रत्नागिरी, 17 जानेवारी, (हिं. स.) : रत्नागिरी शहरानजीकच्या मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर असलेली अनधिकृत बांधकामे हटवण्याचे निर्देश मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य विभागाला दिले होते. त्यानुसार १६ जानेवारी २०२५ रोजीच्या नोटिसांद्वारे पुढील ७ दिवसांत अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी ३१९ धारकांना कायदेशीर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
याबाबतची माहिती मत्स्यव्यवसाय विभागकडून देण्यात आली आहे. मत्स्य व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांच्या अध्यक्षतेखाली १३ जानेवारी रोजी मत्स्य विभागाची बैठक रत्नागिरीत झाली होती. त्यावेळी मिरकरवाडा बंदरामध्ये मत्स्यव्यवसाय विभागाच्या जागेवर अनधिकृत बांधकाम असलेल्या धारकांवर पोलिसांे संरक्षण घेऊन प्रशासनामार्फत अनधिकृत बांधकाम हटविण्याबाबत नितेश राणे यांनी निर्देश दिले होते.
मिरकरवाडा बंदर राज्य शासनाच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या मालकीचे असून भूमापन क्र. ७३/०२ मध्ये १०.८४ हे. आर एवढे क्षेत्र आहे. या शासकीय जागेत कोणतेही बांधकाम करण्यास सक्त मनाई आहे. तरीसुद्धा या जागेमध्ये सुमारे ३१९ अनधिकृत बांधकामे अस्तित्वात आहेत. ती बांधकामे हटविण्यासाठी मत्स्यव्यवसाय विकास अधिकाऱ्यांमार्फत अनेकदा नोटीस देण्यात आली आहे. मात्र अद्यापही अनधिकृत बांधकामे तशीच आहेत. या पार्श्वभूमीवर मत्स्य व्यवसाय विभागाने आता कारवाईचा बडगा उचलला आहे. पुढील ७ दिवसांत अनधिकृत बांधकामे हटविण्यासाठी ३१९ धारकांना कायदेशीर नोटीस बजावणी करण्यात आली आहे. विहित मुदतीत अनधिकृत बांधकाम हटविण्यात आले नाही, तर बांधकाम प्रशासनाकडून ते हटविण्यात येईल आणि त्याचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल असेही मत्स्य व्यवसाय विभागाकडून सांगण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी