दिल्ली विधानसभेसाठी भाजपच्या जाहीरनाम्यात महिला, ज्येष्ठ नागरिक केंद्री विविध योजना
नवी दिल्ली, 17 जानेवारी (हिं.स.) - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात महिला समृद्धी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा ₹ 2,500, गरीब भगिनींना सिलिंडरवर ₹ 500 ची सबसिडी,
दिल्ली विधानसभा निवडणूक भाजप जाहीरनामा


नवी दिल्ली, 17 जानेवारी (हिं.स.) - दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी जाहीरनामा प्रसिद्ध केला. यात महिला समृद्धी योजनेअंतर्गत प्रत्येक महिलेला दरमहा ₹ 2,500, गरीब भगिनींना सिलिंडरवर ₹ 500 ची सबसिडी, तसेच होळी आणि दिवाळीला प्रत्येकी एक सिलिंडर मोफत दिला जाईल, अशा प्रमुख घोषणा केल्या आहेत. या संकल्पपत्रातून आपल्याला संकल्पाकडून सिद्धीकडे वाटचाल करायची आहे, असा निर्धार नड्डा यांनी या निमित्ताने व्यक्त केला.

दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. भाजप, आम आदमी पक्ष आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार लढत सुरु आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी एकाच टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. तर येत्या 8 फेब्रुवारी रोजी मतमोजणी होऊन निकाल हाती येणार आहे.

जाहीरनाम्यात पुढे म्हटले आहे की, दिल्लीमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या म्हणजेच 60-70 वयोगटातील पेन्शनमध्ये 2000 रुपयांनी वाढ करून 2500 रुपये केले जातील. 70 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांना 3,000 रुपये पेन्शन, विधवा आणि अपंगांना दरमहा 3 हजार रुपये दिले जातील. झोपडपट्ट्यांसाठी अटल कॅन्टीन योजना सुरू केली जाईल, ज्याअंतर्गत 5 रुपयांत जेवण मिळेल. प्रसूती रजा 12 वरून 26 आठवडे, मातृ सुरक्षा वंदनाला अधिक ताकद देण्यासाठी 6 पोषण किट आदी घोषणांचा समावेश आहे.

नड्डा म्हणाले, आम्ही निर्णय घेतला आहे की, दिल्लीत सरकार स्थापन केल्यानंतर पहिल्या मंत्रिमंडळात दिल्लीत आयुष्मान भारत योजना पूर्णपणे लागू करू आणि यासोबतच दिल्ली सरकारकडून 5 लाख रुपयांची अतिरिक्त मदत देऊ. म्हणजेच आयुष्मान भारत योजनेअंतर्गत दिल्लीतील रहिवाशांना एकूण 10 लाख रुपयांचे आरोग्य कव्हर मिळेल. सोबतच दिल्लीतील महिलांना 'महिला समृद्धी योजने' अंतर्गत 2,500 रुपये मासिक मदत दिली जाईल, असा निर्णय घेतला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande