संक्रांतीच्या सुगडांची विक्री निम्म्यावर
- आधुनिक काळाबरोबर बदललेल्या आयामांचा सणावर परिणाम अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.) संक्रांत सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या निमित्ताने हळदीकुंकू आणि वाण म्हणून मातीचे सुगडे दिले जातात. अलीकडे मात्र सुगड्याचे वाण देण्याची प्रथा कमी होत चालली
संक्रांतीच्या सुगड्यांची विक्री निम्यावर ; आधुनिक काळाबरोबर बदललेल्या आयामांचा सणावर परिणाम


- आधुनिक काळाबरोबर बदललेल्या आयामांचा सणावर परिणाम

अमरावती, 15 जानेवारी (हिं.स.)

संक्रांत सण महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा असून या निमित्ताने हळदीकुंकू आणि वाण म्हणून मातीचे सुगडे दिले जातात. अलीकडे मात्र सुगड्याचे वाण देण्याची प्रथा कमी होत चालली आहे. त्यामुळे सुगड्यांची विक्री अर्ध्यावर आल्याची खंत सुगडे विक्रेत्यांनी व्यक्त केली.संक्रांतीच्या दिवशी मातीचे सुगडे (बोळके) बाजारातून आणून मुगाची डाळ, तांदूळ, बोर, शेंगा, उस, कापूस, तिळगूळ इत्यादी पदार्थ त्यामध्ये भरून ते देवासमोर ठेवून त्याची पूजा केली जाते. विवाहित स्त्रियांना घरी बोलावून ते सुगडे त्यांना वाण म्हणून देण्याची परंपरा आहे.

अलीकडे मात्र ही परंपरा कमी होत असून सुगड्यांऐवजी स्टील, प्लॅस्टिकच्या इतर वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. परिणामी सुगड्यांची विक्री अर्ध्यावर आली आहे. या छोट्या मातीच्या बोळक्यांचा काही उपयोग नसून त्यामध्ये गुंतवलेले पैसे वाया जातात, तसेच अलीकडे महिला नोकरी-व्यवसायी असल्याने हळदीकुंकू-वाणवसा करण्यासाठी त्यांना वेळ नसल्याचाही परिणाम सुगडे विक्रीवर झाला असल्याचे दिसते.

सुगडे विक्रीतून फायदा नाही

अमरावती जवळील पेठ येथून सुगडे विक्रीसाठी आणतो. कोरोनाच्या आधीपर्यंत या सणादरम्यान ५०० ते ६०० सुगडे विकले जायचे. आता मात्र २०० ते २५० सुगडेच विकले जातात. या सुगड्यांची किंमतही कमी असल्याने सुगडे विक्रीतून फायदा होत नाही. गोकूळपेठ बाजारात सुगड्यांची ५-६ दुकाने असून प्रत्येक दुकानातून साधारण एवढीच विक्री होते.

- छाया खापेकर, सुगड विक्रेते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande