स्टॉकहोल्म, 31 जानेवारी (हिं.स.)।युरोपीयन देश स्वीडनमध्ये मशिदीच्या समोर कुराण जाळणारा आंदोलक सलवान मोमिकाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.सलवान मोमिका जेव्हा टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत असताना अज्ञात हल्लेखोराने त्याला गोळ्या घातल्या. त्याच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुर होती. परंतु, यासंदर्भातील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या हत्येचे चित्र स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, 29 जानेवारी 2025 रोजी सलवान मोमिका याचा मृतदेह स्वीडनच्या सॉडेटेली भागात आढळला. त्याच्या शरीरावर गोळ्यांच्या खुणा होत्या, यावरून तो गोळीबारात ठार झाला असल्याचे स्पष्ट झाले. स्वीडिश मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो जेव्हा टिकटॉकवर लाईव्ह स्ट्रीमिंग करत होता, तेव्हा त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. एका व्हिडिओमध्ये, पोलिस त्याचा फोन काढून घेत असल्याचे आणि त्याची लाईव्हस्ट्रीम संपवत असल्याचे दिसते.सलवान मोमिकावर झालेल्या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कुराण जाळण्याच्या घटनेनंतर तो मुस्लिम समाजाच्या रोषाचा विषय बनला होता.स्वीडिश पोलिसांनी या हत्येचा तपास सुरू केला आहे. हा धार्मिक आक्रमण होता का? की त्यामागे अन्य कोणते राजकीय किंवा वैयक्तिक कारण होते? याचा शोध घेतला जात आहे. सलवान मोमिका याचे नाव 2023 मध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. सलवाननं 28 जून 2023 रोजी स्टॉकहोममधील सर्वात मोठ्या मशिदीच्या समोर कुराण जाळले होते.आणि त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यानंतर सलवाननं अनेक मशिदींच्या समोर कुराणांच्या प्रतींची होळी केली होती.त्याच्यावर कुराण पायदळी तुडवल्याचाही आरोप होता. या प्रकरणात स्टॉकहोम न्यायालयात खटला सुरू होता आणि गुरुवारी त्यावर निकाल लागणार होता, परंतु त्याआधीच बुधवारी(दि. २९) त्याचा मृत्यू झाला.त्याच्या हत्येनंतर आता हा निकाल 3 फेब्रुवारीपर्यंत लांबू शकतो.
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode