नवी मुंबई, 15 जानेवारी (हिं.स.) - सेवा, हा भारताच्या आध्यात्मिक संस्कृतीचा पाया आहे आणि अध्यात्मात देवाची सेवा म्हणजेच जनतेची सेवा आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील खारघर येथे, इस्कॉनच्या श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिराचे उद्घाटन झाले. अशा दिव्य सोहळ्यात आपण सहभागी झालो हे आपले भाग्य असून इस्कॉनच्या संतांचा अपार स्नेह, जिव्हाळा आणि श्रील प्रभुपाद स्वामींचा आशीर्वाद आपल्याला असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
भारताची अध्यात्मिक संस्कृती साधकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेच्या मार्गावर घेऊन जाते, असे त्यांनी नमूद केले. खरी सेवा म्हणजे निःस्वार्थ, अशा अर्थाच्या भगवान श्रीकृष्णाच्या श्लोकाचा दाखला देत पंतप्रधानांनी अधोरेखित केले की, सर्व धार्मिक लेखन आणि धर्मग्रंथांचे मूळ सेवा भावातच रुजले आहे. इस्कॉन ही विशाल संस्था सेवाभावनेने काम करते, शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरणासाठी योगदान देते, असे ते म्हणाले. कुंभमेळ्यात इस्कॉन महत्वाचे सेवा उपक्रम राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशाच सेवा भावाने सरकार नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने काम करत आहे, याबद्दल पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले. प्रत्येक घरात शौचालय बांधणे, उज्ज्वला योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना गॅस जोडणी देणे, प्रत्येक कुटुंबापर्यंत नळा द्वारे पाणी पोहोचविणे, प्रत्येक गरीब व्यक्तीला 5 लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार, 70 वर्षांवरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीला ही सुविधा देणे, आणि प्रत्येक बेघर व्यक्तीला पक्के घर उपलब्ध करून देणे, ही सर्व कामे, याच सेवा भावनेने प्रेरित असल्याचे त्यांनी नमूद केले. हा सेवाभाव, खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळवून देतो, आणि खऱ्या धर्मनिरपेक्षतेचे प्रतीक आहे, यावर पंतप्रधानांनी भर दिला.
पंतप्रधानांनी सर्व महान संतांप्रति कृतज्ञता व्यक्त करत त्यांना नमन केले. राधा मदनमोहन मंदिराच्या वास्तूमधून अध्यात्म आणि ज्ञानाची परंपरा झळकत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. हे मंदिर भक्तीच्या विविध प्रकारांचे दर्शन घडवत असून 'एकोऽहं बहुस्याम' ही विचारधारा दर्शवत आहे, असे ते म्हणाले. नवीन पिढीच्या आकर्षणासाठी आणि त्यांना माहिती व्हावी या उद्देशाने रामायण आणि महाभारतातील प्रसंगांवर आधारित संग्रहालय उभारण्यात येत आहे, तसेच वृंदावन मधील 12 वनांवर आधारित एक उद्यान देखील विकसित केले जात आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या मंदिराचा परिसर श्रद्धेसोबतच भारताचे चैतन्य समृद्ध करणारे पवित्र केंद्र बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या अतिशय स्तुत्य उपक्रमासाठी त्यांनी इस्कॉनचे सर्व संतमहात्मे, सदस्य आणि महाराष्ट्रातील जनतेचे अभिनंदन केले. याप्रसंगी त्यांनी आदरणीय गोपाळ कृष्ण गोस्वामी महाराजांचे भावपूर्ण स्मरण केले, भगवान कृष्णावरील त्यांच्या अगाध भक्तीमध्ये रुजलेली महाराजांची दूरदृष्टी आणि त्यांचे आशीर्वाद या प्रकल्पाचा अविभाज्य घटक आहेत, असे त्यांनी सांगितले.
महाराज प्रत्यक्ष उपस्थित नसले तरी त्यांचे आध्यात्मिक अस्तित्व सर्वांना जाणवत आहे, असे ते म्हणाले. आपल्या आयुष्यात महाराजांचे स्नेह आणि स्मृतींना विशेष स्थान असल्याचे त्यांनी सांगितले. जगातील सर्वात मोठ्या भगवद्गीतेचे अनावरण करण्याच्या सोहळ्यात महाराजांनी दिलेले निमंत्रण आणि श्रील प्रभुपाद महाराजांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीच्या निमित्ताने मिळालेले महाराजांचे मार्गदर्शन यांचा पंतप्रधानांनी विशेष उल्लेख केला. महाराजांचे आणखी एक स्वप्न साकार झाल्याचे पाहून पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले.
