मुंबई, 15 जानेवारी (हिं.स.) - महायुती म्हणून संघटन वाढवण्यावर भर द्या, मतदारसंघात घटक पक्षातील आपले जे आमदार, पदाधिकारी आहेत, त्यांच्या कार्यालयांना एकमेकांनी भेटी द्या. महायुतीचा एकोपा वाढवायचा असेल तर गावोगावी डब्बा पार्टी आयोजन करा, अशा मार्गदर्शनपर सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महायुतीच्या नेते, पदाधिकाऱ्यांना दिल्या. पंतप्रधान मोदी आज मुंबई दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी नौदलाच्या तीन युद्धनौकांचे राष्ट्रार्पण केले. त्यानंतर त्यांनी नौदलाच्या आंग्रे सभागृहात महायुतीचे नेते, आमदारांशी संवाद साधला.
आमदारानी आपल्या मतदारसंघाची काळजी घेताना स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी. लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आपल्याकडे सर्वाच लक्ष असतं, त्यामुळे माध्यमाशी बोलताना काळजी घ्या. आपल्या हातून चुकीच्या बाबी घडणार नाहीत याकडे लक्ष द्या. आमदारांनी विरोधकांना उत्तर देण्यापेक्षा कामातून उत्तर दिले पाहिजे. इतर राज्यात किंवा दुसऱ्या मतदारसंघात जर एखादी गोष्ट चांगली असेल तर त्याबाबत अभ्यास दौरा काढला पाहिजे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुजरात दौऱ्यावर आले होते, त्यांचे उदाहरण देत त्यांच्याप्रमाणे आमदारांनी अभ्यास दौरा करण्याचा सल्ला मोदींनी दिला. समाज आणि मतदारसंघासोबतच कुटुंबालाही वेळ दिला पाहिजे. कामाचा संकल्प करून त्याचे नियोजन केले पाहिजे. विधान परिषदेच्या आमदारांनी एखादा मतदारसंघ दत्तक घेऊन चांगले काम करावे. सरकारी अधिकाऱ्यांसोबत नम्रपणे बोला, बदली आणि दलाली कामापासून स्वत:ला दूर ठेवा. मतदारसंघात ज्यांनी तुम्हाला मतदान केले नाही, त्यांच्यासाठी काम करून विरोधकांनाही आपलेसे करा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून गुजरातमधे भाजपकडून सत्ता केंद्र कशा प्रकारे चालवल जात आहे, याच उदाहरण देण्यात आलं. गुजरातमध्ये ग्रामपंचायती, स्थानिक स्वराज्य संस्थापासून विधानसभा, लोकसभा यामध्ये भाजपने एक हाती सत्ता कशी राखली आहे. महाराष्ट्रात देखील महायुती अशाच प्रकारे काम करेल अशी आशा व्यक्त केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी