अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल
जळगाव, 13 जानेवारी (हिं.स.) जळगाव येथे मोठी घटना घडली आहे. जळगाव रेल्वे स्थानक येथून प्रयागराज येथे निघालेल्या ताप्ती गंगा एक्स्प्रेसवर दगडफेक करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. महाकुंभमेळ्यासाठी ही ट्रेन प्रयागराजला जात होती. याप्रकरणी पोलिसांनी एका अज्ञात व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली. दगडफेकीमुळे या रेल्वेच्या बी-६ डब्याच्या एका खिडकीच्या काचा फुटल्या. सुदैवाने या घटनेत प्रवाशांना इजा झाली नाही. प्रयागराज येथे कुंभमेळाव्याला सुरुवात झाली आहे. कुंभमेळ्यासाठी देशभरातून भाविक प्रयागराजला जात आहे. महाराष्ट्रातून देखील अनेक भाविक प्रयागराज येथे जात असून या साठी विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. जळगाव रेल्वे पोलिसांच्या अधिकाऱ्याने रेल्वेवरील दगडफेकीबाबत अधिक माहिती दिली. सुरतहून छपराकडे जाणाऱ्या ताप्ती गंगा एक्स्प्रेसमधील काही प्रवाशांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवरून दगडफेकीची माहिती दिली.
महाकुंभमेळ्यासाठी प्रयागराजला निघालेल्या प्रवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव स्थानकातून सुटल्यानंतर दोन-तीन किलोमीटर अंतरावर गाडीवर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे प्रयागराज येथे कुंभमेळ्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दगडफेकीच्या घटनेमुळे प्रयागराजकडे जाणाऱ्या या रेल्वे गाडीत प्रवाशांना सुरक्षा मिळण्याची मागणी प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडे तसेच रेल्वेमंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथे आयोजित करण्यात आला आहे. 13 जानेवारी ते 26 फेब्रुवारी या काळात या महाकुंभ मेळ्याचे आयोजन करण्यात येत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर