* ३ जानेवारी - सावित्रीबाई फुले जयंती
पुरुषप्रधान समाज व्यवस्थेच्या सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी फुले दांपत्याने जी क्रांतिकारक कामगिरी केली आहे,त्याचं शब्दात वर्णन करणं अवघड आहे.१५० वर्षांपूर्वी स्त्री- पुरुष समानता अन् सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी महात्मा फुले अन् सावित्रीबाई फुले यांनी संयुक्तरित्या तत्कालिन रूढीप्रिय अन् मनुवादी समाज व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटले.त्याकाळी स्त्रियांना चूल अन् मूल या चौकटीत जीवन कंठावे लागायचे. मनुस्मृतीच्या आधारे उभारलेल्या वर्ण व्यवस्थेत स्त्रीजातीला हिन अशी दुय्यम दर्जाची वागणूक दिला जाऊन त्यांना शारीरिक उपभोगाची वस्तू म्हणून अमानुष वागणूक दिली जात असे.तसेच स्त्रियांना शिक्षण घेण्यास पूर्णतः मज्जाव असायचा.परिणामस्वरूप स्त्रिया ह्या तत्कालिन समाजात सामाजिक गुलामगिरीच्या बेड्यांमध्ये जखडल्या गेल्या होत्या.जणू काही त्यांचा कोणी वालीच नव्हता.त्यांचे जीवन पूर्णतः असुरक्षित व निराधार झालं होतं.अशात फुले दाम्पत्याचा उदय झाला,अन् जणू काही स्री जातीचा पालनहार पृथ्वीतळावर प्रगट होऊन स्त्रियांना शिक्षणाची कवाडं उघडणारे देवदूत भारतभूमीवर अवतरले.स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांना जयंती दिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली!
स्वातंत्र्यपूर्व काळात महिलांना शिक्षित करून त्यांना स्वयंनिर्भर करणाऱ्या वंदनीय सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्याच्या खंडाळा तालुक्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे-पाटील यांच्या इमानदार घराण्यात झाला,अन् जणू काही स्त्री शिक्षणाची दिव्यज्योती प्रकाशित झाली.स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रवर्तक सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांनी स्त्री शिक्षणाकरिता विद्येची ज्योत पेटविण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांची पुरुषप्रधान समाजाच्या मगरमिठीतुन सुटका केली.दि.१ जानेवारी १८४८ रोजी पुणे येथील भिडेंच्या वाड्यात स्त्रीयांच्या शाळेची मुहूर्तमेढ करून स्त्री-पुरुष समानता प्रस्थापित करण्याची जणू ही नांदीच ठरली.
स्त्री शिक्षणाची बिजे रोवल्याने तथाकथित कर्मकांडी पंडितांचा राग अनावरण झाला.त्यांनी शाळेत येत जातांना सावित्रीबाई फुले यांच्यावर अमानुष अत्याचार केला.त्यांच्या अंगावर कधी शेणाचं पाणी तर,कधी दगडांचा वर्षाव केला.एके प्रसंगी तर सावित्रीबाईंचे दगड लागल्याने डोकंच फुटलं होतं.बऱ्याच वेळा असभ्य शब्दांनी सावित्रीबाईंना हिणवले जायायचे..एवढं घडूनही सावित्रीबाई ह्या आपल्या ध्येयापासून हटल्या नाहीत.त्यांनी न डगमगता आपली स्त्री शिक्षणाची मोहीम पुढे पूर्णक्षमतेने सुरूच ठेवली.वास्तविक पहाता,सावित्रीबाई फुले ह्या भारतातल्या पहिल्या शिक्षिका ठरल्या असून,त्यांनी सुरू केलेली भिडेंच्या वाड्यातील शाळा ही देशातील पहिली मुलींची शाळा म्हणून नावरूपाला आली.यास्तव सावित्रीबाई फुले यांना मराठी जनमानसाचा मानाचा मुजरा!
आज सावित्रीच्या लेकी शिकूनसवरून पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात आघाडी घेताहेत.ही खऱ्या अर्थाने फुले दाम्पत्याचीच पुण्याई म्हणावी.थोर समाजसेविका वंदनीय सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या स्त्री शिक्षणातील महान कामगिरीला नतमस्तक होत,तत्कालीन राज्य सरकारने पुणे विद्यापीठाचे नामांतर करून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे केले.वास्तविक पहाता,हीच खरी त्यांच्या महनीय कार्याची पावती होय.
शिक्षणाची महती-उपयुक्तता सांगताना सावित्रीबाई फुले म्हणतात, शिक्षणाने मनुष्यत्व येते.पशुत्व हरते पहा!विद्या हे धन आहे रे...श्रेष्ठ साऱ्या धनाहून,तिचा साठा जया पाशी,तो ज्ञानी मानिती जना! विद्या हे सर्वश्रेष्ठ धन असून,ज्याच्यापाशी हे धन आहे,तो समाजात ज्ञानी म्हटला जातो,असा उपदेश सावित्रीबाईंनी समाजातील स्त्रियांना दिला.
जिच्या हाती पाळण्याची दोरी,ती जगाते उद्धारी ही उक्ती फुले दांपत्याने स्त्रियांच्या दारी शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवून स्त्री स्वातंत्र्याचे रणशिंग फुंकले.महात्मा फुले यांच्या निधनानंतर स्त्रियांना समाजात न्याय मिळावा,या उद्देशाने स्री शिक्षण,स्त्री मुक्ती,स्त्री-पुरुष समानता यावर सावित्रीबाईंनी अधिक भर देऊन ज्योतिबा फुले यांचे सामाजिक समतेचं कार्य पुढे अविरत चालूच ठेवले.सावित्रीबाईंनी बाल विवाह,विधवा स्त्रियांचे केशवपन,बालहत्या करणं, हुंडापद्धती,जातीभेद,वर्णभेद या कुप्रथांना कडाडून विरोध केला,तर स्त्री शिक्षण,विधवा पुनर्विवाह यांना प्रोत्साहित केले.निरक्षरता अन् गरिबी ही सामाजिक व बौद्धिक गुलामगिरीची दोन मुख्य कारणे असल्यामुळे प्रत्येकाने शिक्षण घेण्यास पुढे यावे.शिकल्याने माणूस हुशार व विवेकी होऊन,त्याला चांगलं काय अन् वाईट काय,याची चांगल्याप्रकारे कल्पना येते.तसेच त्याला आपल्या हक्कांची जाणीव होते.या पार्श्वभूमीवर स्त्रियांनी शिक्षण घेण्यास स्वयंस्फूर्तीने पुढे यावे.अन् आपल्या कुटुंबाच्या व समाजाच्या सर्वांगीण विकासात आपलं योगदान द्यावं,म्हणजे हीच खरी सावित्रीबाईंना मानवंदना ठरेल.
पत्रकार रणवीर राजपूत
निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी
---------------
हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी