हैदराबाद, 04 जानेवारी (हिं.स.) : चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही) झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे तो कोरोना प्रमाणे साथरोगाचे रूप घेऊ शकतो अशी भीती वाढली आहे. भारतातही यावर बारीक लक्ष ठेवले जात आहे. यापार्श्वभूमीवर तेलंगणा सरकारने मार्गदर्शक तत्त्वे (गाईड-लाईन्स) जारी केली आहेत. मात्र, राज्यात अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही.
तेलंगणा राज्याच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले की राज्य सरकार चीनमधून येत असलेल्या एचएमपीव्हीच्या बातम्यांवर लक्ष ठेवून आहे. तसेच केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सहकार्याने परिस्थितीचे निरीक्षण करीत आहे. नागरिकांनी अफवांपासून दूर राहावे आणि खबरदारीचे पालन करावे, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे. तेलंगणा आरोग्य विभागाने राज्यात उपस्थित असलेल्या श्वसन संसर्गावरील डेटाचे विश्लेषण केले आणि असे आढळले की डिसेंबर 2023 ते डिसेंबर 2024 या कालावधीत संसर्गाच्या प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झालेली नाही. आरोग्य विभागाने श्वसनसंक्रमण रोखण्यासाठी नागरिकांना खालील खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे आणि मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
तेलंगणा सरकारने जारी केलेल्या गाईड लाईन्स प्रमाणे नागरिकांनी खोकताना किंवा शिंकताना आपले तोंड आणि नाक रुमालाने किंवा टिश्यूने झाकावे. आपले हात वारंवार साबणाने आणि पाण्याने धुवावे किंवा अल्कोहोल-आधारित सॅनिटायझर वापरावा. गर्दीची ठिकाणे टाळा आणि फ्लूने बाधित लोकांपासून अंतर राखा.ताप, खोकला किंवा शिंक येत असल्यास सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे. पुरेसे पाणी प्यावे आणि पौष्टिक आहार घ्यावा. आजारी असताना घरी रहा आणि इतरांशी संपर्क मर्यादित करा. पुरेशी झोप घ्यावी आणि इतरांशी हस्तांदोलन टाळावे. टिश्यू पेपर किंवा रुमाल पुन्हा पुन्हा वापरू नये. सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळावे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये असे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केले आहे.
भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आणि राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांनी चीनमध्ये एचएमपीव्हीच्या प्रादुर्भावाबाबत एक निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे की एचएमपीव्ही हा एक सामान्य श्वसन संसर्गाचा विषाणू आहे, ज्यामुळे हिवाळ्याच्या हंगामात सर्दी आणि फ्लू सारखी लक्षणे दिसून येतात. विशेषतः लहान मुले आणि वृद्धांवर याचा परिणाम होतो. दरम्यान आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल म्हणाले की, या व्हायरसमुळे घाबरण्याची गरज नाही. हा इतर श्वसन विषाणूंप्रमाणे आहे ज्यामुळे सामान्य सर्दी होते. यामुळे वृद्ध आणि तरुण लोकांमध्ये फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात असे डॉ. गोयल यांनी स्पष्ट केले.
----------------------
हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी