धुळे जिल्ह्यातील 19 गावातील नागरिकांना  स्वामीत्व योजनेतंर्गत सनद वाटप
धुळे,, 18 जानेवारी (हिं.स.)धुळे जिल्ह्यातील 19 गावातील नागरिकांना आज मान्यवराच्या हस्ते स्वामीत्व योजनेतंर्गत सनद वाटपांचा कार्यक्रम संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरात 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करण्यात आले त्यात
स्वामीत्व योजनेतंर्गत सनद वाटप


धुळे,, 18 जानेवारी (हिं.स.)धुळे जिल्ह्यातील 19 गावातील नागरिकांना आज मान्यवराच्या हस्ते स्वामीत्व योजनेतंर्गत सनद वाटपांचा कार्यक्रम संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरात 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करण्यात आले त्यात धुळे जिल्ह्यातील 19 गावांतील 16 नागरिकांना मान्यवरांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष वितरण करण्यात आले.या कार्यक्रमास आमदार मंजुळाताई गावित, अनुपभैय्या अग्रवाल, राघवेंद्र पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर पोलीस अधिक्षक किशारे काळे, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख अधिकारी स्वाती लोंढे आदी उपस्थित होते. आमदार अनुपभैय्या अग्रवाल म्हणाले की, स्वामित्व योजनेचा लाभ खऱ्या अर्थांने ग्रामीण भागातील नागरिकांना होणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांकडे त्यांच्या मालमत्तेचे पुरेसे कागदपत्रे उपलब्ध नसतात. आता अत्याधुनिक ड्रोन सर्व्हेच्या माध्यमातून नागरिकांना ही सनद घरपोच मिळणार आहे. यापुढे नागरिकांना आता सनदेसाठी शासकीय कार्यालयात जावे लागणार नाही. सनदमुळे नागरिकांना वेळेत कर्ज उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातील आपआपसातील वाद यामुळे कमी होणार आहे. तसेच महापालिका, नगरपालिका, तसेच ग्रामपंचायतीमध्ये घरपट्टी , शेतसारा तसेच विविध कर भरणे सुलभ होणार आहे. येत्या काळात या योजनेचा लाभ शहरी भागासाठी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार राघवेंद्र पाटील म्हणाले की, केंद्र शासनामार्फत गत दहा वर्षांच्या कालावधीत गोरगरीबांसाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे. केंद्र शासनाने गरीबासाठी घरकुल योजना, जलजीवन मिशनच्या माध्यमातून प्रत्येक घरात पाणी, गरीबांसाठी मोफत धान्य योजना यानंतर आता नागरिकांना हक्काचे असे सनद देण्याचे काम केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहे. पुर्वी सनदे अभावी ग्रामीण भागातील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करायला लागायचा पंरतू केंद्र शासनाच्या अत्याधुनिक ड्रोन सर्व्हेमुळे आता नागरिकांना घरपोच सनद मिळणार असल्यामुळे त्यांना दिलासा मिळणार आहे. स्वामित्व योजनेमुळे ग्रामपंचायतीच्या करसंकलनात वाढ होऊन ग्रामपंचायती अधिक सक्षम होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर म्हणाले की, आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपुर्ण देशात स्वामीत्व योजनेद्वारे सनद वितरणाला सुरुवात केली. धुळे जिल्ह्यात देखील जवळपास 90 टक्के ड्रोन सर्व्हेशनाचे काम पुर्ण झाले आहे. पुर्वी जमीन मोजणीसाठी छोटे यंत्र वापरले जायचे. पंरतू शासनाने आता सॅटेलाईट तंत्रज्ञानाचा वापर करुन अत्यंत अचुक असे सनद पत्रकांचे काम पुर्ण केले आहे. यामुळे आता हे सनद पत्रिका ही बँकेत, खरेदी विक्री व इतर व्यवहारांसाठी वापरता येणार आहे. तसेच गावातील आपआपसातील वाद संपुष्टात येणार आहे. येत्या काळात संपुर्ण जिल्ह्यातील सर्व्हेक्षणाचे काम वेळेत पुर्ण करणार आहे. ज्या नागरिकांच्या मालमत्तेची सनद तयार झाली आहेत अशा नागरिकांनी ती घेवून जावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री.पापळकर यांनी यावेळी केले. जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख अधिकारी श्रीमती.लोंढे यांनी प्रास्ताविकांत जिल्ह्यात झालेल्या कामाची माहिती विषद केली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील 19 गावातील 16 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात स्वामित्व योजनेतंर्गत सनदचे वाटप करण्यात आले. प्रारंभी देशाचे पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी यांनी दुरस्थप्रणालीवरुन देशभरातील 50 हजार गावांमधील 58 लाख लाभार्थ्यांना स्वामित्व योजनेतंर्गत सनदचे वाटप केले. तसेच आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री.मनोहर मेवाढा (मध्यप्रदेश ), श्रीमती रचना (राजस्थान), श्री.रोशन पाटील (नागपूर, महाराष्ट्र), श्रीमती संगीता गजेंद्र (ओडीसा), श्री.विरेंद्र कुमार (जम्मु काश्मिर) च्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वामित्व योजनेचे फायदे शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होईल. मिळकतींचा नकाशा तयार होईल व सीमा निश्चित होतील. मिळकतीचे नेमके क्षेत्र माहित होईल. मालकी हक्काची अभिलेख मिळकत पत्रिका (Property Card) तयार होईल. ग्रामस्थांच्या नागरी हक्कांचे संवर्धन होईल. गावातील रस्ते शासनाच्या ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा निश्चित होवून अतिक्रमण रोखता येईल. मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेणेची सुविधा उपलब्ध होईल. मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावाची आर्थिक पत उंचावेल. ग्रामपंचायतीला गावातील कर आकारणी, बांधकाम परवानगी, अतिक्रमण निर्मुलन यासाठी अभिलेख व नकाशा उपलब्ध होईल. या 19 गावांना मिळाले स्वामित्व प्रमाणपत्र धुळे तालुका- सातरणे, जुन्नेर, निमखेडी, सिताणे, नंदाळे खु, वणी खु,. साक्री तालुका-कुरुसवाडे, नवडणे, शेवाळी मा., वरझडी, सतमाणे. शिंदखेडा तालुका-चौगाव खु, वसमाने, वरझडी. शिरपूर तालुका-अहिल्यापूर, पिंप्री, असली, आढे तसेच उप्परपिंड.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande