वॉशिंगटन , 13 मार्च (हिं.स.)।गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अडकले आहेत. त्यांना पुन्हा परत पृथ्वीवर आणण्यासाठी नासाने प्रयत्न सुरू केले आहेत.या दोघांनाही पृथ्वीवर परत आणण्यासाठी क्रू-10 मोहीम सुरू केली जाणार होती, ज्याद्वारे या दोघांच्या जागी 4 अंतराळवीरांना अवकाशात पाठवले गेले असते, परंतु आता तांत्रिक बिघाडामुळे क्रू-10 मोहीम रद्द करण्यात आली आहे. याआधी नासाने १३ मार्चपर्यंत सुनीता विल्यम्स यांना परत आणणार असं जाहीर केलं होतं.
नासाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अंतराळात दीर्घकाळ राहिल्यानंतर अखेर पृथ्वीवर परतण्याची तयारी करत आहेत. त्यांचे मिशन फक्त दहा दिवस चालणार होते, पण बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानातील तांत्रिक अडचणींमुळे ते जवळजवळ दहा महिने लांबले. नासा-स्पेसएक्स क्रू-10 मोहिमेला घेऊन जाणारे फाल्कन ९ रॉकेट बुधवारी(दि. १२) संध्याकाळी ७:४८ वाजता फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून उड्डाण करणार होते. ज्यामध्ये युनायटेड स्टेट्समधील दोन अंतराळवीर, एक जपान आणि एक रशियाचा चार जणांचा क्रू होता. क्रू-10 मिशनचा मूळ हेतू नियमित अंतराळवीर रोटेशनचा होता. NASA ने सुरुवातीला 26 मार्च रोजी क्रू-10 चे प्रक्षेपण नियोजित केले होते, परंतु स्पेसएक्स कॅप्सूलची अदलाबदल करून मोहिमेला वेग आला.
नवीन क्रू ISS वर पोहोचल्यानंतर, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर परत येऊ शकतील. क्रू -10 येईपर्यंत विल्मोर आणि विल्यम्स यांना ISS वर रहावे लागेल जेणेकरून ते स्टेशनची देखभाल करू शकतील, असे नासातर्फे सांगण्यात आलंय. क्रू-10 च्या प्रक्षेपणाच्या वेळी अधिकाऱ्यांनी हे मिशन रद्द केल्याची घोषणा केली. मात्र आता हे मिशन पुढील कोणत्या तारखेला पुन्हा लाँच होईल, हे अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना स्पेस स्टेशनवरून परत आणण्यासाठी नासा सतत प्रयत्न करत आहे. दरम्यान, एकीकडे हे लोक 19-20 मार्च 2025 रोजी परततील अशी अपेक्षा असताना आता त्यांना परत आणण्याची नासाची आणखी एक योजना फसल्यामुळे परतीचा कालावधी आणखी वाढू शकतो अशी भीती व्यक्त होत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प स्वतः सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांनी ही जबाबदारी स्पेसएक्सचे मालक एलॉन मस्क यांनाही दिली आहे. ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, बायडेन यांनी सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना अंतराळात सोडले आहे. याबद्दल माझ आणि एलॉन मस्क यांच बोलण झाले आहे
---------------
हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode