अमरावती, 14 जानेवारी (हिं.स.) विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात भाजपाच्या नेतृत्वात महायुतीचं सरकार आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नागपुरात देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्यातच आज मकरसंक्रांतीच्या दिवशी आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केला आहे. पुढच्या मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतील असं विधान त्यांनी केल्याने चर्चेला उधाण आले आहे. आमदार रवी राणा म्हणाले की, राज्याच्या परिवर्तनामध्ये उद्धव ठाकरेंनी तिळगूळ खा आणि गोड गोड बोलावं अशी विनंती आहे. देवेंद्र फडणवीस यांना भेटून उद्धव ठाकरे एक पाऊल पुढे आलेत. पुढच्या मकरसंक्रांतीपर्यंत उद्धव ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांसोबत दिसतील. मोदींचं नेतृत्व उद्धव ठाकरेंनी खुल्या मनाने स्वीकारले तर नक्कीच हे होईल. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात महाराष्ट्र पुढे जाणार आहे. त्यांच्यात नेतृत्वात आगामी महापालिका निवडणुकीत भाजपा- युवा स्वाभिमान पक्ष रिंगणात उतरेल. कुठल्याही निवडणुकीत आम्ही एकत्रित राहू असं त्यांनी सांगितले. तसेच राजकारणात लोकांनी दिलेला निर्णय स्वीकारला पाहिजे. प्रवीण तायडे सक्षम आमदार अचलपूरमधून निवडले आहे. ते जे काही विकासकामे मतदारसंघात करतील त्यांना बच्चू कडू यांनी पाठिंबा दिला पाहिजे. लोकशाहीत पराभव झाल्यानंतर तो स्वीकारून सगळ्यांनी अमरावतीच्या विकासासाठी एकत्र आले पाहिजे. विरोधकांनी तिळगूळ खावं आणि गोड गोड बोलावे, विकासासाठी एकत्र यावे असं आवाहनही रवी राणा यांनी स्थानिक राजकीय नेत्यांना केले आहे. ठाकरे-फडणवीस जवळीक, शिंदेसेनेसाठी धोक्याची? विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केला होता. एकतर तू राहशील किंवा मी राहीन असं सांगत ठाकरेंनी फडणवीसांवर प्रत्येक सभेतून हल्लाबोल केला तरीही निकालानंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने चर्चांना उधाण आले. उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत असं विधान फडणवीसांनी केले होते. त्या विधानावर शिवसेना मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. हे लोक कुणाचेच नाहीत असं सांगत फडणवीसांनी विचार करायला हवा असा सल्ला गुलाबराव पाटलांनी दिला होता. त्यात आता शिंदेंच्या शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे स्मारक समितीतून उद्धव ठाकरेंची हकालपट्टी करावी अशी मागणीही करण्यात आली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी