पानीपतातून “एक है तो सेफ है” शिकावे लागेल - मुख्यमंत्री
युद्धाच्या 264 वर्षपूर्तीनिमित्त मराठा वीरांना आदरांजली पानीपत, 14 जानेवारी (हिं.स.) : अटक ते कटक साम्राज्य असलेल्या मराठ्यांनी 14 जानेवारी 1761 रोजी अहमदशाह अब्दाली विरोधात लढलेले युद्ध देशासाठी होते. पानीपतची भूमी मराठ्यांच्या रक्ताने पावन झाली आ
देवेंद्र फडणवीस पानीपतमध्ये भाषण करताना


युद्धाच्या 264 वर्षपूर्तीनिमित्त मराठा वीरांना आदरांजली

पानीपत, 14 जानेवारी (हिं.स.) : अटक ते कटक साम्राज्य असलेल्या मराठ्यांनी 14 जानेवारी 1761 रोजी अहमदशाह अब्दाली विरोधात लढलेले युद्ध देशासाठी होते. पानीपतची भूमी मराठ्यांच्या रक्ताने पावन झाली आहे. या युद्धातून “एक है तो सेफ है” हे शिकावे लागेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पानीपतच्या युद्धाला 264 वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने शौर्य स्मारक समितीतर्फे मराठा वीरांना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.

यावेळी पानीपतमधील शौर्य स्मारक समितीच्या कामाचे कौतुकही त्यांनी केले. दरम्यान, या कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, रक्षा खडसे, राज्यातील मंत्री जयकुमार रावल, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, खा. राजाभाऊ वाझे, खा. भास्कर भगरे उपस्थित होते. सोबतच स्थानिक नेते, पदाधिकारी तसेच आयोजक आणि शौर्य स्मारक समिती अध्यक्ष प्रदीप पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि हरियाणासह उत्तर भारतातील विविध राज्यांमधील लोक उपस्थित होते. यावेळी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानासाठी महाराष्ट्रातील अमरावतीचे डॉ. नितीन धांडे यांना 2025 चा शौर्य सन्मान प्रदान करण्यात आला.

याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, पानिपतच्या या ऐतिहासिक भूमीवर आलो, हे सौभाग्य आहे. सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली पानिपतचे युद्ध लढले गेले. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाचा इतिहास बदलला. देव- देश- धर्मासाठी लढण्याची शपथ शिवाजी महाराजांची शपथ होती. शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनीही असामान्य कार्य केले. देशाला, इथल्या संस्कृतीला आणि सामान्य लोकांना वाचवण्यासाठी शिवाजी महाराजांनी कार्य केले. जिथे मंदिर, धार्मिक स्थळ उद्ध्वस्त करण्यात आले तिथेच अटक ते कटक साम्राज्य मराठ्यांनी निर्माण केले. पानिपतच्या युद्धानंतर 10 वर्षांनी महादजी शिंदे यांनी दिल्लीचे तख्त मिळवले होते. त्यामुळे मराठे युद्ध नव्हे तर केवळ मोहीम हरले, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गावर स्वराज्यासाठी लढणार्‍या हिंदवी स्वराज्याची सेना आणि अहमदशाह अब्दाली यांच्यामध्ये 1761 साली झालेल्या भीषण युद्धाच्या स्मृतींना उजाळा दिला. यावेळी मराठ्यांच्या रक्ताने सिंचित पानिपतच्या या वीरभूमीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिवादन देखील केले. पानिपतच्या या मोहिमेत मराठ्यांचा पराभव होण्याचे कारण म्हणजे सर्व तत्कालीन राजे हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी एक होऊ शकले नाहीत, हे सांगताना 'एक हैं, तो सेफ हैं' चे महत्त्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी अधोरेखित केले. विकसित भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वात सर्वांनी एक होऊन देश विघातक शक्तींचा सामना करण्याची गरज देखील यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. तसेच पानिपत ही पावनभूमी आहे. वीरता, शौर्य याचे संदेश देणारे हे स्मारक आहे. देशात आपण जात- पात- धर्म- पंथ यांच्या पलीकडे जाऊन देश म्हणून एक राहिलो पाहिजे. आपण एक राहू तरच सेफ राहू. आम्ही अखंड भारताचे स्वप्न पाहिले आहे जिथे पाकव्याप्त कश्मीर आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. 'मागील वर्षीही मला या कार्यक्रमाचे निमंत्रण होते मात्र काही अपरिहार्य कारणास्तव दौरा रद्द करावा लागला, कदाचित मुख्यमंत्री म्हणूनच या ठिकाणी यायचे असेल,' असेही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पानीपत येथे झालेल्या कार्यक्रमात कोल्हापूरच्या चाणक्य मर्दानी खेळ सांस्कृतिक सेवा संघ आणि रामकृष्ण मर्दानी खेळ विकास मंच संस्थेने शिवकालीन युध्दकला सादर केल्या. शौर्य स्मारक समिती आणि महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये समन्वयक म्हणून मंत्री जयकुमार रावल यापुढे काम करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पानिपतमध्ये जाहीर केले. कार्यक्रम आयोजन समितीचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी पुढच्या वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा कार्यक्रम व्हावा, त्यावेळी हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देऊ, यासाठी राज्य सरकारने मदत करावी आणि स्मारक भव्य बनवण्याच्या दृष्टीने भूमिअधिग्रहण करण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांना या सर्व गोष्टी पुढच्या वर्षी पूर्णत्वास येतील, असे आश्वासन दिले.

---------------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande