अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.)
प्रथम नेता निवडीला उशीर, नंतर मंत्रीपद वाटपाचा घोळ,मंत्रीमंडळाचा शपथविधी झाल्यावर खातेवाटपाला विलंब आणि आता खातेवाटप झाल्यावर पालकमंत्री ठरवण्यावरून वाद अशी महायुती सरकारची आतापर्यंतची वाटचाल राहिली आहे. अशात दोन दिवसात पालकमंत्री वाटपाचा घोळ संपण्याचे संकेत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे अमरावतीचे पालकमंत्री होणार असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे.
पालकमंत्री ठरवण्याची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. घटक पक्षांशी चर्चा करून पालकमंत्री ठरवावे, असे फडणवीस यांनी सांगितले होते. त्यालाही दोन आठवडे झाले. मात्र अद्याप अमरावतीसह एकाही जिल्ह्याला पालकमंत्री मिळाला नाही. यावरून या मुद्यावरून महायुतीत वाद आहे, असे स्पष्ट होते. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांना नागपूर येथे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, १५, १६ तारखेपर्यंत पालकमंत्री पदाचा विषय सुटलेला असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा, एकनाथ शिंदे यांच्यासोबत दोन- तीन बैठकी झालेल्या आहेत. पालकमंत्री पदाचे वाटप अंतिम एप्प्यात आहे, असे बावनकुळे म्हणाले.
२४ ला घेणार डीपीसीची बैठक
अमरावतीचे संभाव्य पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे येत्या २४ तारखेला अमरावती जिल्हा नियोजन समितीची बैठक घेणार आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच नियोजनपूर्व बैठक घेतलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी प्रजासत्ताक दिनापूर्वीच सनदी अधिकाऱ्यांचे स्थानांतर केलेले आहेत. आता केवळ पालकमंत्री पदाचे वाटप हा विषय शिल्लक राहिलेला आहे. तोसुद्धा दोन- तीन दिवसांत निकाली निघणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी