नाशिक, 14 जानेवारी (हिं.स.) : गेल्या २९ नोव्हेंबरला रात्री त्र्यंबकेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील वेळुंजे येथील भगवान महाले यांच्या घरामध्ये अज्ञात आरोपींनी संमतीशिवाय प्रवेश करून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा ५ लाख २३ हजार १७४ रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. याबाबत भान्यासं कलम ३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. यानंतर हरसुल पोलीस ठाणे हद्दीत १५ डिसेंबरला मध्यरात्री अज्ञात आरोपींनी वाघेरा शिवारातील रहिवासी अजय धोंगडे यांच्या घराचा दरवाजा तोडुन घरामध्ये संमतीशिवाय प्रवेश केला. त्यांना व त्यांची आई यांना कोयता व सुऱ्याचा धाक दाखवुन, आरडा ओरड केल्यास मारून टाकु असा दम दिला. अंगावरील व घरातील डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने मोबाईल असा एकुण २६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला. म्हणुन हरसुल पोलिसांत भा.न्या.सं. कलम ३०९ (४), ३३१ (६), ३५१(३), ३२४ (४), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजु सुर्वे, सपोनि संदेश पवार, सपोउनि नवनाथ सानप, शिवाजी ठोंबरे, पोलीस अंमलदार संदिप नागपुरे, विनोद टिळे, किशोर खराटे, हेमंत गिलबिले, प्रदिप बहिरम, प्रविण गांगुर्डे, सतिष जगताप, योगेश पाटील, सचिन देसले, बापु पारखे यांच्या पथकाने ५ आरोपींना ताब्यात घेवुन दोन्हीही गुन्हे उघडकीस आणले आहे. पोलीस निरीक्षक राजु सुर्वे यांच्या पथकाने दोन्ही गुन्ह्यांत अज्ञात आरोपींची गुन्हा करण्याची पध्दत व त्यांनी परिधान केलेले कपडे तसेच बोलीभाषा यावरून हे आरोपी हे नाशिक शहर परिसरातीलच असल्याचा तर्क लावुन तपास सुरू केला. खबऱ्यांच्या गुप्त माहितीनुसार नाशिक शहरातील चुंचाळे, अंबड व गंगापुर परिसरातुन आदित्य एकनाथ सोनवणे, वय २५, रा. समशेरपुर, ता. अकोले, जि. अहिल्यानगर, हल्ली रा. अंबड, नाशिक, किरण अविनाश जाधव, वय २३, विधीसंघर्षीतग्रस्त, दोघे रा. जाधव संकुल, चुंचाळे शिवार, अंबड, नाशिक, गोपाळ मधुकर उघडे, वय २९, रा. वेळुंजे, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक, सनी संजय कटारे, वय २१, रा. गंगापुर, ता. जि. नाशिक ह्या ५ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. ह्या आरोपींना विश्वासात घेवुन ह्या गुन्ह्यांबाबत चौकशी केली असता, त्यांनी त्यांचा साथीदार अजय प्रसाद, रा. जाधव संकुल, अंबड, नाशिक याच्यासह मागील दोन महिन्यांमध्ये एर्टिगा कार भाड्याने ठरवुन त्र्यंबकेश्वर व हरसुल परिसरात जावुन दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपींच्या कब्जातुन गुन्ह्यांतील चोरलेल्या रकमेपैकी १७ हजार रुपये हस्तगत करण्यात आले आहे. ताब्यातील आरोपींना हरसुल पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / CHANDRASHEKHAR SUKHDEV GOSAVI