अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.)।
पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी पोलिस ठाण्यातील नागरिकांच्या प्रलंबीत तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी वसंत हॉल येथे १३ जानेवारी पासून तक्रार निवारण कार्यशाळा सुरू केली होती. आज १४ जानेवारी रोजी तक्रार निवारण कार्यशाळेत एकूण ४०२ प्रलंबीत अर्ज म्हणजे तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत. ही कार्यशाळा १६ जानेवारी पर्यंत सुरू राहणार असून आगामी दोन दिवसांमध्ये शेकडो तक्रारीं निकाली निघण्याची शक्यता आहे.
शहरातील नागरिक पोलिस ठाण्यात किंवा पोलिस आयुक्तालयातील आवक जावकमध्ये तक्रारी करतात. बहुतांश जण - सीपींना भेटून त्याच्याकडे तक्रारी करतात. अशा तक्रारी पत्रव्यवहार शाखे मार्फत संबधीत पोलिस ठाण्यात जातात.
दरम्यान पोलिस ठाण्यांमध्ये दैनंदिन कामकाज, बंदोबस्त, तपास, आरोपींची शोध अशा अनेक कारणांमुळे तक्रार अर्ज पेडींग राहत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप होतो. त्यामुळे सीपी रेड्डी यांनी स्वतः वसंत हॉल येथे नागरिकांसाठी १३ ते १६ जानेवारी दरम्यान तक्रार निवारण कार्यशाळा सुरू केली. हॉलमध्ये दहा पोलिस ठाण्यांसह वाहतुक पोलिस व इतर शाखांचे टेबल लावण्यात आले.
एका दिवशी एकाच वेळी दहाही पोलिस ठाण्यातील प्रलंबीत अर्जावर सीपींच्या निगरानीमध्ये कारवाई होत असल्याने अनेक अर्ज निकाली निघत आहे. त्यानुसार आज विशेष कार्यशाळेत आयुक्तालयातील एकूण ४०२ प्रलंबित अर्ज निकाली काढण्यात आले. ही कार्यशाळा १६ जानेवारी पर्यंत सुरू राहणार असून नागरिकांना त्यांनी केलेल्या तक्रारीची माहिती हवी असल्यास वसंत हॉलमध्ये जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सीपी रेड्डी यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी