २७४ ५७८ ९०१ ३
६ खुलताबाद ४८७ ४१० ८९७ ८४२ ६
७ वैजापूर १४६१ १२५८ २७१९ ८६१ ५
८ गंगापूर ११२६ ९९३ २११९ ८८२ ४
९ पैठण १३१६ १०८१ २३९७ ८२१ ९
एकूण ३२२९९ २८७२५ ६१०२४ ८८९ -----
डॉ. अभय धानोरकर,
जिल्हा आरोग्य अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.
हिंदुस्थान समाचार / मेघा माने