जगभरात पसरलेले इस्कॉनचे अनुयायी भगवान श्रीकृष्णाच्या भक्तीच्या धाग्याने बांधले आहेत असे सांगून पंतप्रधान म्हणाले की या अनुयायांना अखंड मार्गदर्शन करणारी श्रील प्रभुपाद स्वामींची शिकवण हा त्या शृंखलेचा आणखी एक धागा आहे. श्रील प्रभुपाद स्वामींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या काळात वेद, वेदांत आणि गीतेचे महत्व यांचा प्रसार केला आणि भक्तीवेदांताला सामान्य लोकांशी जोडले असे पंतप्रधान म्हणाले. वयाच्या सत्तरीला जेव्हा आपले इतिकर्तव्य पूर्ण झाल्याची बहुतेक जणांची भावना असते, तेव्हा श्रील प्रभुपाद स्वामींनी इस्कॉन अभियानाचा प्रारंभ केला, जगभरात भ्रमंती केली आणि श्रीकृष्णाचा संदेश जगाच्या कानाकोपऱ्यात भगवान पोहचवला. आज जागतिक स्तरावर लाखो लोकांना त्यांच्या समर्पणाचा लाभ होत आहे, अशी भावना व्यक्त करुन पंतप्रधानांनी श्रील प्रभुपाद स्वामींचे सक्रिय प्रयत्न आपल्याला सतत प्रेरणा देत असल्याचे सांगितले.
भारत ही एक असामान्य आणि अद्भुत भूमी आहे, केवळ भौगोलिक सीमांनी बांधलेल्या जमिनीचा तुकडा नसून, ऊर्जामय संस्कृती असलेली जागृत भूमी आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले. अध्यात्म, हे या संस्कृतीचे मर्म आहे, आणि भारत समजून घ्यायचा असेल, तर प्रथम अध्यात्माचा स्वीकार करावा लागेल, यावर त्यांनी भर दिला. जगाकडे केवळ भौतिक दृष्टीकोनातून पाहणारे भारताकडे विविध भाषा आणि प्रांतांचा ठेवा म्हणून पाहतात, असे पंतप्रधान म्हणाले. मात्र, जेव्हा कोणी आपल्या आत्म्याला या सांस्कृतिक जाणिवेशी जोडतो, तेव्हा त्यांना खऱ्या अर्थाने भारत दिसतो, असे ते म्हणाले. पूर्वेकडे बंगालमध्ये चैतन्य महाप्रभूंसारखे संत प्रकट झाले, तर पश्चिमेला महाराष्ट्रात नामदेव, तुकाराम आणि ज्ञानेश्वर यांच्यासारखे संत उदयाला आले, असे ते म्हणाले. चैतन्य महाप्रभूंनी महावाक्य मंत्राचा जनमानसात प्रसार केला, तर महाराष्ट्रातील संतांनी 'रामकृष्ण हरी' मंत्राच्या माध्यमातून आध्यात्मिक अमृताची गोडी सर्वांपर्यंत पोहोचवली, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी गीतेच्या माध्यमातून भगवान श्रीकृष्णाचे अगाध ज्ञान सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध करून दिले. त्याचप्रमाणे, श्रीला प्रभुपादांनी इस्कॉनच्या (ISKCON) माध्यमातून भाष्ये प्रकाशित केली आणि लोकांना त्याच्या मर्माशी जोडून, गीतेचा प्रसार केला. वेगवेगळ्या ठिकाणी आणि काळात जन्मलेल्या या संतांनी आपापल्या परीने कृष्णभक्तीचा प्रवाह पुढे नेला, असे पंतप्रधान म्हणाले. ते पुढे म्हणाले की, त्यांचा जन्मकाळ, भाषा आणि पद्धती भिन्न असूनही, त्यांची समजूत, विचार आणि चैतन्य एकच होते, आणि त्या सर्वांनी भक्तीच्या प्रकाशाने समाजात नवचैतन्य भरले, त्याला नवी दिशा आणि ऊर्जा दिली.
कृष्णा सर्किटच्या माध्यमातून सरकार देशभरातील विविध तीर्थक्षेत्रे आणि धार्मिक स्थळांना जोडत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. हे सर्किट गुजरात, राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओदिशापर्यंत विस्तारलेले असल्याचे त्यांनी सांगितले. स्वदेश दर्शन आणि प्रसाद योजनेंतर्गत या स्थळांचा विकास करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. ही मंदिरे भगवान कृष्णाची विविध रूपे दर्शवितात. श्री कृष्णाच्या बालस्वरूपापासून ते राधा राणीसह त्यांच्या पूजेपर्यंत, त्यांचे कर्मयोगी रूप आणि त्यांचे राजा रुप, अशी मंदिरे असल्याचे त्यांनी सांगितले. भगवान कृष्णाच्या जीवनाशी संबंधित विविध स्थळांना आणि मंदिरांना भेट देणे सोपे व्हावे, हा यामागचा उद्देश आहे, यासाठी विशेष गाड्या चालवल्या जात आहेत यावर पंतप्रधानांनी भर दिला. कृष्णा सर्किटशी जोडलेल्या या श्रद्धा केंद्रांमध्ये भक्तांना आणण्यात इस्कॉन मदत करू शकते, असे पंतप्रधानांनी सुचवले. इस्कॉनने त्यांच्या केंद्रांशी संबंधित सर्व भाविकांना भारतातील अशा किमान पाच ठिकाणी भेट देण्यास प्रोत्साहित करावे असे आवाहन पंतप्रधानांनी केले.
गेल्या दशकात, देश विकास आणि वारसा यांमध्ये एकाच वेळी होत असलेल्या प्रगतीचा साक्षीदार झाला आहे यावर भर देऊन पंतप्रधानांनी वारशाच्या माध्यमातून विकासाच्या या मिशनमध्ये इस्कॉनसारख्या संस्थांचे महत्त्वपूर्ण योगदान अधोरेखित केले. आपली मंदिरे आणि धार्मिक स्थळे ही शतकानुशतके सामाजिक जाणीवेची केंद्रे बनलेली आहेत तर गुरुकुलांनी शिक्षण आणि कौशल्य विकासाला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे पंतप्रधान म्हणाले. इस्कॉन आपल्या कार्यक्रमातून तरुणांना अध्यात्माला त्यांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनवण्यासाठी प्रेरित करते यावर त्यांनी भर दिला. इस्कॉनचे तरुण अनुयायी त्यांच्या परंपरांचे पालन करत आधुनिक तंत्रज्ञान कसे स्वीकारतात आणि त्यांचे माहितीचे जाळे इतरांसाठी एक आदर्श कसे बनवतात, यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. इस्कॉनच्या मार्गदर्शनाखाली देशातील युवक सेवा आणि समर्पणाच्या भावनेने राष्ट्रहितासाठी काम करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या मंदिर परिसरात स्थापन केलेल्या भक्तिवेदांत आयुर्वेदिक उपचार केंद्र आणि वैदिक शिक्षण देणाऱ्या भक्तिवेदांत महाविद्यालयाचा समाज आणि संपूर्ण देशाला फायदा होईल असे ते म्हणाले. ‘हील इन इंडिया’ या भारतातील वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमात सहभागी होण्याच्या आवाहनाचा देखील पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला.
समाज जसजसा आधुनिक होत जातो, तसतशी त्याला अधिक करुणा आणि संवेदनशीलतेचीही गरज असते, अशी टिप्पणी पंतप्रधानांनी केली. मानवी गुण आणि आपुलकीच्या भावनेसह पुढे जाणाऱ्या संवेदनशील व्यक्तींचा समाज निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. इस्कॉन आपल्या भक्तीवेदांताद्वारे जागतिक संवेदनशीलतेमध्ये नवीन जीवन श्वास फुंकू शकते आणि मानवी मूल्यांचा जगभरात विस्तार करू शकते यावर पंतप्रधानांनी प्रकाश टाकला. इस्कॉनचे नेते यापुढे देखील श्री प्रभुपाद स्वामींच्या आदर्शांचे समर्थन करत राहतील, असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना व्यक्त केला.
त्यांनी पुन्हा एकदा संपूर्ण इस्कॉन परिवाराला आणि सर्व नागरिकांना राधा मदनमोहनजी मंदिराच्या उद्घाटनाबद्दल शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
पार्श्वभूमी
श्री श्री राधा मदनमोहनजी मंदिर, हा इस्कॉन प्रकल्प नव्या मुंबईतील खारघर उपनगरात नऊ एकरात पसरलेला आहे. या परिसरात अनेक देवतांचे मंदिरे, एक वैदिक शिक्षण केंद्र, प्रस्तावित संग्रहालये आणि सभागृह, उपचार केंद्र इत्यादींचा समावेश आहे. वैदिक शिकवणींद्वारे वैश्विक बंधुता, शांतता आणि सौहार्द वाढवणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी