अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.)।
कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष हरीश मोरे यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाने जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांना निवेदन देऊन तूर व सोयाबीन खरेदी तातडीने सुरू करण्याची मागणी केली. पोर्टल बंद झाल्यामुळे सोयाबीन खरेदीत तांत्रिक अडथळे निर्माण झाले तसेच व्यापाऱ्यानी बाजारात तूरीचे भाव पाडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे अशा परिस्थितीत ताबडतोब शासकीय खरेदी सुरू करावी. सोयाबीन व तूर या दोन्हीसाठी स्वतंत्र निवेदने यावेळी देण्यात आली.
जाळ्यात हजारो शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन पडून असल्याचे सांगण्यात आले. तसेच सोयाबीन विक्रीसाठी शासकीय एजन्सीकडे नोंदणीही करण्यात आली आहे. रविवार रात्रीपासून पोर्टल बंद आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. तूर दरही बरोबर नाहीत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना किमान आधारभूत किंमत मिळावी, यासाठी नाफेडमार्फत शासकीय खरेदी सुरू करण्याची विनंती सरकारला करण्यात आली. निवेदन देताना भय्यासाहेब निर्मळ, नाना नागमोते, किशोर चांगोले, मिलिंद तायडे, श्रीकांत बोंडे आशुतोष देशमुख, अलका देशमुख कोकाटे, प्रकाश काळबांडे उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी