२१ ते २३ जानेवारीला प्रहारच्या वतीने जंगी शंकरपट, दुचाकी वाहनांसह लाखोंची बक्षिसे
अमरावती, 18 जानेवारी (हिं.स.)
विदर्भातील सर्वात जास्त काळ चालणारी ऐतिहासिक व पुरातन असलेल्या बहिरम बाबा यात्रा महोत्सवात २१ ते २३ जानेवारी दरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जंगी शंकरपटाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रहारच्या शंकरपटाची पंचक्रोशीतील नागरिक आतुरतेने वाट बघत असतात. यावर्षी विजेत्या स्पर्धकांना दुचाकी वाहनांसह लाखो रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहे. बच्चू कडू यांच्या संकल्पनेतील हे आयोजन असून मागील वीस वर्षांपासून निरंतर हे आयोजन सुरू आहे.
२१ जानेवारी रोजी या जंगी शंकरपटाचे उदघाटन असून माजी आ. राजकुमार पटेल, उपविभागीय अधिकारी डॉ. प्रभुजी जवंजाळ, चांदुर बाजार येथील तहसीलदार रामदास शेळके, ठाणेदार महेंद्र गवई, गटविकास अधिकारी नारायण आमझरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या शंकरपटाचे उदघाटन होणार आहे.
वीस वर्षांपासून निरंतर बच्चू कडू या यशस्वी शंकरपटाचे आयोजन करत असून विदर्भात या शंकरपटाचा नावलौकिक आहे. दूरवरून या शंकरपटात स्पर्धक सहभागी होतात हे विशेष.
शंकरपटाच्या स्पर्धकांना दुचाकीवाहने व लाखोंची बक्षिसे देण्यात येणार आहेत. २३ जानेवारी रोजी अमरावती मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अभिजीत ढेपे, संचालक नरेशचंद्र ठाकरे, जयप्रकाश पटेल, सुनिलभाऊ वऱ्हाडे, अजय मेहकरे, आनंदभाऊ काळे, चित्रा प्रशांत डाहाणे, यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा पार पडणार आहे. तरी या जंगी शंकरपटात सहभागी होण्याचे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक बच्चू कडू यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी