निवडणूक सुधारणांवर निवडणूक आयोगाला नोटीस
काँग्रेसच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मागितले उत्तर नवी दिल्ली, 15 जानेवारी (हिं.स.) : देशातील 1961 च्या निवडणूक नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिके
SC logo


काँग्रेसच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने मागितले उत्तर

नवी दिल्ली, 15 जानेवारी (हिं.स.) : देशातील 1961 च्या निवडणूक नियमांमध्ये सुधारणा करण्याच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने आज, बुधवारी केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाकडून उत्तर मागितले आहे.

जयराम रमेश यांनी डिसेंबर 2024 मध्ये याचिका दाखल केली आहे. त्यामध्ये त्यांनी 1961 च्या निवडणूक नियमांमधील सुधारणांना आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालय निवडणूक प्रक्रियेची वेगाने क्षीण होत चाललेली अखंडता पुन्हा स्थापित करण्यास मदत करेल, असे त्यांनी याचिकेत म्हटले आहे. सरकारने सीसीटीव्ही कॅमेरा आणि वेबकास्टिंग फुटेजसारख्या काही इलेक्ट्रॉनिक माहितीची सार्वजनिक तपासणी रोखण्यासाठी निवडणूक नियमात बदल केल्याचा आरोप त्यांनी केलाय. सरन्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. संजय कुमार यांच्या खंडपीठाने जयराम रमेश यांच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांच्या सादरीकरणाची आज, बुधवारी दखल घेतली. याचिकेवर केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली. आगामी 17 मार्चपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात याचिकेवर पुढील सुनावणी होईल, असे खंडपीठाने स्‍पष्‍ट केले. यावेळी युक्तीवाद करताना ऍड्. सिंघवी म्हणाले की, देशातील 1961 मधील निवडणूक नियमांमध्ये सुधारणा अत्यंत हुशारीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मतदाराची ओळख उघड होईल, असा दावा करून सीसीटीव्ही फुटेजमध्ये देण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील सुनावणीच्या तारखेपूर्वी निवडणूक आयोग आणि केंद्र सरकारला त्यांचे उत्तर दाखल करण्यास सांगा अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला करण्यात आली.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande